विश्लेषण : नवरोज सणाचे महत्त्व काय? कुर्दीश, पारसी समाजात तो कसा साजरा केला जातो?

नवरोज हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पारसी समाजातर्फे नवरोज हा २१ मार्च रोजी साजरा केला जातो.

navroz parsi festival
इराकमधील सुलेमानिया येथे इराकी कुर्दीश लोक नवरोज हा सण साजरा करताना ( फोटो सौजन्य- AP)

नवरोज हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. इराणी लोकांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. पारसी समाजातर्फे नवरोज हा २१ मार्च रोजी साजरा केला जातो. पारसी समाजात या दिवसापासूनच नव्या वर्षाची सुरुवात होते. हा सण म्हणजे उत्साह, स्वातंत्र्याचे प्रतिक असल्याचे म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर नवरोज सण काय असतो? या सणाचे काय महत्त्व आहे. तसेच भारतात पारसी समाज हा सण कसा साजरा करतो हे जाणून घेऊ या.

हेही वाचा >> विश्लेषण : राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर इंदिरा गांधींवरील कारवाईची चर्चा; कोर्टाच्या एका निर्णयानंतर देशात लागू केली होती आणीबाणी!

नवरोज, इराणी नवे वर्ष म्हणजे काय?

नवरोज सण पारसी सोलार कॅलेंडरच्या (Iranian solar calendar) फरवरदीन (Farvardin) महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. हा सण एकूण १२ दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक मंदिरात जातात. तसेच घर सजवून गोडधोड जेवण केले जाते. मात्र या सणाला सुरुवात कधीपासून झाली, याबाबतची स्पष्ट आणि नेमकी माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा >> विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?

कुर्दीश, पारसी समुदायासाठी सणाचे महत्त्व काय?

पारसी आणि कुर्दीश लोक हा सण साजरा करतात. पण या दोन्ही लोकांसाठी या सणाचे वेगळे महत्त्व आहे. याबाबत विश्लेषक हेवा सलीम खलीद यांनी ‘पारशी आणि कुर्दीश लोकांच्या दृष्टीकोनातून नवरोज सण- एक अभ्यास’ या लेखात नवरोज सणाबद्दल माहिती दिलेली आहे. या लेखानुसार कुर्दीश लोकांसाठी हा सण म्हणजे एक प्रतिकार, संघर्षाचे प्रतिक आहे. तर पारशी लोकांसाठी हा एक सांस्कृतिक सण आहे. कुर्दीश लोकांमध्ये या सणाकडे राष्ट्राची ओळख म्हणून पाहिले जाते. कुर्दीश लोकांनुसार कावा नावाच्या लोहाराने याच दिवशी झुहॅक या क्रुर आणि जुलमी राजाला ठार केले होते. त्यानंतर सात कुर्दीश जमातींनी दिओक्स यांची आपला नवा राजा म्हणून निवड केली. कुर्दीश लोकांवर सांस्कृतिकदृष्ट्या इराण, टर्की, इराक, सिरिया या देशांच्या संस्कृतीचा प्रभाव आहे. हे चारही देश नवरोज हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी ते देवाकडे स्वातंत्र्य, शांतता, स्वंयपूर्णतेची मागणी करतात.

हेही वाचा >> विश्लेषण : हिंडेनबर्गने ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांच्या ‘ब्लॉक इन्क’वर कोणते आरोप केले?

पारसी नवीन वर्षाचा इतिहास

तर पारसी लोकांसाठी नवरोज या सणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. असे म्हटले जाते की पर्शियाचा राजा जमशेद यांच्या स्मरणार्थ नवरोज सण साजरा केला जातो. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी पारसी समाजाचे योद्धा जमशेद यांनी पारशी दिनदर्शिकेची स्थापना केली, ज्याला शहेनशाही दिनदर्शिका असेही म्हणतात. खालीद यांच्याप्रमाणे पारसी लोकांसाठी नवरोज या सणाकडे म्हणजे शांतता, एकता, समंजसपणाच्या या मूल्यांवर लोकांना एकत्र ठेवण्यचे स्मरण म्हणून पाहिले जाते.

हेही वाचा >> श्लेषण : ट्रान्सजेंडर खेळाडू यापुढे मैदानी खेळांमध्ये ‘महिला’ गटात सहभागी होऊ शकणार नाहीत; या निर्णयाची कारणे काय?

भारतात हा सण कसा साजरा केला जातो ?

भारतातील पारसी समुदाय नवरोज हा सण उत्साहात साजरा करतो. या दिवशी दरवाजांना तोरण बांधले जाते. तसेच हिंदू समाजात जशी घरासमोर रांगोळी काढली जाते, तशाच पद्धतीने नवरोज या सणाच्या दिवशी पारसी समूदाय ‘चॉक’ (chalk making) काढतो. तसेच या सणाची संपूर्ण मार्च माहिना तयारी केली जाते. या काळात घर स्वच्छ केले जाते. तसेच खरेदीदेखील केली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:21 IST
Next Story
विश्लेषण : राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर इंदिरा गांधींवरील कारवाईची चर्चा; कोर्टाच्या एका निर्णयानंतर देशात लागू केली होती आणीबाणी!
Exit mobile version