मानव इतर सर्व जीवांप्रमाणेच उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून विकसित झाला आहे, असा सिद्धान्त चार्ल्स डार्विन यांनी मांडला होता. मात्र अनेक जणांना हा सिद्धान्त पटत नाही. मानवाने त्याच्या संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर निसर्गावर विजय मिळवला आहे. मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असल्याने त्याला उत्क्रांतीची आवश्यकता नाही, असे काही जणांना वाटते. मात्र इतर सजीव प्राण्यांप्रमाणे, मानवांनाही उत्क्रांतीने आकार दिला. कालांतराने, आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात टिकून राहण्यास आणि भरभराटीस मदत करणारे गुण विकसित केले आहेत आणि विकसित करत राहतो, असे काही मानववंशशास्त्रज्ञांनी नव्या अभ्यासात मांडले आहे. त्यांच्या मते उत्क्रांतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. या अभ्यासातील काही मुद्द्यांचा आढावा…

नवा अभ्यास काय सांगतो?

मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असला तरी तोही अन्य जीवांप्रमाणेच उत्क्रांतीतूनच घडला आहे. उत्क्रांतीची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. कालांतराने, माणूस ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणात टिकून राहण्यास आणि भरभराटीस मदत करणारे गुण त्याने विकसित केले आहेत आणि यापुढेही विकसित करत राहील, असे नव्या अभ्यासातून सांगण्यात आले. मानववंशशास्त्रज्ञांनी मानव वेगवेगळ्या वातावरणाशी कसे जुळवून घेतो याचा अभ्यास केला. अनुकूलन हा उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनुकूलन हा असा गुण आहे, जो एखाद्याला त्या त्या वातावरणात फायदा देतो. त्या गुणांसह लोक टिकून राहण्याची आणि ते गुण त्यांच्या मुलांना देण्याची शक्यता जास्त असते. अनेक पिढ्यांमध्ये, ते गुण लोकसंख्येमध्ये व्यापक होतात, असे मानववंशशास्त्रज्ञ सांगतात.

उत्क्रांतीत संस्कृतीची भूमिका

मानवांना दोन हात आहेत, जे त्याला साधने आणि इतर वस्तू कुशलतेने वापरण्यास मदत करतात. माणूस दोन पायांवर चालण्यास आणि धावण्यास सक्षम आहे, ज्यामुळे त्याचे हात या कुशल कामांसाठी मोकळे होतात. मानवाकडे मोठा मेंदू आहे, जो तर्क करण्यास, कल्पना निर्माण करण्यास आणि सामाजिक गटांमधील इतर लोकांसह यशस्वीरित्या जगण्यास मदत करतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मानवांना संस्कृती (civilization) विकसित करण्यास मदत झाली आहे.

संस्कृतीमध्ये आपल्या सर्व कल्पना, श्रद्धा आणि वर्तमान व भविष्याबद्दल नियोजन आणि विचार करण्याची क्षमता समाविष्ट आहे. त्यामध्ये वातावरणानुसार बदलण्याच्या क्षमतेचाही समावेश होतो. म्हणजे वातावरणानुसार वस्त्रे, अन्नपदार्थ तयार करणे हे यातूनच निर्माण झाले. गेल्या काही हजार वर्षांत मानवाने वातावरणानुसार स्वत:मध्ये खूप बदल केला असून उत्क्रांतीमुळे अजूनही हे बदल होत आहेत. उत्क्रांतीची प्रक्रिया थांबलेली नाही, परंतु सध्या आपण आपल्या प्राचीन पूर्वजांपेक्षा वेगळ्या प्रकारे विकसित होत आहोत. त्याच्या विविध संस्कृतीमुळे तो वातावरणाशी जुळवून घेऊ लागला.

सूर्यकिरणांची शक्ती

मानवला जगण्यासाठी सूर्यकिरण महत्त्वाचे आहे. मात्र सूर्यकिरणांच्या तीव्रतेनुसार त्याच्या शरीरात वा त्वचेवर बदल होत गेले. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला हानी पोहोचू नये म्हणून त्वचेमध्ये मेलेनिन रंगद्रव्ये तयार होतात. त्वचेतील मेलेनिन रंगद्रव्याचे प्रमाण आपल्या जनुकांद्वारे नियंत्रित केले जाते. उष्णकटिबंधीय भागातील लोकांची त्वचा काळी असते, कारण तेजस्वी सूर्यप्रकाशात वाढल्याने मेलेनिनचे प्रमाण जास्त असते. विविध वातावरणात राहणाऱ्या लोकांमध्ये मेलेनिनचे प्रमाण त्यानुसार असते. जेव्हा प्राचीन मानव ढगाळ, थंड ठिकाणी स्थलांतरित झाले, तेव्हा काळ्या त्वचेची आवश्यकता नव्हती. ढगाळ ठिकाणी काळी त्वचा त्वचेमध्ये व्हिटॅमिन डीचे उत्पादन रोखते, जे मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सामान्य हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्यामुळे आफ्रिकेतील मानव, जेव्हा थंड वातावरणात गेले, त्यानुसार त्यांच्या त्वचेमध्ये बदल होत गेले. सूर्यप्रकाशाच्या प्रमाणानुसार मानवी त्वचेमध्ये उत्क्रांती होत गेली.

अन्नपदार्थ आणि उत्क्रांती

मानवी उत्क्रांती आणि दुधाचा संबंध सुमारे १०,००० वर्षांपूर्वी प्राण्यांना पाळीव बनवण्याच्या काळात सुरू झाला. सुरुवातील प्रौढ मानवाला दूध पचवण्याची क्षमता नव्हती. मात्र नंतर काही मानवी लोकसंख्या त्यांच्या उत्क्रांतीत दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून राहण्यासाठी अनुकूल झाली, ज्यामुळे ‘लॅक्टोज पर्सिस्टन्स’ म्हणजेच प्रौढ वयातही दूध पचवण्याची क्षमता विकसित झाली. या क्षमतेमुळे त्यांना अतिरिक्त कॅलरी आणि प्रथिने मिळाली, ज्यामुळे मानवी वाढीला मदत झाली. जनुकीय बदलांमुळे विविध वातावरणातील मानव, त्या त्या प्रकारचे अन्न पचवू शकला. ग्रीनलँडमधील ‘इनुइट’सारख्या लोकांमध्ये अशा प्रकारची जनुके तयार झाली, जी त्यांना हृदयरोग न होता, चरबी पचवण्यास सक्षम करतात. आफ्रिकेतील अतिशय कोरड्या भागात असलेल्या केनियामध्ये तुर्काना लोक जास्त पाणी न पिता बराच काळ राहू शकतात. ही उदाहरणे हे दाखवतात की जगभरातील लोक खात असलेल्या अन्नाची उल्लेखनीय विविधता उत्क्रांतीवर कसा परिणाम करू शकते.

उत्क्रांतीमुळे आजारांवर मात…

सर्व सजीव प्राण्यांप्रमाणे मानवांनाही अनेक संसर्गजन्य आजारांना तोंड द्यावे लागले आहे. विविध प्रकारच्या आजारांमुळे मानवी शरीरात जनुकीय बदल होतात, ज्यामुळे या रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते. १४ व्या शतकात बुबोनिक प्लेग नावाचा एक प्राणघातक आजार युरोप आणि आशियामध्ये वेगाने पसरला. त्यामुळे युरोपमधील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येचा मृत्यू झाला, जे लोक वाचले त्यांच्यापैकी अनेकांमध्ये एक विशिष्ट जनुक होते, ज्यामुळे त्यांना रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली. पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ आजारांचा संपूर्ण जगाला फटका बसला. लसीकरणामुळे अनेक जीव वाचले. काही लोकांमध्ये त्यांच्या जनुकांवर आधारित विषाणूंविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. कदाचित उत्क्रांतीमुळे लोकसंख्येमध्ये ही प्रतिकारशक्ती वाढते आणि भविष्यातील विषाणू साथींशी लढण्यास मानवांना मदत होते. मानव त्यामुळेच विविध बदलत्या वातावरणांना तोंड देतो आणि म्हणूनच अनेक मानवी लोकसंख्येमध्ये उत्क्रांती पिढ्यान् पिढ्या चालू राहते.