अनिकेत साठे

उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या हासंग – १७ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (आयसीबीएम) चाचणी करून पुन्हा आक्रमक धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. या क्षेपणास्त्राची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. चाचणीत अपेक्षित तांत्रिक उद्दिष्टे सुफळ पूर्ण झाली असून ही प्रणाली युद्धकाळात तातडीने कार्यान्वित केली जाईल, असा इशाराही दिला गेला आहे. अमेरिकेतील महत्त्वाची शहरे त्यामुळे उत्तर कोरियाच्या प्रहारपल्ल्यात येतात. या चाचणीने जागतिक अस्थैर्यात भर पडली आहे.

India Ballistic Missile Defence
विश्लेषण :‘आयर्न डोम’ मुळे इस्रायलचा बचाव… भारताकडे कोणती हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

हासंग-१७ क्षेपणास्त्र म्हणजे काय ?

उत्तर कोरियाने आजवर केलेल्या चाचण्यांमध्ये हासंग – १७ हे सर्वाधिक मारक क्षमतेचे आंतरखंडीय (आयसीबीएम) क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते. चाचणीवेळी शेजारील राष्ट्रांच्या प्रादेशिक सागरी सीमा टाळण्यासाठी या क्षेपणास्त्राने अतिशय उंचावरून मार्गक्रमण केले. सहा हजार २४८ किलोमीटरची उंची गाठली. एक हजार ९० किलोमीटरचा प्रवास केला. ६७ मिनिटांनंतर ते उत्तर कोरिया आणि जपानदरम्यानच्या पाण्यात उतरले. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. अर्थात या चाचणीवर दक्षिण कोरिया आणि जपानचे लक्ष होते. सुमारे २५ मीटर या क्षेपणास्त्राची लांबी मानली जाते. त्याची १५ हजार किलोमीटर मारक क्षमता आणि एक हजार किलोपेक्षा कमी वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असल्याचा अंदाज आहे.

या क्षेपणास्त्र पल्ल्याचे महत्त्व काय?

थेट  अमेरिकन भूमीवर मारा करता येईल, अशा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाने २०१७ मध्ये चाचणी केली होती. पण हासंग – १७ क्षेपणास्त्रात एकाच वेळी अधिक अण्वस्त्रे बसवून ती एकाच वेळी विविध लक्ष्यांवर डागण्याची व्यवस्था समाविष्ट केल्याचा अंदाज आहे. अमेरिकेची क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षणाची प्रणाली भक्कम आहे. तिच्यावर मात करण्यासाठी हासंग- १७ क्षेपणास्त्राला एकाच वेळी अनेक अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न होत असल्याचे अनेकांना वाटते.

आक्रमक धोरणाने काय साध्य होणार?

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. दक्षिण कोरियाला पाठबळ देणाऱ्या अमेरिकेला शह देण्यासाठी उत्तर कोरिया अण्वस्त्र व क्षेपणास्त्राद्वारे लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने स्वत:चे अण्वस्त्र चाचणी तळ नष्ट करीत आक्रमकतेला मुरड घातल्याचे चित्र निर्माण केले होते. अमेरिकेशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर तो पुन्हा नेहमीच्या मार्गाने निघाला. संपूर्ण जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धावर असतानाची अचूक वेळ चाचणीसाठी साधली. आता उत्तर कोरियाच्या लष्करी सज्जतेची संपूर्ण जगाला जाणीव  होईल. अमेरिकेसह साम्राज्यवाद्यांशी प्रदीर्घ काळ संघर्षाला आपले सैन्य तयार असल्याचा इशारा किम जोंग ऊन देत आहे. या आक्रमकतेमागे आर्थिक संकटात गुरफटलेल्या देशात आपले लष्करी कर्तृत्व ठसवण्याची गरजदेखील आहे.

आंतरखंडीय (आयसीबीएम) क्षेपणास्त्र म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र किती अंतरावरील लक्ष्यभेद करू शकते, त्यावरून त्यांचे वर्गीकरण केले जाते. एक हजार किलोमीटरपेक्षा कमी प्रवास करणाऱ्या क्षेपणास्त्रांना कमी पल्ल्याचे (एसआरबीएम) क्षेपणास्त्र मानले जाते. एक हजार ते तीन हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱी मध्यम श्रेणीची (एमआरबीएम) तर तीन हजार ते पाच हजार किलोमीटरचे अंतर कापून लक्ष्यावर मारा करणारी मध्यवर्ती श्रेणीतील (आयआरबीएम) क्षेपणास्त्रे म्हणून गणली जातात. यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल साडेपाच हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या क्षेपणास्त्रांना आंतरखंडीय (आयसीबीएम) क्षेपणास्त्र म्हटले जाते. मुख्यत्वे अण्वस्त्र वाहून नेण्याच्या दृष्टीने त्याची रचना केली जाते. 

क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची प्रगती कशी?

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकासात रि एन्ट्री तंत्रज्ञान, अतिविशिष्ट ऊर्जात्मक पदार्थ अर्थात प्रोलेलंट्सचे (इंधन) संशोधन, त्यांची उपलब्धता अशी विविध आव्हाने असतात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एका विशिष्ट पद्धतीने कार्यरत असते. प्रारंभी ते रॉकेटने झेपावते. विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर ते लक्ष्याच्या दिशेने मुक्तपणे प्रवास करू लागते. या प्रक्रियेत पृथ्वीचे वातावरण भेदण्याचा टप्पा म्हणजे बॅलिस्टिक पायरी. वातावरणाबाहेर गेलेले क्षेपणास्त्र पुन्हा दिशा बदलून लक्ष्याकडे मार्गक्रमणास सिद्ध होते. तेव्हा त्याला पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करावयाचा असतो. ध्वनीहून अधिक वेगाने निघालेल्या क्षेपणास्त्राची वातावरणात परत प्रवेश करण्याची प्रक्रिया रि एट्री तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांची संख्या मर्यादित आहे. क्षेपणास्त्र उड्डाणात विशिष्ट मिश्रणाच्या द्रवरूप वा घनरूप इंधनाचा वापर केला जातो. अगदी कमी वेळेत प्रचंड ऊर्जा देणारे प्रोपेलंट्स वापरले जातात. त्यावर क्षेपणास्त्राचा पल्ला अवलंबून असतो. एखाद्या मोठ्या देशाच्या सक्रिय मदतीशिवाय उत्तर कोरिया ही क्षमता प्राप्त करणे अशक्य आहे. क्षेपणास्त्र कार्यक्रमास संवेदनशील घटक दिल्यावरून अमेरिकेने रशिया आणि उत्तर कोरियातील काही संस्थांवर नव्याने घातलेले निर्बंध त्याची प्रचीती देतात.

आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची स्पर्धा कशी?

सद्यःस्थितीत रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच देश आपल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राने पृथ्वीतलावरील कुठलेही लक्ष्य भेदू शकतात. आपल्या क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढविण्यासाठी उत्तर कोरियाच नव्हे तर भारत, इस्रायल, सौदी अरेबिया, पाकिस्तान, तैवान असे काही देश प्रयत्नशील आहेत. भारत दोन दशकांच्या संशोधनाअंती अग्नी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची क्षमता धारण करण्याच्या स्थितीत आहे. अग्नी – ५ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने पाच हजार किलोमीटरचा टप्पा गाठला आहे. विकसित होण्याच्या मार्गावर असणाऱ्या अग्नी – ६ द्वारे आठ हजार किलोमीटर पल्ला गाठला जाईल. संपूर्ण चीन त्याच्या माऱ्याच्या टप्प्यात येईल. पाकिस्तान चीनच्या मदतीने मिळवलेल्या क्षेपणास्त्रांचा पल्ला उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या लष्कराची ताकद क्षेपणास्त्र विभागात आहे. दीड हजार ते १३ हजार किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता राखणाऱ्या क्षेपणास्त्रांनी युक्त त्याचे स्वतंत्र दल आहे. डी एफ – ४१ या क्षेपणास्त्राने तो १५ हजार किलोमीटरहून अधिकचा टप्पा गाठण्यावर काम करीत आहे.