Nirav modi brother Nehal Modi arrested पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी भारताच्या विनंतीवरून फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या धाकट्या भावाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. निहाल दीपक मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (४ जुलै) दिली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी दाखल केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर ही अटक करण्यात आली आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारताला माहिती दिली आहे की, ४६ वर्षीय निहाल आता कोठडीत आहे आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. निहाल मोदीवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या कलम ३ अंतर्गत मनी लाँडरिंगचा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब आणि २०१ अंतर्गत गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप आहे. कोण आहे निहाल मोदी? पीएनबी घोटाळ्यात त्याची भूमिका काय? अमेरिकेत त्याला कशी अटक करण्यात आली? त्याविषयी जाणून घेऊयात.

निहाल दीपक मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (५ जुलै) दिली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पीएनबी घोटाळ्यात निहाल मोदीची भूमिका काय होती?

पीएनबी घोटाळा २०१८ मध्ये उघडकीस आला होता. त्यात नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी यांनी पीएनबीच्या काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) द्वारे १३,६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. निहाल मोदीवर हे पैसे बेकायदापणे लाँडरिंग करण्याचा, पुरावे नष्ट करण्याचा आणि पैसे बनावट कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. निहालने नीरवच्या दोन बनावट कंपन्या व्यवस्थापित केल्या, ज्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर निहालने घोटाळ्यातील आणखी एक प्रमुख व्यक्ती मिहिर आर. भन्साळी याच्याशी समन्वय साधून दुबईतून ५० किलो सोने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाहेर काढली. त्याने चौकशीदरम्यान शेल कंपन्यांच्या डमी संचालकांनाही स्वतःचे नाव लपविण्यास सांगितले होते, त्यामुळे तपासातील गुंतागूंत आणखी वाढली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, निहालने नीरव मोदीला जाणीवपूर्वक मदत केली, त्याला अटक होण्यापासून वाचवले, परदेशी मालमत्ता सुरक्षित केल्या आणि सर्व अधिकार क्षेत्रातील वित्तीय नियामकांची दिशाभूल केली.

निहाल मोदी कोण आहे?

  • निहाल मोदीचा जन्म बेल्जियममधील अँटवर्प येथे झाला आहे.
  • निहाल मोदी प्रामुख्याने लक्झरी हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायात आहे. त्याचे व्यवसाय युरोप आणि अमेरिकेत आहेत.
  • इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषेत चांगले ज्ञान असलेल्या निहाल मोदीने यापूर्वी त्याच्या भावाशी संबंधित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
  • त्यात फायरस्टार इंटरनॅशनल आणि अमेरिकेतील ए. जाफे या ज्वेलरी कंपनीचा समावेश आहे.
  • २०२० मध्ये न्यूयॉर्कमधील एका वेगळ्या चोरीच्या प्रकरणातही त्याचे नाव आले होते. या प्रकरणात सरकारी वकिलांनी त्याच्यावर एका लक्झरी ज्वेलरची २.६ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
  • त्याच्यावर अमेरिकेत हा खटला अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्यार्पणामध्येदेखील अडचण निर्माण होऊ शकते.

निहालला अटक कशी झाली?

२०१९ मध्ये इंटरपोलने निहाल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यानंतर त्याचा शोध जागतिक स्तरावर सुरू झाला. २०२१ मध्ये सीबीआय आणि ईडीने अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. तो अमेरिकेत असल्याची माहिती भारताकडे होती. अलीकडेच, भारताच्या विनंतीवरूनच अमेरिकन अधिकाऱ्यांनी निहालला अटक केली आहे. त्याला होनोलुलु येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सीबीआय आणि ईडी त्याच्या प्रत्यार्पणासाठी काय करत आहेत?

निहाल मोदीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी दोन्ही यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र येऊन काम करत आहेत. पीएनबी प्रकरणातील ईडीच्या आरोपपत्रात त्याचे नाव आहे. त्याच्यावर लाँडरिंग आणि घोटाळ्यानंतरची मालमत्ता लपवण्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांचा असा युक्तिवाद आहे की, निहाल केवळ या प्रकरणातच सहभागी नव्हता तर तपासातदेखील त्याने अनेक अडचणी निर्माण केल्या, त्यामुळे या प्रकरणातील त्याची भूमिका महत्त्वाची आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या विनंतीवरून सांगितले, “ही अटक न्यायाच्या आमच्या प्रयत्नात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे ते म्हणाले.

निहाल मोदीची प्रत्यार्पण प्रक्रिया कशी पार पडणार?

निहाल मोदीला आता अमेरिकेच्या न्यायालयात प्रत्यार्पणाच्या सुनावणीला सामोरे जावे लागेल. त्यावेळी भारत ईडी आणि सीबीआयच्या आरोपपत्रांसह औपचारिक कागदपत्रे, त्याच्या सहभागाचे पुरावे आणि साक्षी सादर करण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेला काही महिन्यांचा वेळ लागू शकतो. भारतीय अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे की, त्याच्या अटकेमुळे या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळेल. विशेषतः भारताला परदेशी शेल कंपन्या, बेकायदा मालमत्ता हस्तांतरण आणि नीरव मोदीच्या उर्वरित जागतिक होल्डिंग्जची माहिती मिळणे अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ पासून युनायटेड किंग्डममध्ये असलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू असताना निहाल मोदीला अटक होणे, भारतासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. कायदेतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अमेरिकेच्या या कारवाईमुळे नीरवच्या नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो आणि कदाचित त्याच्या आणखी काही मालमत्ता उघड होऊ शकतात. भारतीय बँकिंग इतिहासातील पीएनबी घोटाळा हा सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक आहे. नीरव आणि निहाल हे दोघेही आता वेगवेगळ्या अधिकारक्षेत्रात प्रत्यार्पणाच्या कारवाईला सामोरे जात आहेत.