North Maharashtra Railway Expansion: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने विविध रेल्वे मार्गांचा विस्तार व नव्याने उभारणीची कामे सध्या हाती घेतली आहेत. त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना आगामी काळात मिळणार आहे. त्याचा हा आढावा.

भुसावळ रेल्वे विभागाचे महत्त्व काय?

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक असून, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खांडवा जिल्ह्यांपर्यंत ते विस्तारले आहे. या विभागातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, तर मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक होत असते. भुसावळ विभागाला पूर्व-पश्चिम रेल्वे वाहतुकीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. मुंबईकडून येणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गावर इगतपुरी हे या विभागाचे प्रवेशद्वार मानले जाते, तर पुढे हा मार्ग खांडवा आणि बडनेरापर्यंत विस्तारलेला आहे. त्यामुळे पश्चिम भारताला मध्य व पूर्व भारताशी जोडणारा हा विभाग एक महत्त्वाचा दुवा ठरतो. सध्या सुमारे ७४२ किलोमीटरहून अधिक लांबीच्या रेल्वे मार्गांचे संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन भुसावळ विभागाकडून करण्यात येते. या मार्गांवरून मुंबईसह पुणे, नागपूर, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता तसेच उत्तर व दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणाऱ्या रेल्वे गाड्या धावतात.

कोणते नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित?

भुसावळ विभागात मुंबईहून हावडा तसेच उत्तर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या जळगाव, भुसावळ आणि मनमाड या स्थानकांची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून सध्या बरेच प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, जे आगामी काळात उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीत निर्णायक भूमिका निभावणार आहेत. या प्रकल्पांमुळे संबंधित सर्व जंक्शन स्थानके आता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे केंद्र म्हणूनही अधिक सक्षम होणार आहेत. जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली, त्यानंतर आता या मार्गावरील चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. पाचोरा-जामनेर-बोदवड तसेच बोरविहीर-नरडाणा, मनमाड-धुळे, नरडाणा-इंदूर आणि जळगाव-जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठीही भूसंपादनाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याशिवाय, जळगाव-भुसावळ दरम्यान पाचवा आणि भुसावळ-खंडवा दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रेल्वे मार्गांसाठी किती निधी?

जळगाव-मनमाड दरम्यान सुमारे १६० किलोमीटर लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग नुकताच पूर्ण करण्यात आला. त्यानंतर आता सुमारे २५७४ कोटी रुपयांच्या निधीतून चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. पाचोरा-जामनेर-बोदवड या ८४ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत सुमारे ९५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भुसावळ-खंडवा दरम्यान १३१ किलोमीटर अंतरात तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग विकसित होणार असून, त्यासाठी सुमारे ३२८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय, जालना-जळगाव दरम्यानच्या १७४ किलोमीटर नवीन रेल्वे मार्गासाठी ५,८०४ रुपये, जळगाव-भुसावळ दरम्यानच्या नऊ किलोमीटर पाचव्या रेल्वे मार्गासाठी १५० कोटी, बोरविहीर (धुळे)-नरडाणा ५१ किलोमीटर मार्गासाठी ११७१ कोटी, मनमाड ते न्यू धुळे तसेच नरडाणा ते इंदूर या ३०९ किलोमीटर रेल्वे मार्गांसाठी १६ हजार ३२१ कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

नव्या रेल्वे मार्गांचा फायदा काय?

जळगाव-मनमाड दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गामुळे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टसह वाढवण बंदर तसेच मनमाड, जळगाव, भुसावळ आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. कृषी, औद्योगिक माल वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या आर्थिक विकासाला मोठे पाठबळ मिळणार आहे. पाचोरा-जामनेर हा मीटरगेज रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होणार आहे. पाचोरा-जामनेरच्या पुढे बोदवडपर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. जेणेकरून भुसावळ-मनमाड दरम्यानच्या व्यस्त मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्या पाचोरा-जामनेरमार्गे थेट बोदवड स्थानकाकडे वळविणे शक्य होईल.

जळगाव-जालना प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या तसेच उलट दिशेने येणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांना आंध्र प्रदेश व दक्षिण भारताशी जोडला जाणारा अधिक वेगवान मार्ग मिळणार आहे. विशेषतः जालना जिल्ह्यातील राजूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना या मार्गाचा मोठा फायदा भविष्यात होणार असून, पर्यटनाला चालना मिळू शकणार आहे. मनमाड-धुळे, नरडाणा-इंदूर आणि बोरविहीर-नरडाणा या रेल्वे मार्गामुळेही इतके दिवस दुर्लक्षित राहिलेल्या धुळे जिल्ह्यात विकासाचे वारे वाहणार आहेत.