Army Captain Propose Girlfriend after Passing Out Parade: भारतीय सैन्यातील कॅप्टन भारत भारद्वाज यांचा ‘पासिंग आउट परेड’नंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅप्टन भारद्वाज यांनी त्यांच्या प्रेयसीला प्रपोज केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. नाशिक येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मध्ये नुकतीच ‘पासिंग आउट परेड’ पार पडली. दरम्यान, भारद्वाज यांच्या कृतीवर भारतीय सैन्याने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रेयसीला प्रपोज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय सैन्यदलाचा हा तरूण कॅप्टन चर्चेत आला आहे. भारतीय सैन्यदलाचे पायलट, कॅप्टन भारत भारद्वाज यांनी त्यांच्या प्रेयसीला लष्करी हेलिकॉप्टर समोर प्रपोज केल्याने वाद उद्भवला आहे. भारतीय सैन्याने व्हायरल व्हिडिओची दखल घेत भारद्वाज यांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रपोजशी संबंधित व्हायरल व्हिडिओमुळे भारताने सैन्यदलाने का नाराजी व्यक्त केली? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
नेमकं काय घडलं?
भारतीय सैन्यदलाचे कॅप्टन भारत भारद्वाज यांनी ‘पासिंग आउट परेड’ संपन्न झाल्यानंतर त्यांच्या प्रेयसीला इतर सैन्य अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसमोर प्रपोज केले. ही घटना २ जून, मंगळवार रोजी नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये घडली.
#WATCH | Maharashtra: The passing out parade at the Combat Army Aviation Training School in Nashik, concluded on an emotional note for a couple as Captain Bharat Bhardwaj proposed marriage to his partner. pic.twitter.com/8Un1ZNBP1F
— ANI (@ANI) June 2, 2026
प्रपोज करताना व्हिडिओत मागे एक लष्करी हेलिकॉप्टर असल्याचे दिसून येते. आपल्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर कॅप्टन भारद्वाज यांनी प्रेमाला महत्त्व देत प्रेयसीला प्रपोज करण्याची संधी साधली. त्यांनी नुकतीच फ्लाइट ट्रेनिंगही पूर्ण केली होती, अशी माहिती ‘द ट्रिब्यून’ वृत्तसंस्थेने दिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, कॅप्टन भारद्वाज हे लष्करी गणवेशात दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेयसीजवळ गुडघ्यावर बसून प्रेम व्यक्त केले व तिला एंगेजमेंट रिंग दिली. त्यानंतर इतरांना ही बाब लक्षात येताच त्यांनी कॅप्टनच्या प्रेयसीचे अभिनंदन केले. जोडप्याचे इतर अधिकाऱ्यांनी अभिनंदन केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, या प्रपोजचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. यूजर्सने व्हिडिओवर “हृदयस्पर्शी क्षण” अशा कमेंट्स केल्या. सैन्यात जाण्याचे स्वप्न व प्रेमाचे ध्येय एकदाच गाठल्याबद्दल अनेकांनी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
प्रपोज केल्यानंतर कॅप्टन भारद्वाज काय म्हणाले?
“आम्ही सर्वजण आज पायलट, इन्स्ट्रक्टर्स झालो आहोत. आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे. आमची मेहनत फळाला आली”, अशी प्रतिक्रिया कॅप्टन भारद्वाज यांनी सेरेमनीनंतर दिल्याचे ‘द स्टेट्समन’ मधील वृत्तात म्हटले आहे. हा क्षण फक्त स्वत:साठी महत्त्वाचा नसून कुटुंबासाठीही महत्वाचा आहे, असे भारद्वाज म्हणाले. त्यानंतर तरूण कॅप्टनने या क्षणाचा वापर प्रपोज करण्यासाठी का केला? याबाबत सांगितले. “लग्नासाठी तिला गळ घालण्याचा यापेक्षा चांगला दिवस असू शकतो, असे मला वाटत नाही. आजचा दिवस माझ्या बायकोसाठी पण कायम स्मरणीय राहावा अशी माझी इच्छा होती. हाच माझा विचार होता”, असे कॅप्टन भारद्वाज म्हणाले. दोघेही एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखतात, असेही कॅप्टन भारद्वाज यांनी सांगितले.
नाशिक येथील CAATS स्कूलमध्ये अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडते. त्यात हेलिकॉप्टर, पायलट ऑब्जर्व्हर, इन्स्ट्रक्टर आणि रिमोटली एअरक्राफ्ट सिस्टिम अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिले जाते. पासिंग आउट परेडमध्ये एकूण ५९ अधिकाऱ्यांना पदवी मिळाली. तर २५ अधिकाऱ्यांनी ‘बेसिक फ्लाइंग ट्रेनिंग’ पूर्ण केली.
सैन्याने का व्यक्त केली नाराजी?
भारतीय सैन्यदलाच्या नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (ऑथोरिटिनी) कॅप्टन भारद्वाज यांच्या प्रपोज करतानाच्या व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. आर्मीच्या सूत्रांनी ‘द ट्रिब्यून’ला दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन भारद्वाज यांच्या कमांडिंग ऑफिसरकडे आर्मीने नाराजी व्यक्त केली आहे. लिखित स्वरूपात नाराजी व्यक्त करणारे कोणतेही पत्र पाठवण्यात आलेले नाही. आर्मीच्या कार्यक्रमांमधील शिस्त जपण्यासाठी आर्मीकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कॅप्टन भारद्वाज यांच्यावर कारवाई होणार?
संरक्षण विभागातील सूत्रांच्या हवाल्याने ‘द प्रिंट’ने माहिती दिली की, तरूण अधिकाऱ्याने सैन्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्या वरिष्ठांना त्याच्याकडून या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यास सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टनच्या भावना आर्मीने समजून घेतल्या आहेत, परंतु, त्याने निवडलेली वेळ व ठिकाण अयोग्य होते. सैन्यसामग्रीचा वापर स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यासाठी आर्मी परवानगी देत नाही.
दरम्यान, कॅप्टन भारत भारद्वाज यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. कारण ते कॅप्टन भारद्वाज हे तरूण सैन्य अधिकारी आहेत. त्यांच्याकडून अक्षम्य असा गुन्हा घडलेला नाही. त्यांच्याबद्दल त्यांच्या वरिष्ठांना तंबी देण्यात आली आहे. तसेच त्यांना आर्मीचे नियम, वर्तन समाजावून सांगावे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
सैन्य गणवेशात प्रपोज करण्यास मनाई आहे का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सैन्य गणवेश हा अत्यंत सन्मानाने दिला जातो. त्यामुळे प्रत्येक जवानाने व अधिकाऱ्याने त्याचा मान राखला पाहिजे. सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करण्यास परवानगी नाही.” दरम्यान, गणवेश घालून प्रेयसीला प्रपोज करण्यास कोणतीही मनाई नाही, परंतु पासिंग आउट परेडसारख्या अधिकृत सैन्य कार्यक्रमांमध्ये तुम्ही या गोष्टी टाळायला हव्यात, असे एका लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
