दिल्लीला लागून असलेल्या नोएडा शहरात वेतनवाढीच्या प्रश्नावर कामगारांनी सोमवारी हिंसक आंदोलन केले. या आंदोलनाच्या काही तासांतच उत्तर प्रदेश सरकारने कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन, त्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली. सुधारित वेतनवाढ १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. एकीकडे कामगारांना दिलासा दिला जात असतानाच, दुसरीकडे या हिंसाचाराच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. यादरम्यान उत्तर प्रदेशमधील एका मंत्र्याने हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. या भागात अलीकडेच दहशतवादाशी संबंधित काही जणांना अटक करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
कामगारांचे आंदोलन नेमके कसे चिघळले?
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधील विविध कारखान्यांतील हजारो कामगार पगारवाढीच्या मागणीसाठी सोमवारी (१३ एप्रिल) रस्त्यावर उतरले होते. काही वेळातच या आंदोलनाचे रूपांतर संघर्षात झाले. यादरम्यान संतप्त आंदोलकांनी दगडफेक करीत परिसरातील वाहने पेटवून दिली. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हिंसाचाराची पहिली घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिकठिकाणी तोडफोड आणि दगडफेक सुरूच होती. या हिंसक घटनेमुळे दिल्ली आणि नोएडाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सेक्टर ६२, नॅशनल हायवे-२४, सेक्टर ६३ आणि चिल्ला बॉर्डरवर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी सेक्टर ६२ ते सेक्टर १६ कडील रस्ते रोखून धरल्याने कामावरून घरी परतणाऱ्या हजारो प्रवाशांना तासन् तास ताटकळत राहावे लागले.
आंदोलक कामगारांनी मांडली व्यथा
आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांनी आपली कैफियत मांडताना संताप व्यक्त केला. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका आंदोलकाने सांगितले की, कंपन्यांमध्ये १२-१२ तास काम करूनही आमच्या हातात महिन्याला जेमतेम ११,००० ते १५,००० रुपये पडतात. एवढ्या महागाईत संसाराचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. दुसऱ्या एका कामगाराने आरोप केला की, कंपन्यांमध्ये पगाराबाबत प्रचंड अनियमितता आहे. आमच्याकडून डबल शिफ्ट करून घेतली जाते; मात्र मोबदला फक्त एकाच शिफ्टचा दिला जातो. उत्तर प्रदेश सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
आणखी वाचा : “मुत्सद्देगिरी कधीच संपत नाही”, इराण पुन्हा चर्चेसाठी तयार? अमेरिकेला काय दिला इशारा?
पोलीस तपासात नेमके काय समोर आले?
नोएडा येथील कामगार हिंसाचाराचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी या प्रकरणातील अनेक खळबळजनक बाबी समोर आणल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर जिल्ह्यामध्ये तब्बल ८० वेगवेगळ्या ठिकाणी ४० ते ४५ हजार कामगार जमा झाले होते. सोमवारी उशिरापर्यंत पोलिसांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी ३०० हून अधिक आंदोलकांना प्रतिबंधात्मक कलमान्वये अटक केली. तसेच १०० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर उपद्रवी घटकांना ओळखून त्यांना पकडण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत. गौतम बुद्ध नगरच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांचे आंदोलन शांततेत सुरू असताना काही समाजकंटकांनी हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, कामगार आंदोलनस्थळावरून शांततेने निघून गेल्यानंतर शेजारच्या जिल्ह्यांच्या सीमेवरून एक बाहेरील गट शहरात दाखल झाला. या गटाने तणाव निर्माण करण्याचा आणि हिंसाचाराला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही या गटातील काही जणांना ताब्यात घेतले असून, इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे लक्ष्मी सिंह यांनी पीटीआयला सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
नोएडातील हिंसाचारामागे पाकिस्तान कनेक्शन?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या आंदोलनाबाबत अफवा पसरवण्यासाठी सुमारे ५० सोशल मीडिया अकाउंट्स तयार करण्यात आली होती. कामगारांच्या या हिंसक आंदोलनात पोलिसांनी बाहेरील हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला असतानाच उत्तर प्रदेशचे कामगारमंत्री अनिल राजभर यांनी एक खळबळजनक दावा केला. नोएडातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता आणि त्यामागे पाकिस्तानचा संबंध असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. अनिल राजभर या घटनेवर भाष्य करताना म्हणाले की, ही घटना राज्याचा विकास आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने घडवून आणल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत मेरठ आणि नोएडामधून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यांचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडलेले होते. अशा परिस्थितीत राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी कट रचला गेल्याच्या शक्यतेला बळकटी मिळते. तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत.
हेही वाचा : शहरी महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण का वाढलंय? महिलांनी जीवनशैलीत कोणते बदल करावेत? तज्ज्ञ काय सांगतात?
मंगळवारी पुन्हा हिंसाचार; पोलिसांकडून लाठीमार
मंत्र्यांनी पुढे दावा केला की, राज्यात सरकारची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळेच काही देशविरोधी घटक अशा प्रकारचे अडथळे निर्माण करून, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कामगारांना कोणत्याही चुकीच्या माहितीला किंवा चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्या ऐकण्यासाठी तयार असल्याचे अनिल राजभर यांनी स्पष्ट केले. नोएडातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कामगारांच्या किमान वेतनात मोठी वाढ करण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच मंगळवारी नोएडामध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची नवी लाट पाहायला मिळाली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी काही कामगारांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला आणि जमावाला घटनास्थळावरून पिटाळून लावले. सध्या या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या आंदोलनाचे खरंच पाकिस्तानशी कनेक्शन आहे का, याचा तपास केला जात आहे.
