-भक्ती बिसुरे
नवजात बालकासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम पोषण आहे, हे माहीत असूनही इतर अनेक प्रक्रिया केलेल्या उत्पादनांप्रमाणेच ‘फॉर्म्युला मिल्क’सारखे उत्पादन सध्या तेजीत आहे. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या पालकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक फॉर्म्युला मिल्क उत्पादक कंपन्या पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या बाळासाठी त्याच्या जन्मानंतर सहा महिने केवळ स्तनपानालाच पसंती देण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर फॉर्म्युला मिल्क आणि आईचे दूध यांची तुलना करणे उपयुक्त ठरणारे आहे.

फॉर्म्युला मिल्क म्हणजे काय?

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

फॉर्म्युला मिल्क हे आईच्या दुधाला पर्याय म्हणून बाळाला दिले जाते. फॉर्म्युला मिल्क हे पावडर स्वरूपात बाजारात उपलब्ध असते. या पावडरमध्ये विविध जीवनसत्त्वे, साखर, चरबी आणि इतर पौष्टिक पदार्थ यांचे मिश्रण असते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतेक फॉर्म्युला मिल्क उत्पादनांमध्ये गायीचे दूध हे प्रमुख घटक म्हणून वापरले जाते. गाईच्या दुधातील प्रथिनांपासून ही फॉर्म्युला मिल्क पावडर तयार केली जाते. बाळाला देण्यासाठी या पावडरपासून दूध कसे बनवावे याबाबत सूचना उत्पादक कंपन्यांकडून पाकिटावर नोंदवल्या जातात. हे उत्पादन आईच्या दुधाला पर्याय म्हणून बाजारात विकले जात असले तरी ते आईच्या दुधाला पर्याय ठरू शकत नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे सांगणे आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेची तक्रार काय? 

बाजारातील स्पर्धा आणि समाजमाध्यमांसारख्या घराघरात पोहोचलेल्या पर्यायांचा वापर आपले हातपाय पसरण्यासाठी करण्याचा प्रयत्न फॉर्म्युला मिल्क उत्पादक कंपन्यांकडून करण्यात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. फॉर्म्युला मिल्क या उत्पादनाची जगभरातील बाजारपेठेत तब्बल ५५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल आहे. त्याचाच परिणाम म्हणून या उत्पादनाच्या विक्रीसाठी कंपन्यांकडून विविध कल्पना लढवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून फॉर्म्युला मिल्क उत्पादक जगभरातील सोशल मिडिया व्यासपीठांना आणि इन्फ्लूएन्सर्सना हाताशी धरून नव्याने बाळाला जन्म दिलेल्या पालकांना आकृष्ट करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. नवोदित पालक किंवा माता यांची माहिती सोशल मिडिया कंपन्यांकडून खरेदी करून त्या माहितीचा वापर या पालक आणि मातांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध मोबाइल ॲप्स, सोशल मिडिया ग्रुप्स यांची मदत घेतली जात आहे. मात्र, फॉर्म्युला मिल्क हे स्तनपानाला पर्याय ठरणे शक्य नसल्याने उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातबाजीला बळी न पडण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकतेच करण्यात येत आहे. 

फॉर्म्युला मिल्क का नको?

आईचे दूध हे बाळासाठी पूर्णान्न समजले जाते. त्याचाच परिणाम म्हणून जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाला केवळ स्तनपान करण्याचा आणि त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही अन्न न देण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. फॉर्म्युला मिल्क हे नवजात बालकांना स्तनपानाचा पर्याय म्हणून तयार केले जाणारे मिश्रण आहे. त्यात जीवनसत्वे, साखर, चरबी, गाईचे दूध आणि त्यातील प्रथिने यांचा समावेश असतो. फॉर्म्युला मिल्क हे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांत मोडणारे उत्पादन असल्याने त्याचा वापर करणे खरोखरीच बाळाच्या प्रकृतीसाठी हिताचे असेल, असे नाही. त्यामुळे ज्या नवजात मातांना प्रकृतीच्या कोणत्याही कारणास्तव बाळाला स्तनपान करणे शक्य नसेल त्या मातांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे तसेच जवळच्या ह्यूमन मिल्क बँकांचा पर्याय स्वीकारणे अधिक योग्य असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

स्तनपानाचे महत्त्व काय? 

नवजात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आयुष्यभर पुरेशी रोगप्रतिकारशक्ती त्याच्या शरीरात निर्माण करण्यासाठी आईचे दूध म्हणजेच स्तनपान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळेच बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एक तासात त्याला स्तनपान देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. हे दूध त्याला अनेक रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती देते. केवळ बाळाच्याच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठीही हे स्तनपान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला वरचे कोणतेही पदार्थ न देता केवळ आणि केवळ स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो. 

स्तनपान की फॉर्म्युला मिल्क? 

नवजात बाळाला स्तनपान द्यायचे की फॉर्म्युला मिल्क या प्रश्नाला स्तनपान हेच उत्तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जाते. फॉर्म्युला मिल्कसारख्या उत्पादनांच्या जाहिराती करणे, त्यांचे नमुने वाटणे यासारख्या गोष्टींवर संपूर्ण बंदी आहे. मात्र, सोशल मिडियाचा वापर करुन आडमार्गाने हे केले जात असेल तर ते निषेधार्ह असल्याचे बालरोगतज्ज्ञ स्पष्ट करतात. वैद्यकीय कारणास्तव जन्मानंतर बाळ आईपासून दूर असेल, अतिदक्षता विभागात असेल आणि आई स्तनपान करूच शकत नसेल तरी ह्यूमन मिल्क बँकेतील दुधाचा वापर बाळासाठी केला जातो. आईला स्तनपान देण्यास कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यास प्रभावी समुपदेशन उपयुक्त ठरते. त्यामुळे अत्यंत दुर्मिळात दुर्मीळ प्रकरणांतच बाळासाठी फॉर्म्युला मिल्कचा पर्याय निवडला जातो. सोशल मिडियाचा वापर करून अशा जाहिराती केल्या जात असतील तर ते चूकच आहे आणि पालकांनी, नवीन मातांनी कोणत्याही परिस्थितीत फॉर्म्युला मिल्कच्या पर्यायाला पसंती देऊ नये, असेही बालरोगतज्ज्ञ स्पष्ट करतात.