पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्करासंदर्भातील आणि ऑपरेशन सिंदूरबाबतची संवेदनशील माहिती लिक करण्याविरोधातही कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास १२ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, लंडनस्थित एका महिला प्राध्यापकाचा ओसीआय दर्जा भारतविरोधात द्वेष पसरवण्याच्या संशयावरून रद्द करण्यात आला आहे. लंडनमधील भारतीय वंशाच्या शिक्षणतज्ज्ञ व प्राध्यापक निताशा कौल यांचा ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया हा दर्जा भारत सरकारने रद्द केला आहे. निताशा यांच्यावर भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप भारताने केला आहे. कौल यांनी स्वत: हे जाहीर केले आहे.
मूलत: काश्मिरी पंडित आणि ब्रिटिश नागरिक असलेल्या कौल सध्या लंडनमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठात राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागात प्राध्यापक म्हणून काम करतात.
ओसीआय दर्जा म्हणजे काय?
ओसीआय म्हणजेच ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया हा परदेशी नागरिकत्व स्वीकारलेल्या भारतीय वंशाच्या लोकांना दिलेला एक विशेष दर्जा आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या दर्जामुळे त्यांना भारतात कायमचे वास्तव्य करणे, आजीवन व्हिसा यांसारख्या सुविधा मिळतात. त्यामुळे त्यांना निर्बंधांशिवाय प्रवास करण्याची आणि राहण्याची परवानगी मिळते.
कौल यांचा ओसीआय दर्जा रद्द करण्याचे नेमके कारण काय होते? त्यांनी नेमके असे काय केले? याबाबतची माहिती जाणून घेऊ…
दर्जा रद्द करण्याचे कारण काय?
१८ मे रोजी प्राध्यापक निताशा कौल यांनी सोशल मीडियावर भारत सरकारकडून त्यांचा ओसीआय दर्जा रद्द केल्याची माहिती शेअर केली. त्यांना मिळालेल्या अधिकृत पत्राचा एक फोटोही त्यांनी पोस्ट केला.
चित्रात दिसणाऱ्या पत्राच्या भागावरून असे दिसते की, हा निर्णय भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी, द्वेष पसरवणे अशा संशयावरून घेण्यात आला आहे.
“विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे लेखन, भाषणे व पत्रकारितेच्या कारवाया यांद्वारे तुम्ही नियमितपणे भारताच्या सार्वभौमत्वाच्या बाबींवर भारत आणि त्याच्या संस्थांना लक्ष्य करीत आहात”, असे कागदपत्रात म्हटले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये कौल यांना बंगळुरू विमानतळावर आगमन करताच भारतात प्रवेश नाकारण्यात आला होता. तेव्हाच्या घटनेनंतर आता ही कारवाई झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने त्यांना बंगळुरूमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर’ बोलण्यासाठी आमंत्रित केले होते.
कौल यांनी याबाबत असा प्रत्यारोप केला की, अनौपचारिकपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेचा उल्लेख करीत इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला प्रवेश नाकारला.
विश्व हिंदू परिषदेच्या कर्नाटक शाखेचे नेते गिरीश भारद्वाज यांनीही या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्या गेलेल्या निमंत्रणावर आक्षेप घेतला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कौल यांचा ओसीआय दर्जा रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कौल यांनी असा दावा केला, “सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवल्यानंतर त्यांना झोपण्यासाठी अरुंद जागा, तसेच अन्न आणि पाण्याची सोय नसताना २४ तास ताब्यात ठेवल्यानंतर लंडनला पाठवण्यात आले.”
निताशा कौल कोण आहेत?
- निताशा कौल यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये झाला. जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगरमधल्या जुन्या शहरातून स्थलांतरित झालेले हे काश्मिरी पंडित कुटुंब आहे.
- त्या नवी दिल्लीत होत्या आणि तिथेच त्यांनी सेंट थॉमस स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स ही पदवी मिळवली.
१९९७ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी त्या उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. त्यांनी तेथे सार्वजनिक धोरणात विशेषज्ञतेसाठी अर्थशास्त्रातून पदव्युत्तर पदवी आणि यूकेच्या हल विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञानात संयुक्त पीएच.डी. पूर्ण केली, अशी माहिती त्यांच्या एक्स प्रोफाइलवर लिंक केलेल्या बायोडेटामध्ये आहे.
- २००२ ते २००७ पर्यंत कौल यांनी ब्रिस्टल बिझनेस स्कूलमध्ये अर्थशास्त्राच्या सहायक प्राध्यापक म्हणून काम केले.
- २०१० मध्ये कौल यांनी भूतानमधील रॉयल थिम्पू कॉलेजमध्ये सर्जनशील लेखनात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले.
- कौल सध्या लंडनमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील स्कूल ऑफ सोशल सायन्सेस येथे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेमोक्रसी (CSD)च्या संचालक आहेत.
- त्यांचे शैक्षणिक संशोधन उजव्या विचारसरणीचे राजकारण, भारतातील हिंदुत्व प्रकल्प आणि काश्मीरचा इतिहास व राजकारण यावर केंद्रित आहे.
- त्यांची ओळख ‘काश्मिरी कादंबरीकार’ म्हणूनही आहे. रेसिड्यू, फ्युचर टेन्स आणि इमॅजिनिंग इकॉनॉमिक्स अदरसाईड अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
- त्यांची पहिली कादंबरी रेसिड्यू अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञानावर आधारित आहे. २००९ च्या मॅन एशियन लिटररी प्राइजसाठी त्यांची निवड झाली होती. त्यामुळे त्या अशी ओळख मिळविणाऱ्या आशियातील पाच महिलांपैकी एक ठरल्या.
- रेसिड्यू आणि फ्युचर टेन्स या पुस्तकांमध्ये काश्मीरची ओळख, विस्थापन यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.