scorecardresearch

Premium

विश्लेषण: मानवी उत्क्रांतीचा नवीन सिद्धांत – कोण होते मानवाचे पूर्वज?

New Theory of Human Evolution : मानव हा माकडापासून उत्पन्न झाला अशी आपली सर्वसाधारण समजूत असते.

New Theory of Human Evolution
मानवी उत्क्रांतीचा नवीन सिद्धांत (सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मानव हा सर्वात हुशार प्राणी आहे. आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर या प्राण्याने आपले वेगळेपण सिद्ध केले. म्हणूनच मानवाची उत्क्रांती नेमकी कधी, कशी आणि केव्हा झाली हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे. केवळ विज्ञानच नाही तर विविध धर्माच्या धार्मिक शाखांनीही या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. याच पार्श्वभूमीवर सध्या एक नवा सिद्धांत जगभरात गाजतो आहे. आधुनिक मानवाचे पूर्वज हे आफ्रिकेतील वेगवेगळ्या भागातून स्थलांतरित झालेल्या गटांच्या सामायिकतेतून पुढे आले, असा नवा सिद्धांत मॅक् ग्रील तसेच कॅलिफोर्निया या विद्यापीठांतील अभ्यासकांनी मांडला आहे. अलीकडेच १७ मे रोजी ‘नेचर’ या विख्यात संशोधन नियतकालिकात हा शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे, त्याविषयी…

आधुनिक मानवाचा पूर्वज

मानव हा माकडापासून उत्पन्न झाला अशी आपली सर्वसाधारण समजूत असते, परंतु इथे लक्षात घेण्याचा मुख्य मुद्दा असा की, आपली उत्पत्ती ही माकडापासून झालेली नाही. मानव सदृश्य प्राणी, माकड, कपी यांचे पूर्वज एक होते. साधारण तीन कोटी वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ते वेगळे झाले. हे वेगळेपण डीएनएच्या (DNA) संदर्भातील आहे. मानव हा होमिनीन प्रजातीत येतो. या होमिनीन गटातील चौथ्या गटात होमो ‘सेपियन्स प्रजाती’सह होमोप्रजातीच्या सर्व मानव प्रजातींचा समावेश होतो. या भूतलावरील सर्व जिवंत मानव ज्या प्रजातीशी संबंधित आहेत ती म्हणजे, होमो सेपियन्स. तीन लाख वर्षांपूर्वी हवामानातील बदलामुळे ‘होमो सेपियन्स आफ्रिकेत विकसित झाले. होमो सेपियन्स हाच आधुनिक मानव आहे. आपले पूर्वज आफ्रिकेत एकाच ठिकाणी जन्माला आले व इतरत्र जगात पसरले असे आजवर मानले जात होते. परंतु जीनोमच्या आधारे करण्यात आलेल्या नवीन संशोधनात आपले पूर्वज आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागात उत्पन्न झाले आणि त्यांच्या सामायिकतेतून आजचे होमो सेपियन्स उत्क्रांतीच्या माध्यमातून विकसित झाले, असे सिद्ध करण्यात संशोधकांना यश आले आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

आणखी वाचा: विश्लेषण: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ?

नवीन जनुकीय विश्लेषण पद्धती

मॅक् गिल युनिव्हर्सिटीच्या संशोधक डॉ. ब्रेना हेन यांनी नमूद केल्याप्रमाणे पारंपरिक सिद्धांतानुसार आधुनिक मानव प्रथम पूर्व किंवा दक्षिण आफ्रिकेत उदयास आला, आधुनिक मानवाचे अस्तित्त्व सिद्ध करताना पारंपरिक पुरावे व संशोधनपद्धती यांचा वापर केला जात होता, त्यामुळे संशोधनास मर्यादा होत्या. तसेच अपुऱ्या जीवाश्म अवशेषांच्या मदतीने ठोस सिद्धांत मांडणे कठीण जात होते. तरीही मोरोक्को, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणी सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे तीन लाख वर्षांपासून आफ्रिकेत आधुनिक मानवाचे अस्तित्त्व होते, हे समजण्यास मदत होते. असे असले तरी केवळ ठोकताळ्यांवर ठोस सिद्धांत मांडणे कठीण होते. त्यामुळेच या नवीन संशोधनात संशोधकांनी विज्ञानाच्या मदतीने २९० जिवंत व्यक्तींच्या जनुकांच्या संचाचे विश्लेषण करून आधुनिक मानवाच्या अस्तित्त्वाचे पुरावे सादर केले आहेत. या नवीन संशोधनात अभ्यासाचा एक भाग म्हणून, संशोधकांनी गेल्या दशलक्ष वर्षांत लोकसंख्येमधील समानता आणि फरक शोधण्याकरिता चार भौगोलिक आणि अनुवांशिकदृष्ट्या आफ्रिकेतील विविध गटांमधील २९० जिवंत व्यक्तींच्या जनुकांच्या संचाचे विश्लेषण केले. संपूर्ण आफ्रिका खंडातील जनुकीय आंतरसंबंध आणि मानवी उत्क्रांतीबद्दल माहिती मिळवणे हा या संशोधकांचा मुख्य उद्देश होता.

या संशोधनात नेमक्या कोणत्या समाजांचा समावेश करण्यात आला होता ?

या नवीन संशोधनात समाविष्ट करण्यात आलेल्या समाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील खो-सान समूहातील नामा ; आफ्रिकेतील शिकारी गटाचे अलीकडील वंशज गुमुझ; सिएरा लिओनचे मेंडे, आणि पूर्व आफ्रिकेतील शेतकरी गटातील अम्हारा आणि ओरोमो यांचा समावेश करण्यात आला होता. संशोधनात ४४ आधुनिक नामा व्यक्तींचे नवीन अनुक्रमित जीनोम समाविष्ट केले गेले. तसेच स्थानिकांशिवाय आफ्रिकेतील वसाहतीतील घुसखोरी आणि मिश्रण विचारात घेण्यासाठी, संशोधकांनी काही युरेशियन अनुवांशिक गटांचादेखील समावेश केला होता. इतकेच नव्हे तर संशोधनातील अनिश्चितता दूर करण्यासाठी, संशोधकांनी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागातील लोकांची निवड केली. किंबहुना संपूर्ण आफ्रिकेतील लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार यात करण्यात आला होता.

आणखी वाचा : विश्लेषण: NCRT textbook revision: इतिहास का शिकायचा? पुनर्लेखनाचे परिणाम काय?

संशोधनातून काय सिद्ध झाले?

सध्याच्या आफ्रिकेतील लोकसंख्येचा ऐतिहासिक पुरावा मरिन आयसोटोप (MIS) पाचपर्यंत मागे जातो, हे संशोधनात सिद्ध करण्यात आले. हा पृथ्वीच्या पॅलिओक्लायमेटमधील उबदार आणि थंड कालावधी आहे, हा एक जटिल कालावधी मानला जातो. एक लाख २८ हजार ते ७३ हजार वर्षांदरम्यान हा कालखंड अस्तित्त्वात होता. म्हणजेच आजच्या लोकसंख्येची संरचना MIS-५ या कालखंडात स्थिर झाली. तर आजच्या लोकसंख्येच्या डीएनएच्या विभाजनाचे सर्वात जुने पुरावे एक लाख २० हजार ते १ लाख ३५ हजार वर्षांदरम्यानच्या कालखंडातील आहेत. हे विभाजन झाल्यानंतरही लोकसंख्येचे स्थलांतर व विलिनीकरण होत राहिले, असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

डीएनए विभाजनानंतर एक गट पश्चिम, दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत वळला. आणि याच गटापासून सुमारे सहा लाख वर्षांपूर्वी फुटलेल्या एका लहान संचातून निअँडरथल्सचा जन्म झाला. तर दुसऱ्या गटाने लोकसंख्येच्या परिवर्तनीय वंशामध्ये योगदान दिले आहे. याचे सर्वाधिक पुरावे मेंडेमध्ये आहेत. ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ने केलेल्या संशोधनानुसार, निअँडरथल्स आणि आधुनिक मानवी वंश साडेसहा लाख ते पाच लाखवर्षांपूर्वी वेगळे झाले. यावरून हे सिद्ध होते की निअँडरथल्स आणि आधुनिक मानवी वंशांचे विभाजन होण्यापूर्वी त्या दोघांचेही एक समान पूर्वज होते. पहिल्या गटापासून निअँडरथल्सचे विभाजन झाल्यानंतर, गट १ (स्टेम १) आणि गट २ (स्टेम २) दोन्ही शेकडो हजारो वर्षांपर्यंत आफ्रिकेत वाढले. दक्षिण आफ्रिकेतील गट १ आणि गट २ च्या विलीनीकरणामुळे एक नवीन वंश निर्माण झाला ज्यामुळे शेवटी नामा आणि या प्रदेशातील इतर मानवी समूह अस्तित्त्वात आले. असेच विलिनीकरण पश्चिम आणि पूर्व आफ्रिकेतही झाले व त्यातूनच त्याभागातील व आफ्रिकेच्या बाहेरील आधुनिक मानवाचा जन्म झाला. याचाच अर्थ आज अस्तित्त्वात असलेल्या मानवी समूहांचे पूर्वज याच दोन गटातील आहेत. या सिद्धांताच्या पूर्ततेसाठी अभ्यासकांनी ब्रिटनच्या एका व्यक्तीच्या जनुकांची तुलना केल्यावर त्याचा संबंध निअँडरथल्सशी असल्याचे आढळले. यावरूनच जगभरातील आधुनिक मानवाचे पूर्वज आफ्रिकेतीलच वेगवेगळ्या भागांतून आले आणि जगात इतरत्र विखुरले, हे समजण्यास मदत होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New theory of human evolution who were human ancestors svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×