Venezuela’s Nicholas Maduro Worshiped Sai Baba सध्या जगभरात व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष चर्चेत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अमेरिकने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतरच्या काही तासांतच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. “व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर होत नाही तोपर्यंत आम्ही त्या देशाचा कारभार पाहू,” अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी केली. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार याकडे संपूर्ण जगाचचं लक्षं लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर निकोलस मादुरो यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता जगभरात दिसून येत आहे. त्यांचं असचं एक कनेक्शन थेट भारताशीही आहे. ते भारतीय अध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबा यांचे भक्त आहेत. त्यांच्या याच पैलूचा घेतलेला हा आढावा.

१. पुट्टपर्थीची गुप्त तीर्थयात्रा (२००५)

निकोलस मादुरो राष्ट्राध्यक्ष होण्याच्या खूप आधी भारतात आले होते. त्यांनी घेतलेली ही सदिच्छा भेट राजकारणासाठी नव्हती तर, आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळवा यासाठी होती. मादुरो यांनी परराष्ट्रमंत्री असताना २००५ साली पत्नी सिलिया फ्लोरेससह आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी गाठले होते. तिथे त्यांनी प्रशांती निलयम आश्रमाला भेट दिली. याच आश्रमात त्यांची सत्यसाईबाबांशी खासगीत भेट झाल्याचे सांगितले जाते. या भेटी दरम्यानच्या दुर्मीळ छायाचित्रांमध्ये नंतर हुकूमशहा ठरलेले मादुरो पारंपरिक भारतीय पद्धतीने जमिनीवर बसून नम्रपणे गुरूंचे प्रवचन ऐकत असल्याचे दिसत आहे.

२. व्हेनेझुएला राष्ट्रपती भवनातही भारतीय गुरू

मिराफ्लोरेस पॅलेसला भेट देणारे पाहुणे अनेकदा राष्ट्रपतींच्या खासगी कार्यालयातील सजावटीकडे पाहून आश्चर्यचकित होत असत. सायमन बोलिव्हार आणि ह्यूगो चावेझ यांच्या क्रांतिकारी चित्रांमध्ये मादुरो यांनी सत्यसाईबाबांचे मोठे, चौकटीत बसवलेले छायाचित्र अत्यंत मानाच्या जागी ठेवले होते. त्यांच्या १३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्यावर विरोधकांचा आवाज दडपल्याचे आरोप झाले. परंतु, मादुरो यांना “सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा” असा संदेश देणाऱ्या भारतीय आध्यात्मिक गुरूंचे नेहमीच मार्गदर्शन मिळाल्याचे संगितले जाते.

३. पत्नीचा प्रभाव

मादुरो यांचे सत्यसाईबाबांशी आध्यात्मिक संबंध येण्यापूर्वी त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस या सत्यसाईबाबांच्या भक्त होत्या (आजही त्यांचे छायाचित्र उपलब्ध आहे). उपलब्ध माहितीनुसार मादुरोंच्या खूप आधीच सत्यसाईबाबांच्या संपर्कात होत्या. सत्तेतील आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलिया फ्लोरेस यांनी सत्तांतराच्या काळात मादुरो यांना साईबांच्या ‘संयम’ आणि ‘नियती’ या शिकवणींचा आधार देत सल्ला दिल्याचे सांगितले जाते. हा एक प्रकारचा ‘कौटुंबिक श्रद्धाविश्वास’ होता, या विश्वासानेच या दाम्पत्याला घट्ट जोडून ठेवलं. त्यांच्यावर ‘कार्टेल ऑफ द सनस्’शी संबंधित आरोप होत असतानाही हा विश्वास ढळला नाही.

४. अभूतपूर्व राष्ट्रीय शोक (२०११)

२०११ साली एप्रिल महिन्यात सत्यसाईबाबा यांचे निधन झाल्यानंतर व्हेनेझुएलाने असे काही केले जे इतर कोणत्याही लॅटिन अमेरिकन देशाने केले नव्हते. त्या वेळी परराष्ट्रमंत्री असलेल्या मादुरो यांच्या प्रभावाखाली, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेने अधिकृत शोक ठराव (Condolence Resolution) मंजूर केला. या ठरावानुसार एक दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला. तसेच भारतीय गुरूंच्या ‘मानवतेसाठी केलेल्या आध्यात्मिक योगदानाची’ आणि व्हेनेझुएलाच्या जनतेवर झालेल्या त्यांच्या प्रभावाची औपचारिक दखल घेण्यात आली.

५. ‘शताब्दी’ श्रद्धांजली (नोव्हेंबर २०२५)

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी मादुरो यांनी नेहमीच्या राजकीय संदेशांपासून थोडेसे दूर जात गुरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त सार्वजनिक श्रद्धांजली वाहिली. त्यांनी अधिकृत निवेदन जारी करून साईबाबांना ‘प्रकाशमय अस्तित्व’ असे संबोधले आणि म्हटले, “आम्ही जेव्हा भेटलो, ते क्षण मला नेहमी आठवतात… या महान गुरूंचे ज्ञान आम्हाला सतत प्रकाश देत राहो.” राजवट कोसळण्यापूर्वी त्यांनी केलेल्या मोजक्या राजकारणाबाहेरील कृतींपैकी ही एक होती, असे मानले जाते.

६. व्हेनेझुएलातील “साई नेटवर्क”

मादुरो यांच्या आशीर्वादाने व्हेनेझुएलामध्ये सत्यसाई संघटनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. इतर परदेशी स्वयंसेवी संस्थांना देशाबाहेर काढले जात असताना, ही संघटना मात्र मुक्तपणे कार्यरत राहिली. लॅटिन अमेरिकेत सत्यसाईबाबांच्या भक्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये व्हेनेझुएलाचा समावेश होतो. येथे १९७४ साली काराकासमध्ये पहिले केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रांना शाळा तसेच इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन व्हॅल्यूज चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. परिणामी, या आध्यात्मिक चळवळीचा प्रभावीपणे ढालीसारखा सॉफ्टपॉवर म्हणून वापर केला गेला, असे निरीक्षकांचे मत आहे.

निकोलस मादुरो यांची ही आध्यात्मिक बाजू त्यांच्या राजकीय प्रतिमेशी तीव्र विरोधाभास निर्माण करते. एका बाजूला सत्ता टिकवण्यासाठी कठोर निर्णय, दडपशाही आणि आंतरराष्ट्रीय आरोप; तर दुसऱ्या बाजूला “प्रेम, संयम आणि सेवा” यांचा संदेश देणाऱ्या भारतीय गुरूंवरील अढळ श्रद्धा. इतिहास अनेकदा अशाच विरोधाभासांनी घडतो. मादुरो यांच्या बाबतीतही सत्ता, श्रद्धा आणि राजकारण यांची ही गुंतागुंत समजून घेतल्याशिवाय त्यांचा प्रवास पूर्णपणे उलगडत नाही. त्यामुळेच ‘भारतीय बाबांचे अनुयायी’ असलेला हा व्हेनेझुएलाचा नेता केवळ एक हुकूमशहा न राहता, जागतिक राजकारणातील एक गुंतागुंतीचा आणि विसंगतींनी भरलेला अध्याय ठरतो.