बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काही महिने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु होती. मात्र प्रचारात शंभरावर सभा घेत नितीशकुमार यांनी राज्याच्या राजकारणात आपल्याशिवाय विजयाचा लंबक दुसरीकडे जाऊ शकत नाही हे दाखवून दिले. त्यातूनच ‘पच्चीस ते तीस, फीर एक बार नितीश ही घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिली. मतदारांनी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआला) अभूतपूर्व बहुमत दिले. या महाविजयास कारणीभूत ठरलेले घटक

महिला मतदारांची साथ

बिहारच्या निवडणूक रणांगणात एका बाजूला रालोआ तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस तसेच डावे पक्ष यांची महाआघाडी असा सामना होता. मात्र निकाल पाहता हा सामना रंगलाच नाही. रालोआने २४३ पैकी दोनशेवर जागा घेत प्रचंड विजय मिळवला. यात सर्वच जात समुदायांनी साथ दिली असतली तरी, विशेषत: महिला मतदारांचे प्रचंड मतदान विजयासाठी महत्त्वाचे ठरले. पुरुष मतदारांपेक्षा दहा टक्के अधिक मतदान यंदा महिलांचे होते. आकडेवारीच्या भाषेत राज्यभरात चार लाखांहून अधिक महिलांचे मतदान यंदा झाले. निकालातून त्यांचे अपेक्षित प्रत्यंतर उमटले. ‘जिविका दीदी’सारखी दहा हजार रुपये देणारी योजना महत्त्वाची ठरली. मतदानापूर्वी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर नितीशकुमार यांच्याबाजूने महिलांनी वारंवार कौल दिला आहे. त्याला दारुबंदीसारखे धोरणही कारणीभूत ठरले. यातून महिलांविरुद्धच्या घरगुती हिंसाचारात घट झाली. त्या तुलनेत घरटी एकाला सरकारी नोकरी देऊ हे राजदचे आश्वासन प्रभावी ठरले नाही.

सामाजिक समीकरण प्रभावी

राज्यात यादव वगळता इतर मागासवर्गीय समाज तसेच तसेच त्यातील अतिमागास असा उपगट यांची संख्या जवळपास ३६ टक्के आहे. हा समाज सातत्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मागे उभा राहिला. तर १४ टक्के यादव व १७ टक्के मुस्लिम असा राष्ट्रीय जनता दलाचा भक्कम आधार मानला जातो. मात्र त्यामध्येही फूट पडली. मोठ्या संख्यने मुस्लिम समाजाने नितीनकुमार यांना साथ दिल्याचे निकालातून दिसते. जवळपास २० टक्के दलित आहेत. त्यांची साथही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाली. याखेरीज खुल्या गटातील १५ टक्के समुदायाचा पाठिंबा रालोआला होता. तोही भक्कमपणे मागे राहिला. एकूणच सामाजिक समीकरणात रालोआने सहज मात दिली.

वाढत्या मतदानाचा लाभ

बिहारमध्ये यंदा विक्रमी दोन टप्प्यांत सरासरी ६७ टक्के मतदान झाले. यात निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम राबवला त्यातून जवळपास ५० लाख मते वगळण्यात आली. त्यामुळे जरी ही सहा टक्के मतांची टक्केवारी कमी झाली तरी, ६२ टक्के मतदान हेदेखील मोठे ठरले. त्यातच यंदा हवामानाने साथ दिली. दिवाळीनंतर छटपूजेच्या आसपास यावेळी मतदान होते. यासाठी स्थलांतरित मतदार मोठ्या संख्येने आपल्या गावी केला होता. त्याला मतदानासाठी थांबवण्यात राजकीय पक्षांना यश मिळाले. वाढते मतदान सत्ताविरोधी मानले जाते. बिहारमध्ये मात्र हे मतदान सत्तेला अनुकूल ठरले. बिहारमध्ये दोन दशके २००५ पासून नितीशकुमार सत्तेत आहेत. तरीही त्यांच्या विरोधात संताप नव्हता. हे सारे घटक रालोआला अनुकूल ठरले.

आघाड्यांमध्ये समन्वय

भाजपने संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांचे मोठेपण मान्य करत दुय्यम भूमिका घेतली. तसेच चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने गेल्या म्हणजे २०२० मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांची सहा टक्के मते रालोआच्या मागे आली. या आघाडीत समन्वय उत्तम होता. उलट विरोधी महाआघाडीत अधिकृत जागा वाटप जाहीर करण्यास विलंब लागला. त्यात १२ जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार उभे करण्यात आले. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यासही विलंब लागला. परिणीमी आघाडीत समन्वय राहिला नाही. निवडणूक निकालात हा फटका बसला.

प्रशांत किशोर अपयशी

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षाने समाजमाध्यमाच्या मदतीने वातावरणनिर्मिती मोठ्या प्रमाणात केली होती. त्यांना एकही जागा मिळाली नाही. दोन टक्क्याच्या आसपास मते मिळाली. संयुक्त जनता दलाला २५ जागाही मिळणार नाहीत असे भाकित त्यांनी वर्तवले होते. तेही साफ चुकले. आता किशोर पुढील पाच वर्षे कितपत मेहनत घेतात त्यावर पुढील चित्र अवलंबून आहे. त्या तुलनेत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला पाच जागा मिळाल्या. त्यांना दोन टक्के मते पडली.

मुस्लिम मते

मुस्लिमबहुल सीमांचल विभागात रालोआला अनेक ठिकाणी चांगली मते मिळाली. एकूणच रालोआने ५० टक्क्यांच्या आसपास मते मिळवत बिहारची निवडणूक एकतर्फी केली. त्याचे परिणाम देशाच्या राजकारणावर होतील. विशेषत: विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘मतचोरी’च्या मुद्द्याचे काय, होणार हे पाहावे लागेल. मात्र दोन दशके मुख्यमंत्रीपदावर राहूनही ७४ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचे निकालाने दाखवून दिले.