कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) महत्त्व वाढत असल्याने मोठ्या कंपन्या एआय तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करत आहेत. या वाढत्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार डेटा सेंटरसाठी स्वतंत्र धोरण तयार करत आहे. मात्र, अशा प्रकल्पांना मंजुरी देताना केवळ गुंतवणुकीची आश्वासनं न पाहता वीज आणि पाण्याची उपलब्धता, पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा प्रत्यक्ष फायदा तपासावा, अशी शिफारस नीति आयोगाच्या फ्रंटियर टेक हबने केली आहे.
महाराष्ट्रात यंदा दुष्काळ आणि पाणीटंचाईचा प्रश्न गडद झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर मान्सूनमध्ये सुमारे १२ ते १३ टक्के तूट राहिली, ज्यामुळे ऐन पेरणीच्या आणि पिके बहरण्याच्या काळात पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे जलस्रोतांचे नियमन करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत डेटा सेंटर उभारण्यात येणाऱ्या भागांत प्रकल्पांना किती पाणी लागणार, त्यासाठी स्थानिक जलस्रोतांवर किती ताण येऊ शकतो आणि त्या भागात ही गरज भागवण्यासाठी पुरेसं पाणी आहे का, हे तपासणं आवश्यक ठरतं. नीति आयोगाच्या प्रस्तावानुसार, डेटा सेंटर उभारण्यासाठी केवळ गुंतवणुकीची आकडेवारी पुरेशी ठरणार नाही; प्रकल्पासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता आणि त्यातून होणारे प्रत्यक्ष फायदेही विचारात घेण्याची आवश्यकता आहे.
अॅमेझॉन आणि गूगलसारख्या कंपन्यांचे ठाणे आणि विशाखापट्टणममध्ये मोठे डेटा सेंटर उभारले जात आहेत. मात्र, या प्रकल्पांसाठीच्या वीज आणि पाण्याच्या वाढत्या गरजेमुळे पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, यामुळे स्थानिक नागरिक या प्रकल्पांना विरोध करत आहेत.
डेटा सेंटरच्या वीजवापराबाबत काय शिफारस?
डेटा सेंटरला मंजुरी देण्याआधी वीजपुरवठ्याचं नियोजन पूर्ण असावं असं नीति आयोगाच्या आराखड्यात सुचवण्यात आले आहे. यासाठी प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्या, वीज वितरण कंपन्या आणि राज्याच्या वीज पारेषण यंत्रणेने एकत्रितपणे आराखडा तयार करावा. प्रकल्पाला किती वीज लागेल, किती वीज उपलब्ध असेल आणि वीजपुरवठ्यासाठी कोणत्या पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील याचा तपशील त्यात असावा.
२० मेगावॅटपेक्षा जास्त वीज लागणाऱ्या डेटा सेंटरसाठी विजेची मागणी नियंत्रित करणारी स्वयंचलित यंत्रणा असणं बंधनकारक असणार आहे, अशी शिफारसही करण्यात आली आहे. ही यंत्रणा राज्यातील वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्रांसोबत (स्टेट लोड डिस्पॅच सेंटर) जोडलेली असावी, त्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल राखण्यास मदत होईल.
डेटा सेंटरसाठी स्वतंत्रपणे उभारण्यात येणाऱ्या वीज सुविधांचा खर्च संबंधित कंपनीने करावा. मात्र, सामायिक ग्रीड सुधारणांचा (Shared Grid Upgrades) खर्च सर्व लाभार्थ्यांमध्ये विभागला गेला पाहिजे. आवश्यक पायाभूत सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतरच अतिरिक्त वीज वापरण्याची मंजुरी द्यावी, असेही आयोगाने सुचवले आहे.
डेटा सेंटरसाठी केवळ विजेची उपलब्धता किती हे पाहणे महत्त्वाचे नसून तिचा वापर किती कार्यक्षमतेने होतो आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, हेही तपासण्याची शिफारस नीति आयोगाने केली आहे. डिझेल जनरेटरला पर्याय शोधण्यावर आणि वीज साठवण्याच्या सुविधांसह अक्षय्य ऊर्जेचा (Renewable Energy) वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, सौर किंवा पवन ऊर्जेमुळे अथवा बॅटरीत वीज साठवल्यामुळे वीजजाळ्यावरील भार कमी होईल, असा दावा केवळ कागदावर स्वीकारला जाणार नाही. त्यासाठी संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष सुरू झाली आहे आणि अपेक्षित परिणाम दिसत आहेत, याची खात्री करणे आवश्यक असणार आहे.
नीति आयोगाच्या प्रतिष्ठित फेलो देबजानी घोष यांनी सांगितलं की, राज्यांनी विजेची मागणी वाढल्यानंतर पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी त्याचं आधीच नियोजन करावं. वीज आणि पाण्यासारख्या संसाधनांची कमतरता कुठे भासू शकते हे वेळेत ओळखावं. तसंच, कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा रोजगारनिर्मिती, कौशल्य प्रशिक्षण, देशांतर्गत खरेदी, नवकल्पना आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराशी संबंध जोडावा अशा प्रकारची चौकट नीति आयोग आखून देतो.
त्या पुढे म्हणाल्या, “नवे नियम किंवा अटी लादणे हा या धोरणाचा उद्देश नाही. त्याऐवजी योग्य निर्णय घेणे, उद्योगांना योग्य प्रोत्साहन देणे आणि कामांचा वेग वाढवणे हा मुख्य हेतू आहे. यामुळे नागरिक किंवा पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न होता, भारत हा जगभरातील ‘डेटा सेंटर्स’ उभारण्यासाठी आणि ते उत्तम प्रकारे चालवण्यासाठी सर्वांत सुरक्षित व सर्वोत्तम देश बनेल.”
डेटा सेंटरना सवलती देताना राज्यांनी काय पाहावं?
डेटा सेंटर उभारण्यासाठी कंपन्या किती गुंतवणूक करणार आहेत, केवळ या निकषावर आधारित राज्यांनी त्यांना सवलती देऊ नयेत, अशीही शिफारस नीति आयोगाने केली आहे. त्याऐवजी सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा खर्च वजा केल्यानंतर त्या प्रकल्पामुळे राज्याला प्रत्यक्षात किती आर्थिक फायदा होतो याचा हिशेब मांडावा. यामध्ये सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींची आणि प्रकल्पाच्या फायद्यांची थेट तुलना केली जाईल. एकीकडे जमिनीचा दर, वीज, पायाभूत सुविधा, करमाफी आणि भांडवली खर्चातील सरकारी मदतीचा हिशोब केला जाईल; तर दुसरीकडे या प्रकल्पातून सरकारला किती कर (महसूल) मिळणार, किती रोजगार निर्माण होणार, स्थानिक खरेदी, संशोधन आणि कौशल्य विकासाचा लोकांना किती फायदा होणार याचा लेखाजोखा मांडला जाईल.”
या धोरणात पायाभूत सुविधा पुरवणारे डेटा सेंटर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग, जीपीयू (GPU) कॉम्प्युटिंग तसेच इतर डिजिटल सेवा देणारे डेटा सेंटर्स, या दोघांमध्ये फरक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत किंवा सवलती थेट न देता, ठरवून दिलेली कामे पूर्ण झाल्यानंतरच (Milestones) टप्प्याटप्प्याने दिल्या जाव्यात. यामध्ये प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणे, अक्षय ऊर्जेचा वापर, वीज व पाण्याचा कार्यक्षम वापर, स्थानिक साहित्याची खरेदी आणि प्रत्यक्ष नोकरभरती या अटींना अनुसरूनच सवलती दिल्या जाव्यात. जर कंपन्यांनी दिलेले शब्द किंवा अटी पूर्ण केल्या नाहीत, तर त्यांना मिळणाऱ्या सवलती निलंबित (रद्द) करण्याची तरतूद असावी, असेही यात सुचवण्यात आले आहे.
पाणी आणि पर्यावरणीय नियमांबाबत काय शिफारसी?
डेटा सेंटर्ससाठी पाण्याचा वापर कसा होणार आणि पर्यावरणाचे रक्षण कसे केले जाणार, याबाबत नीति आयोगाच्या आराखड्यात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, राज्य सरकारांनी आपल्या भागातील भूजल, नद्या-तलाव, महापालिकेचा पाणीपुरवठा आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी हे सर्व विचारात घेऊन पुढील २० ते ३० वर्षांचा पाणी आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या पाहणीत स्थानिक नागरिक आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजांचाही प्राधान्याने विचार करावा.
पाणीटंचाई असलेल्या भागांत डेटा सेंटरसाठी पाणी कुठून आणलं जाणार आहे, याची स्वतंत्र पडताळणी करावी. पाण्याचा वापर मोजण्यासाठी यंत्रणा बसवावी आणि त्याचा नियमित अहवाल द्यावा. शक्य तिथे ताज्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर वाढवावा, अशी शिफारसही करण्यात आली आहे.
डेटा सेंटर उभारण्यासाठी राज्यांनी योग्य ठिकाणं आधीच निश्चित करावीत. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागांत अशा प्रकल्पांना मर्यादा घालाव्यात. मोठ्या डेटा सेंटर प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांवर काय परिणाम होईल याचाही अभ्यास करावा. यात पाण्याची उपलब्धता, वाहतूक, प्रदूषण, आवाजाची पातळी, कचरा आणि स्थानिक रोजगार या मुद्द्यांचाही समावेश असावा, असं आयोगाने सुचवलं आहे.
या धोरणात डेटा सेंटर चालकांनी दिलेल्या शब्दांचे आणि नियमांचे पालन केले आहे की नाही याची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी एका मध्यवर्ती ऑडिट यंत्रणेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) हे मुख्य नोडल मंत्रालय म्हणून काम करणार आहे.
भारतात हा मुद्दा इतका महत्त्वाचा का बनला आहे?
जागतिक तंत्रज्ञान कंपन्या क्लाउड कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला (AI) लागणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत असल्याने भारतात डेटा सेंटर्सचा वेगाने विस्तार होत आहे. ‘जेएलएल’ (JLL) या रिअल इस्टेट सल्लागार संस्थेच्या अहवालानुसार, २०२६ च्या मध्यापर्यंत भारतातील डेटा सेंटरची क्षमता सुमारे १.६ गिगावॉट (GW) वर पोहोचली आहे. २०२९ पर्यंत ती ६ गिगावॉटवर जाण्याची शक्यता आहे, ज्यासाठी तब्बल ११० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज भासणार आहे.
याच पार्श्वभूमीवर, गूगलने विशाखापट्टणममध्ये १५ अब्ज डॉलरच्या एआय (AI) इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीची घोषणा केली आहे, तर ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टदेखील भारतातील त्यांच्या डेटा सेंटर्सचा विस्तार करत आहेत.
डेटा सेंटर प्रकल्पांना स्थानिक नागरिकांचा विरोध का होतोय?
ठाण्यातील एका निवासी परिसरात ॲमेझॉनच्या प्रस्तावित ५३ एकर डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीजपुरवठ्यावर प्रचंड ताण येऊ शकतो, पाण्याची उपलब्धता कमी होऊ शकते, तसेच ध्वनिप्रदूषण आणि हवेचे प्रदूषण वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ४२२ मेगावॉट (MW) विजेची गरज असून आणीबाणीच्या प्रसंगी १९३ बॅकअप डिझेल जनरेटर्स वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला ॲमेझॉनने स्पष्टीकरण दिले आहे की, ते कूलिंगसाठी पाण्याचा वापर न करता ‘क्लोज्ड-लूप कूलिंग सिस्टीम’ वापरतील आणि स्थानिक ग्रीडवर ताण न पाडता थेट हाय-व्होल्टेज लाईनद्वारे वीज घेतील.
पर्यावरणवादी संघटनांनीही विशाखापट्टणममधील गूगलच्या (Google) प्रस्तावित प्रोजेक्टला जोरदार विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे या भागात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते, तसेच वन्यजीव आणि जमिनीच्या वापरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या विरोधावर स्पष्टीकरण देताना गूगलने म्हटले आहे की, “आम्ही अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, ज्यामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाहीत.”
महाराष्ट्रातही आधीच पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, डेटा सेंटर्सच्या अमर्याद गरजा आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांच्यात समतोल कसा साधायचा हे आव्हान असणार आहे. केवळ भव्य आकडेवारी दाखवून प्रकल्प लादण्यापेक्षा, स्थानिक पर्यावरणाचा बळी न देता शाश्वत विकास साधला तरच ही ‘डिजिटल प्रगती’ साधता येणे शक्य होणार आहे.
