माकडांच्या अनेक प्रजाती आहेत. यामध्ये आता नवीन प्रजातीची भर पडली आहे. काँगोच्या जंगलात संशोधकांना लिक्वेली हे नवीन माकड आढळून आले आहे. ते कोठे राहतात, कसे दिसतात, काय करतात याचा हा आढावा…

लिक्वेली माकड कसे आढळले?

संशोधकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) या देशाच्या मध्य-पूर्वेकडील लोमामी राष्ट्रीय उद्यानातील घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांच्या उंच झाडांवर काळ्या केसांचे माकड दिसले आणि त्याचे छायाचित्र काढण्यात आले. या देशात काम करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी २००८ मध्ये पहिल्यांदा हे माकड दिसल्याचे सांगितले होते. पण त्यांना त्याचा फक्त एक अस्पष्ट फोटो काढता आला होता. ते माकड पुन्हा दिसल्यावर, एका आंतरराष्ट्रीय संघाने त्या माकडाला शोधून त्याचा अभ्यास करण्याचे काम हाती घेतले आणि ती माकडाची एक अज्ञात असलेली प्रजाती असल्याचे उघड केले. गेल्या ७५ वर्षांत शोध लागलेली ही आफ्रिकन माकडांची पाचवी प्रजाती आहे. फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या ज्युनियर अंबोको यांनी या शोधात प्रमुख भूमिका बजावली, ज्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग, फोटोग्राफी आणि सखोल आनुवंशिक अभ्यासाचा समावेश होता. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘पीएलओएस वन’ (PLoS One) या जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

लिक्वेली माकडाची वैशिष्ट्ये काय?

स्थानिक पातळीवर लिक्वेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलोबस काँगोएन्सिसचा चेहरा आकर्षक काळा असून ओठ गुलाबी-नारंगी रंगाचे आहेत. फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क ग्रॅज्युएट सेंटरच्या संशोधकांनी सांगितले की, या माकडाच्या अंगावर चमकदार काळे लांब केस, पसरलेली शेपटी आणि चेहऱ्यावर लक्षवेधी नारंगी-क्रीम रंगाच्या खुणा आहेत. या माकडांची कवटी, दात आणि सांगाड्याची रचना इतर सर्व ज्ञात आफ्रिकन कोलोबस माकडांपेक्षा वेगळी आहे. काँगो खोऱ्यातील एका दुर्गम प्रदेशात आढळलेली ही प्रजाती, मध्य आफ्रिकेत अनेक दशकांच्या वैज्ञानिक संशोधनानंतरही नोंदविली गेली नव्हती.

हे माकड इतर कोलोबस माकडांपेक्षा लहान असून त्याचे वजन सुमारे १५ पाउंड (६.८ किलोग्रॅम) आहे. चमकदार, प्रकाश परावर्तित करणारी फर आणि चेहऱ्यावरचे लांब काळे केस व मोठे दुमडलेले कान ही या माकडाची ओळख असल्याचे संशोधकांनी सांगितले. तसेच या माकडाचा आवाज खोल, प्रतिध्वनीयुक्त आणि गर्जनेसारखा असतो, जो संबंधित कोलोबस प्रजातींसारखा वाटतो, परंतु त्याची ध्वनिरचना मात्र वेगळी असते. दरम्यान या माकडाच्या शोधामुळे आफ्रिकन माकडांच्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठाच्या चार्ल्स ई. श्मिट कॉलेज ऑफ सायन्समधील जैविक विज्ञानाच्या सहयोगी प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका केट डेटविलर यांनी व्यक्त केला.

लिक्वेलीच्या अभ्यासात काय आढळले?

प्राध्यापिका केट डेटविलर यांनी सांगितले की, लिक्वेलीचे सर्वात जवळचे नातेवाईक कोलोबस सतानास माकड आहे. हे माकड पश्चिम-मध्य आफ्रिकेत १,२०० किलोमीटर (७४६ मैल) पेक्षा जास्त अंतरावर आढळते. या दोन प्रजाती अंदाजे ४ ते ५ दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळ्या झाल्या असाव्यात असा अंदाज जनुकीय पुराव्यांच्या आधारावर संशाधकांनी व्यक्त केला असून हे विभाजन कोलोबस वंशातील सर्वात जुन्या उत्क्रांती विभाजनांपैकी एक मानले जाते. या नवीन प्रजातीचे वर्णन करण्याची प्रक्रिया २००८ मध्ये सुरू झाली, जेव्हा पूर्व-मध्य डीआरसीमध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी एका असामान्य माकडाचे छायाचित्र काढले. पुढे २०१८ ते २०२२ या काळात त्याला ११४ वेळा पाहिल्याची नोंद केली.

माकडाची ही नवीन प्रजाती असल्याचे सिद्ध करण्यासाठी संशोधकांना माकडाच्या आनुवंशशास्त्राचा अभ्यास करावा लागला आणि स्थानिक पर्यावरणीय ज्ञानाचा वापर करावा लागला. जेव्हा एखाद्या संभाव्य नवीन प्रजातीचा शोध लागतो, तेव्हा पुरावा भक्कम असणे आवश्यक असते, असे मत क्यूनी ग्रॅज्युएट सेंटर आणि हंटर कॉलेजमधील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक आणि सहलेखक क्रिस्टोफर गिल्बर्ट यांनी म्हटले आहे. संग्रहालयातील माहितीचे विश्लेषण तसेच आफ्रिकन कोलोबस माकड आणि लिक्वेली यांच्या कवटी, कातडी आणि सांगाड्याच्या रचनेचा तुलना केल्यानंतर लिक्वेली म्हणजेच कोलोबस काँगोएन्सिस ही एक वेगळी प्रजाती आहे, हे स्पष्ट करता आल्याचे क्रिस्टोफर गिल्बर्ट यांनी सांगितले.

लिक्वेलीच्या संवर्धनाची गरज का आहे?

लिक्वेलीच्या संवर्धनाबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. लिक्वेली माकडाच्या संदर्भातील अभ्यास सुमारे १७०० चौरस किलोमीटर परिसरात करण्यात आल्यानंतर या माकडाचे अधिवास क्षेत्र मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या माकडांना वाचवण्यासाठी ‘संकटग्रस्त प्राणी’ म्हणून वर्गीकृत केले जाण्याची मागणी संशोधकांनी केली आहे. लिक्वेली माकडाचा अधिवास लोमामी राष्ट्रीय उद्यानात आहे. त्यामुळे या प्रजातीच्या अस्तित्वासाठी या प्रदेशाचेही संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत संशोधकांनी व्यक्त केले. दरम्यान वेल्समधील बँगोर विद्यापीठात प्राइमेटोलॉजीचे वरिष्ठ व्याख्याते असलेले अलेक्झांडर जॉर्जिव्ह यांनी या अभ्यासाला अतिशय सखोल आणि खात्रीशीर म्हटले आहे. स्थानिकांनाही फारशी माहिती नसलेली माकडांची नवीन प्रजाती शोधणे हे खरोखरच खूप दुर्मीळ आणि रोमांचक गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान काँगोचे वर्षावन विशाल असून त्याचा मोठा भाग शास्त्रज्ञांनी नीट शोधलेला नाही, असेही त्यांनी नमूद करत आणखी नवे शोध लागण्याची शक्यता व्यक्त केली. dharmesh.shinde@expressindia.com