DJ Controvery : सणसमारंभ सुरु असताना आपल्या परिसरात लाऊडस्पीकर वाजवला जात असेल तर “आवाज थोडा कमी करा…” अशी आपण साधी विनंती करतो. पण गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांकडे पाहिलं, तर ही साधी विनंती कधी जीवघेणी ठरेल, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजावरुन सध्या वातावरण तापले आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच हल्ला करण्यात आला. दिल्लीमध्ये घराबाहेर होणाऱ्या गोंगाटावर आक्षेप घेणाऱ्या ५४ वर्षीय मणिपुरी संगीत शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू झाला. नोएडामध्येही एक तरुण वाढलेल्या आवाजाबाबत शेजाऱ्याला सांगायला गेल्याने वाद निर्माण झाला ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.

या घटना वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीत घडल्या असल्या, तरी त्यांच्यामागे एक समान प्रश्न आहे. आपल्या सभोवतालच्या आवाजावर मर्यादा असावी की नाही, यावरचा वाद इतका आक्रमक का होत चालला आहे?

एका बाजूला सण, उत्सव आणि सार्वजनिक समारंभाचे उत्साही वातावरण आहे; तर दुसऱ्या बाजूला घरातील शांतता, झोप, अभ्यास, काम आणि आरोग्याची काळजी असे मुद्दे आहेत. या दोन्हींच्या संघर्षात संवादाऐवजी थेट वाद आणि हिंसेचा मार्ग स्वीकारला जाऊ लागला, हा गंभीर प्रश्न समोर येतो.

विशेषतः गणेशोत्सवासारखे मोठे सण जवळ येत असताना हा मुद्दा आणखी संवेदनशील झाला आहे. पुण्यात मोठ्या आवाजातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केलं आहे, तर प्रशासन आणि उत्सवाच्या आयोजकांमध्येही आवाजाच्या मर्यादेवरून तणाव दिसून आला आहे. म्हणूनच सध्याच्या घटनांकडे स्वतंत्र भांडणं म्हणून पाहून चालणार नाही. शहरांमध्ये डीजेचा अनियंत्रित आवाज, त्यावरची अपुरी अंमलबजावणी आणि छोट्या मतभेदांचं हिंसक संघर्षात होणारं रूपांतर, या तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी समोर येत आहेत.

प्रश्न आवाजाचा आहे; पण महत्वाचे मुद्दे आहे ते आवाजावरुन संघर्ष का निर्माण होतोय आणि या संघर्षातून माणसाचा बळी का जातोय?

आवाजावरून वाद इतके टोकाला का जात आहेत?

गेल्या काही दिवसांत दिल्ली, नोएडा आणि पुण्यात घडलेल्या तीन घटनांनी या प्रश्नाचं गांभीर्य समोर आणलं आहे. तिन्ही ठिकाणी परिस्थिती वेगळी होती; मात्र मोठ्या आवाजाला विरोध, त्यातून झालेला वाद आणि त्यानंतरची हिंसा हा समान धागा दिसतो.

दिल्ली : गोंगाटाला विरोध केला, जीव गेला

दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील किलोकरी परिसरात ६ सप्टेंबरला गंभीर घटना घडली. त्या रात्री मणिपूरचे ५५ वर्षीय संगीतकार आणि गिटारवादक चोंगथाम विक्रम सिंह यांनी आपल्या घराबाहेर सुरु असलेल्या गोंगाटावर आक्षेप घेतला. तिथे काही डिलिव्हरी कर्मचारी आणि ढाब्यावर काम करणारे लोक रात्री उशिरापर्यंत मोठा गोंगाट करत होते आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपानही सुरू होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सिंह यांनी त्यांना आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतर वाद वाढला आणि त्यांच्यावर गोंगाट करणाऱ्या कामगारांच्या जमावाने हल्ला केला. या मारहाणीत सिंह रक्तबंबाळ झाले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

नोएडा : वाढदिवसाच्या पार्टीतील मोठा आवाज आणि वाद

नोएडातील सेक्टर ९३, गेझा परिसरात ४ सप्टेंबरला अशीच घटना घडली. ४५ वर्षीय सतीश शर्मा हे पेईंग गेस्ट निवास चालवत होते. एका वाढदिवसाच्या पार्टीत मोठ्या आवाजात होम थिएटर सुरू होतं. त्यांनी आवाजावर आक्षेप घेतला, यावरुन त्यांची त्या पार्टीत उपस्थित असलेल्या दोन भावांशी जोरदार जुंपली.
वाद वाढल्यानंतर शर्मा यांचा पाठलाग करण्यात आला आणि त्यांना रस्त्याच्या कडेला ढकलण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन्ही भावांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

पुणे : बापटांची आवाजाविरोधातील भूमिका

पुण्यातील घटना मात्र वेगळ्या स्वरूपाची आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत नागरिक आणि कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आवाजातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर आक्षेप घेत आहेत.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर आक्षेप घेतला. त्यानंतर डीजेविरोधात समाजातील विविध स्तरातील लोक रस्त्यावर उतरले. पण विद्यानंद बापट हे ३ सप्टेंबरला टिळक रोडवर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कॅमेऱ्यासमोरच त्यांना कानशिलात मारण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेचा तपास सुरू आहे.

बापट यांचा दावा आहे की त्यांचा विरोध गणेशोत्सवाला किंवा धार्मिक कार्यक्रमांना नाही, तर अतिरेकी ध्वनिप्रदूषणाला आहे. या घटनेनंतर ६ सप्टेंबरला ३००हून अधिक नागरिकांनी डीजे आणि मोठ्या आवाजाविरोधात मोर्चा काढला. आंदोलनाच्या माध्यमातून सर्व धर्मांचे उत्सव, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजावर नियंत्रण असावं, अशी मागणी करण्यात आली.

मोठ्या आवाजाच्या विरोधामागील मानसशास्त्र

मानसशास्त्र आणि गुन्हेगारीशास्त्राच्या तज्ज्ञांनुसार, काहींसाठी सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश संगीत वाजवणे हा केवळ मनोरंजनाचा भाग नसतो; त्यामागे ‘आवाजाच्या माध्यमातून’ परिसरावर आणि लोकांवर आपले वर्चस्व सिद्ध करण्याची एक सामाजिक-मानसिक वृत्ती दिसून येते. अशा वेळी एखाद्याने ‘आवाज कमी करा’ अशी साधी विनंती केली, तरी ती केवळ विनंती न वाटता आपल्या अधिकाराला किंवा प्रतिष्ठेला थेट दिलेले आव्हान मानले जाते; आणि त्यातूनच हिंसक प्रतिक्रिया उमटते.

विशेषतः एखाद्या समूहात असताना ही परिस्थिती आणखी चिघळू शकते. त्यातच मद्यपान, सणाचा उत्साह आणि सोबत मित्रांचा गट असल्यास ही हिंसक प्रवृत्ती अधिक बळावते. या गर्दीच्या जोरावर परिसरावर स्वतःची दहशत आणि हक्क सिद्ध करण्यासाठी हा गट थेट हिंसेवर उतरतात.

उत्सवांच्या काळात नियमांची अंमलबजावणी होते का?

देशभरात सण आणि धार्मिक मिरवणुकांचा हंगाम सुरू होत असताना ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. आवाजाची मर्यादा आणि रात्रीच्या वेळी लाऊडस्पीकर वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते.

वास्तविक पाहता, लाऊडस्पीकर किंवा डीजेचा अनियंत्रित वापर आधीच रोखण्याची मुख्य जबाबदारी प्रशासन आणि पोलिसांची असते. मात्र, प्रशासकीय पातळीवर अशी कारवाई वेळेवर झाली नाही, तर सामान्य नागरिकांना वैयक्तिक पातळीवर आक्षेप घ्यावा लागतो. सुरुवातीला आवाज कमी करण्याची साधी मागणी असते. पण वाद वाढला की, त्याचं हिंसेत रुपांतर होऊ शकतं. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणी झाली, तर अशा संघर्षांना सुरुवातीलाच आळा घालता येऊ शकतो.