Who is Navi Pillay : दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ न्यायाधीश आणि मानवाधिकार कार्यकर्त्या नवनेथेम ‘नवी’ पिल्ले यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शांतता, न्याय आणि मानवाधिकार रक्षणासाठी पिल्ले यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. वर्णभेदाच्या काळात दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या पिल्ले यांना अनेक स्तरांवर भेदभावाचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी वर्णभेदाविरोधात लढा दिला.
नोबेल पुरस्कार समितीनुसार, नेल्सन मंडेला आणि वर्णद्वेषाविरोधात लढा देणाऱ्या इतर कार्यकर्त्यांचा बचाव करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळण्यापर्यंत त्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे.
‘नवी’ पिल्ले कोण आहेत?
नवनेथेम ‘नवी’ पिल्ले यांचा डर्बन शहरातील एका तमिळ कुटुंबात जन्म झाला. पिल्ले यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाच्या (Apartheid) काळात मानवाधिकार कार्यकर्त्यांची न्यायालयात भक्कपणे बाजू मांडली. पुढे १९६७ मध्ये त्यांनी स्वतःची विधिज्ञ संस्था (लॉ फर्म) स्थापन केली आणि १९८० च्या दशकात प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून कायद्यातील डॉक्टरेट पदवी मिळवली.
न्यायालयीन क्षेत्रातही त्यांनी अतुलनीय कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका सरकारने १९९५ मध्ये त्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांच्यावर ‘रवांडा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या’ (ICTR) न्यायाधीश पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या कार्यकाळात त्यांनी दोन क्रांतिकारी निर्णय दिले. युद्ध किंवा संघर्षाच्या काळात महिलांवर होणारा बलात्कार आणि लैंगिक हिंसाचार हा मानवतेविरोधातील गुन्हा असून तो ‘नरसंहार’ (Genocide) मानला जावा आणि दुसरा म्हणजे समाजात द्वेषयुक्त प्रचार करणे हासुद्धा गंभीर गुन्हा मानला जावा, असे निर्णय त्यांनी दिले. या निर्णयांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रांमधील (UN) नेतृत्व
नवी पिल्ले यांची नंतर ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात’ (ICC) न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली. पुढे २००८ ते २०१४ या सहा वर्षांत त्यांनी ‘संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त’ (UN High Commissioner for Human Rights) हे जागतिक स्तरावरील अत्यंत जबाबदारीचे पद भूषवले.
२०२१ ते २०२५ या कालावधीत त्यांनी ‘व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशाशी संबंधित संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोगा’च्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली. याशिवाय, २०१९ मध्ये म्यानमारवर असलेल्या नरसंहाराच्या (Genocide) आरोपांशी संबंधित प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) त्यांनी ‘ॲड हॉक्स’ (विशेष) न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत विविध देशांच्या सरकारांना आणि त्यातील राष्ट्रीय नेत्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली, तसेच संघर्ष आणि हिंसाचाराचा बळी ठरलेल्या पीडितांच्या मनात त्यांनी न्यायाची आशा निर्माण केली. प्रत्येक पदावर काम करताना त्यांनी लोकांना आणि देशांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कायदा आणि न्यायाचे भान राखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे यावर त्यांनी सातत्याने भर दिला.
नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत कोण-कोण होते?
यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत अनेक प्रमुख दावेदार असल्याची चर्चा होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS), सुदानमधील आपत्कालीन मदत पथके, युक्रेनमधील बाल हक्क कार्यकर्ते आणि जगातील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या नावांची या पुरस्कारासाठी मोठी चर्चा होती. याशिवाय, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे नावही चर्चेत आले होते. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील या पुरस्कारासाठी बऱ्याच काळापासून उत्सुक होते आणि आपल्याला हा पुरस्कार मिळायला हवा, असा दावा त्यांनी वेळोवेळी केला होता.
ऑस्लो येथील नोबेल समितीला यंदा २८७ नामांकने मिळाली होती, ज्यामध्ये २५ टक्क्यांहून अधिक संस्था आहेत. जगातील दीर्घकालीन शांतता, आंतरराष्ट्रीय बंधुभाव आणि शांततेसाठी अविरत काम करणाऱ्या या संस्थांवर समितीने नेहमीप्रमाणे भर दिला आहे.
गेल्या वर्षी व्हेनेझुएलात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. “घोर अंधारात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवणारी महिला” म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. अमेरिकेच्या कारवाईनंतर निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर माचाडो यांनी आपले नोबेल पदक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सोपवले होते, परंतु नोबेल सन्मान असा कोणालाही हस्तांतरित करता येत नसल्याने ही भेट केवळ एक प्रतीकात्मक बाब ठरली होती.
