New Zealand education for Indian students परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंड हे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान न्यूझीलंडमध्ये ८५,५३५ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षणासाठी आल्याची नोंद आहे. ‘आयसीईएफ’च्या एका अभ्यासानुसार, त्यापैकी जवळपास १२,००० विद्यार्थी भारतीय होते. ऑकलंड विद्यापीठाचे डेप्युटी व्हाईस-चांसलर डॉ. एरिक लिथाँडर यांनी’फायनान्यल एक्स्प्रेस’शी या विषयावर संवाद साधला. न्यूझीलंडकडे सर्वांचे लक्ष का वेधले जात आहे, भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारामुळे गोष्टी कशा बदलू शकतात आणि येणाऱ्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सोयी मिळतील? याविषयी ते बोलले आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांची न्यूझीलंडला पसंती का?
अनेक भारतीय कुटुंबांसाठी आपल्या पाल्याला परदेशात पाठवणे हा एक मोठा निर्णय असतो. जागतिक अनिश्चिततेच्या काळात हा निर्णय घेताना सुरक्षितता, स्थिरता आणि संधींना आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आले आहे. लिथाँडर यांनी नमूद केले की, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका यांसारख्या इतर प्रमुख देशांनी अलीकडच्या वर्षांत अनेक धोरणात्मक बदल केले आहेत.
मात्र, न्यूझीलंडने स्वतःची प्रतिमा एक स्थिर ठेवली आहे. “परदेशात शिकण्याचा निर्णय हा नेहमीच मोठा असतो. पण, सध्याच्या काळात, भू-राजकीय तणाव वाढत आहे आणि न्यूझीलंड हा कुटुंबांसाठी एक सुज्ञ पर्याय ठरत आहे. त्यांना माहीत आहे की त्यांची मुले एका स्थिर आणि सुरक्षित वातावरणात असतील,” असे लिथाँडर म्हणाले.
भारत-न्यूझीलंड कराराचा विद्यार्थ्यांना फायदा
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराकडे दोन्ही देशांतील संबंधांना मोठी गती देणारा करार म्हणून पाहिले जात आहे. ते म्हणाले, “भारत आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत. अशात या कराराचा होणारा संभाव्य परिणाम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.” या करारानुसार भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसावर कोणतीही मर्यादा नसल्यामुळे, याचा विद्यार्थ्यांच्या ओघावर सकारात्मक परिणाम होईल आणि भारतामध्ये न्यूझीलंडची प्रतिमा अधिक उंचावेल, असे त्यांनी नमूद केले.
त्यांना विचारण्यात आले की, न्यूझीलंड अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कशी तयारी करत आहे. त्यावर ते म्हणाले, “आमच्याकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची उत्तम काळजी घेण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा आहेत.” यामध्ये पहिल्या वर्षासाठी निवासाची हमी, जेवणासह निवासाचे पर्याय, शैक्षणिक मदत आणि घराची आठवण येणाऱ्या किंवा काळजीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वेल-बीइंग’ सेवांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांसाठी पदवीइतकेच महत्त्वाचे असते ते म्हणजे पदवीनंतर काय? “एफटीएअंतर्गत STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) आणि संशोधन क्षेत्रातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी पदवीनंतरच्या कामाचे अधिकार वाढवण्यात आले आहेत.” सध्या विद्यार्थी शैक्षणिक सत्रादरम्यान दरमहा २५ तास आणि सुट्ट्यांमध्ये पूर्णवेळ काम करू शकतात. या बदलांमुळे न्यूझीलंड अशा तरुण, कुशल भारतीयांसाठी आकर्षक ठरेल अशी खात्री लिथाँडर यांना आहे. ऑकलंड विद्यापीठात रोजगारावर विशेष भर दिला जातो. हे विद्यापीठ ‘QS’ क्रमवारीत ६५ व्या क्रमांकावर आहे.
ऑकलंड हे न्यूझीलंडमधील सर्वोच्च क्रमांकाचे विद्यापीठ आहे. तसेच २०२५ मध्ये जगभरातील ‘इनोव्हेटिव्ह अँड आंत्रप्रेन्योरियल युनिव्हर्सिटी ऑफ द इयर’ म्हणूनही त्याचा गौरव झाला आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंडपर्यंत थेट विमानसेवा नसणे ही एक मोठी अडचण आहे. “एफटीएच्या घोषणेचा एक भाग म्हणून असे नमूद करण्यात आले आहे की, एक एअरलाईन आता भारत आणि न्यूझीलंडदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची योजना आखत आहे,” अशी माहिती लिथाँडर यांनी दिली. थेट कनेक्टिव्हिटीमुळे केवळ प्रवास सोपा होणार नाही तर व्यापार, शिक्षण आणि पर्यटन संबंधही दृढ होतील असे त्यांचे सांगणे आहे.
परदेशस्थ भारतीयांची ताकद
नवीन विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंडमधील भारतीय समुदाय ही मोठी आधारयंत्रणा आहे. लिथाँडर म्हणाले, “न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाने अलीकडेच चिनी समुदायाला मागे टाकले आहे. हे लोक प्रामुख्याने ऑकलंडमध्ये केंद्रित आहेत.” भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक आहे. त्यांना पहिल्या दिवसापासूनच त्यांची संस्कृती, समुदायाचा पाठिंबा आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होतील. त्यांच्या विद्यापीठातच ८,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये सुमारे ८०० भारतीय विद्यार्थी असल्याचे ते सांगतात.
आयआयटी दिल्ली आणि न्यूझीलंडमधील शैक्षणिक संबंध
सखोल शैक्षणिक संबंधांबद्दल बोलताना त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली येथील ‘न्यूझीलंड सेंटर’चे महत्त्व स्पष्ट केले. “आयआयटी दिल्ली हे एक प्रतीक आहे. ही न्यूझीलंडमधील सर्व आठ विद्यापीठांचे संघटन आणि भारतातील एका प्रमुख संस्थेची भागीदारी आहे,” असे ते म्हणाले. स्टुडंट एक्स्चेंज कार्यक्रमही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या अंतर्गत अलीकडेच न्यूझीलंडमधील आठ विद्यापीठांतील २० विद्यार्थ्यांनी नाविन्यता आणि उद्योजकता शिकण्यासाठी भारतात सहा आठवडे घालवले.
बदल घडवून आणणाऱ्या शिष्यवृत्ती
आर्थिक मदत हा भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा आणखी एक घटक आहे. विद्यापीठ २०,००० NZD (सुमारे १०,९०,३०० रुपये) पर्यंतची ‘इंडिया हाय अचिव्हर स्कॉलरशिप’ देते. याशिवाय न्यूझीलंडमध्ये १०,००० NZD पर्यंतच्या ‘इंटरनॅशनल स्टुडंट एक्सलन्स स्कॉलरशिप्स’ आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘न्यूझीलंड एक्सलन्स अवॉर्ड्स’देखील उपलब्ध आहेत. “शिष्यवृत्ती मिळवणे ही प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो,” असे त्यांनी सांगितले.
अर्ज करताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
लिथाँडर यांनी भारतीय अर्जदारांना सल्ला दिला. ते म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अशा विषयाचा अभ्यास करावा, ज्यामध्ये त्यांना रस आणि आवड आहे. केवळ करायचे म्हणून एखादा विषय निवडण्यात अर्थ नाही.” त्यांनी विद्यार्थ्यांना प्रसिद्धीपेक्षा शैक्षणिक दर्जा आणि प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की अर्जदारांनी त्यांच्या कागदपत्रांमध्ये सुसंगतता ठेवली पाहिजे.
ते म्हणाले, “संपूर्ण प्रक्रियेत सारखीच माहिती दिली पाहिजे आणि विद्यापीठांशी संवाद साधताना तत्पर राहिले पाहिजे. निष्काळजीपणा किंवा उशीर झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. लिथाँडर यांनी म्हटले की, या जागतिक अनिश्चिततेच्या काळात विद्यार्थ्यांचे निर्णय पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात. भारताबाहेरील पर्यायांचा विचार करणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंड आता एक सुरक्षित पर्याय वाटू लागला आहे.
