Contract Workers Protest: नोएडामध्ये कामगार व पोलिसांमध्ये सोमवारी हिंसाचार झाला आहे. कामगारांनी वाहनांची जाळपोळ केली. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच देशभरातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये कामगारांची आंदोलने सुरू आहेत. पश्चिम आशियातील इराण युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगारांमधील असंतोष आणखी वाढला आहे. देशातील किमान पाच मोठ्या शहरांमधील औद्योगिक पट्ट्यांमध्ये कामगारांनी आंदोलने केली आहेत. २ फेब्रुवारी रोजी बिहारमधील बरौनीत, त्यानंतर हिऱ्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये, ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स हब असलेल्या मानेसारमध्ये, कापड गिरण्या असलेल्या पाणिपतमध्ये आणि फुटवेअर आणि कापड उद्योग मोठ्या संख्येने असलेल्या नोएडामध्ये कामगारांची आंदोलने झाली.
देशभरात कामगारांची आंदोलने
सर्वात आधी फेब्रुवारी महिन्यात बिहारमधील बरौनी जिल्ह्यात कामगारांनी आंदोलन केले. मजुरी वाढवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच कामाचा वेळ आठ तास करावा, प्रोव्हिडेंट फंड आणि ‘इम्प्लॉयीज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’चा (ESIC) लाभ द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी पाणिपत मधील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या रिफायनरीत किमान ३० हजार कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले होते. चांगली मजुरी मिळावी आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळावे या मागण्या करण्यात आल्या होत्या. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. संतप्त कामगारांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक व वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी लारसेन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीच्या ५ हजार कंत्राटी कामगारांनी सुरतमधील हाजिरा येथे हिंसक आंदोलन केले. त्यात अनेक पोलीस जखमी झाले होते. तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली होती. एलपीजी सिलिंडरचा तुटवडा झाल्याने कामगारांचा खर्च वाढला आहे. मार्च महिन्यात देखील सुरत, मानेसार आणि नोएडातील औद्योगिक पट्ट्यात आंदोलने झाली.
एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली?
एलपीजी सिलिंडर विकत घेण्यासाठी कामगार कंपन्यांकडे अतिरिक्त पैसे देण्याची मागणी करत आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, एलपीजी सिलिंडरचे काळ्या बाजारातील भाव तीन ते चार पट वाढले आहेत. सोमवारी नोएडामध्ये कामगारांनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे समोर आले. कामगार संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे की, त्यांना मागील पाच दिवसांपासून घरातच कैद ठेवण्यात आले आहे. हरयाणा सरकारने कामगारांच्या मजुरीत वाढ केल्यानंतर इतर राज्यांतील कामगार त्यांच्या मजुरीत ३५ टक्के वाढ करण्याची मागणी करत आहेत.
नोएडात ८ एप्रिलपासून आंदोलन सुरू झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नसल्याने कामगार संघटनांच्या नेत्यांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला आहे. “जर कामगारांबरोबर चर्चाच होणार नसेल तर त्यांना समजेल कसे? गारमेंट्स, आयटी, कॉल सेंटर या उद्योगांमध्ये देखील आंदोलने होत आहेत. नवीन कामगार संहितेबाबत कामगार जागरूक आहेत. कामगार संहितेनुसार मजुरीत वाढ करावी, अशी मागणी ते करत आहेत. या आधी किमान मजुरीत २०१२ मध्ये वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा वाढ करण्याची मागणी होत आहे”, असे नोएडामधील AITUC या कामगार संघटनेचे नेते नईम म्हणाले.
कामगारांचा दैनंदिन खर्च वाढला?
पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण होऊन स्थलांतरित कामगारांचा दैनंदिन खर्च वाढला आहे. हरयाणामधील मानेसार मध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांनी आंदोलन केले. त्यानंतर मागील आठवड्यात ९ मार्च रोजी हरयाणा सरकारने कामगारांना मिळणाऱ्या मजुरीत वाढ केली आहे. ती १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. हरयाणा सरकारच्या निर्णयानंतर नोएडामधील औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. अकुशल कामगारांना प्रति महिना किमान १५२२०.७१ रूपये, कुशल कामगारांना प्रति महिना किमान १९४४२ रूपये देण्याबाबत हरयाणा सरकारने नियम केला आहे. अकुशल कामगारांना प्रति दिन मिळणारी मजुरी किमान ५८२.४ रूपये, तर कुशल कामगारांना किमान ७४७.१४ रूपये करण्यात आली आहे.
कामगारांच्या मागण्या काय?
काम करण्यासाठी कारखान्यात चांगले वातावरण देण्याची मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. तसेच मजुरीत वाढ, अतिरिक्त कामासाठी ओव्हरटाइम, थकित पैसे लवकर मिळावे तसेच कामगारांना समान वागणूक मिळावी, अशा मागण्या कामगारांनी केल्या आहेत. कामगार संघटनांमधील सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, नोव्हेंबर २०२५ मध्ये कामगार संहिता (लेबर कोड) लागू झाल्यानंतर मजुरीत वाढ व्हावी अशी कामगारांना अपेक्षा होती. परंतु, ती वाढ झाली नाही. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चार कामगार संहिता लागू झाल्या आहेत. त्यात मजुरी, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य व उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या संहिता लागू झाल्या आहेत. कामगार संहितेमुळे कारखान्याच्या मालकांना नियमांचे पालन व पूर्तता करणे अत्यंत सोपे झाले. तसेच कामगारांची सामाजिक सुरक्षा व मजुरी एकसमान करण्याबाबत संहितेत सांगण्यात आले आहे.
आंदोलनामुळे कारखाने झाले बंद
हरयाणातील मानेसार मध्ये आंदोलन झाले, तसेच आंदोलन नोएडात होत आहे, असे कामगार संघटनेचे कार्यकर्ते सिद्धांत राज म्हणाले. “नवीन कामगार संहितेमुळे मजुरी १ एप्रिलपासून वाढवून मिळावी, अशी मागणी होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे नोएडातील औद्योगिक पट्ट्यात आंदोलन होत आहे”, असे राज ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले. कामगारांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कापड उद्योग मालकांनी पोलीस सुरक्षा मागितली आहे. “हजारो कामगार नोएडात आंदोलन करत आहेत. ते हिंसक झाले आहेत. कारखान्याचे गेट तोडून ते आतमध्ये शिरले. हरयाणाप्रमाणे मजुरीत ३५ टक्के वाढ करण्याची मागणी ते करत आहेत. आम्ही कारखान्यातील काम थांबवून कामगारांना जाण्यास सांगितले. पोलीस सुरक्षा देण्यात आली नाही, तर आम्ही कारखाने बंद ठेवू. असे आंदोलन १० ते १२ वर्षांनंतर होत आहे”, असे नोएडातील मिनू क्रिएशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पेशावरी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले.
