Obesity health risks and chronic diseases explained: “चतकोर भाकरी खाऊन शंभरी गाठण्यापेक्षा मनसोक्त खाऊन पंचविशीत मेलो तरी चालेल,” असे म्हणणाऱ्यांसाठी डोळे उघडणारी ही माहिती आहे. अन्नाचा अतिरेक झाल्यावर शरीर केवळ चरबी साठवत नाही, तर अंतर्गत अवयवांविरुद्ध युद्ध पुकारते. “चतकोर भाकरी आणि पालेभाजी खाऊन शंभरी गाठण्यापेक्षा मनसोक्त खाऊन वयाच्या पंचविसाव्या वर्षी मेलो तरी चालेल,”  जिग्नेशने निक्षून सांगितलं. त्याला खाण्याचा शौक होता. त्याला ध्यानीमनीस्वप्नी बर्गर्स, पकोडे, पराठे दिसत. कमीत कमी पंधरा मोदक खाल्ल्याशिवाय थांबणं त्याला कधीही जमत नसे. आईवडील, भावंडं, नंतर वेगवेगळे डॉक्टर्स, सगळ्यांनी त्याला आहार कमी करायचा सल्ला दिला, विनवलं. त्याने कमी खावं म्हणून त्याच्या आईने निर्जळी उपास केले. पण जिग्नेशने दाद दिली नाही…

अन्न कोंबल्यावर बापडं शरीर तरी काय करणार?

पोट भरल्याचे संकेत पाठवून जठर थकलं; पोटाला तडस लागली; अगदी गळ्याशी येईतो खा खा खाल्लं तरी जिग्नेशची तृप्ती होत नसे. इतकं अन्न कोंबल्यावर बापडं शरीर तरी काय करणार? त्याचा सगळा कारभारच उलथापालथा झाला. विचारी मेंदूच तृप्त-निरोप्याला जुमानेनासा झाला तर स्वादुपिंडाने तरी का ऐकावं? इन्सुलिनचं प्रमाण वाढलं. त्याने चरबीचा साठा आणखी वाढवला. असलेल्या मेदपेशींमध्ये चरबी ठासून भरली. त्यांचे आकार बेडकीसारखे फुगत गेले(hypertrophy). आणखी चरबी साठवायला नव्या मेदपेशी निर्माण केल्या (hyperplasia). त्याही फुगत गेल्या. त्वचेखाली, पोटात कोठारं भरली. पोटातला दाब वाढला.

आणि संधिवात झाला…

जेवल्याजेवल्या आडवं झोपल्याने दाबामुळे जठरातलं अन्न आणि पाचकरस, आम्ल, सगळं वर, घशाशी यायला लागलं. गाढ झोपेत ते घशातून श्वासनलिकेत घुसलं. फुप्फुसांत पोचलं. न्यूमोनिया झाला. मानेकडे, श्वासनलिकेभोवती साठलेल्या चरबीने श्वासनलिका आवळली गेली. रात्री उताणं झोपल्यावर श्वास बंद व्हायला लागला. झोपमोड तर झालीच पण मेंदूला प्राणवायू कमी पोचल्यामुळे त्याच्यावरही दुष्परिणाम झाला. जड शरीराचा भार पेलून गुडघे आणि खुब्याचे सांधे झिजले, मग सुजले. संधिवात(osteoarthritis) झाला. 

obesity-health-risks-internal-organ-damage-marathi
वाढत्या चरबीचे परिणाम (Image-
https://www.ahajournals.org/doi/10.1161/circresaha.115.306885)

रक्तातली साखर वाढली

कोठारं भरल्यामुळे चरबीचा कच्चा माल रक्तात साठला. रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं. 
तृप्त-निरोप्या (leptin)ला धाब्यावर बसवलाच होता. त्याला सोबत म्हणून इन्सुलिनलाही धाब्यावर बसवलं. शिवाय इन्सुलिनची मुस्कटदाबी करणारा तो नाठाळ निरोप्या(resistin) मातला. रक्तातली साखर वाढली. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून पँक्रियासकडून येणाऱ्या इन्सुलिनचा पाझर वाढला. रक्तात इन्सुलिन अधिक असूनही साखर कमी होईना. ती लघवीत उतू जायला लागली. मधुमेह झाला.

अन्नसेवन भरपूर झाल्यामुळे तृप्तनिरोप्याचं रक्तातलं प्रमाण वाढतच गेलं. त्याचा मेंदूवर वेगळा परिणाम झाला. तो चिंतातुर, उदासीन झाला. अव्वाच्या सव्वा फुगलेल्या मेद-पेशींची डोकी फिरली. आणि मग शरीरभर अनागोंदी कारभाराने धुमाकूळ घातला. 

सोडियमबरोबर रक्तदाबही वाढला…

रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठली. मेदपेशींनीच चिथावलेली प्रतिकारशक्ती त्या चरबीवर तुटून पडली. चकमकी झडल्या, जखमा झाल्या, वण धरले. निरोगी माणसांत तसे वण झालेच तर ते विरघळवणारी रसायनं रक्तात फिरत असतात. मातलेल्या चरबीने पाठवलेले काही व्रात्य पदार्थ त्या गुणी रसायनांना निकामी करतात. वण जाडजूड झाले. रक्तवाहिन्यांमधली जागा घटली. त्यातच त्या वाहिन्यांना अरुंद करणारा, त्यांच्यातल्या रक्तात सोडियम वाढवणारा निरोप्याही ओव्हरटाईम काम करायला लागला. रक्तदाब वाढला. हृदय, मेंदू, डोळे यांच्याकडचा रक्तप्रवाह कमी झाला. अत्यावश्यक इंद्रियांना रक्त पोचेना. स्ट्रोक, हार्ट ऍटॅक, गँग्रीन यांची शक्यता वाढली. 

रक्तस्रावाची शक्यता

त्याचवेळी रक्तवाहिन्या वाढवणाऱ्या निरोप्याने जागोजागी रोगट, गळक्या, पटकन फुटणाऱ्या वाहिन्यांची जाळी विणली. डोळ्यांत, मेंदूत रक्तस्रावाची शक्यता वाढली. रक्तपुरवठा घटल्यामुळे हातापायाच्या नसांनी आरडाओरडा करत काम थांबवलं. तिथल्या संवेदना नाहीशा झाल्या पण एक विचित्र वेदना मात्र उरली.  
मेदपेशींनी बनवलेल्या इस्ट्रोजेन-अँड्रोजेन हॉर्मोन्सचा अतिरेक झाल्यामुळे वृषणांची, अंडाशयाची कार्यक्षमता कमी झाली. नपुंसकत्व किंवा वंध्यत्व आलं. 

स्टीरॉइड हॉर्मोन्स वाढले

डोकी फिरलेल्या मेदपेशींनी प्रतिकारशक्तीला फार चिडवलं. शरीरभर लढाऊ रक्तपेशी आणि त्यांची शस्त्रास्त्रं यांनी धुमाकूळ घातला. तशा ताणतणावाच्या काळात शरीरात स्टीरॉइड हॉर्मोन्स वाढले. त्यांच्यामुळे भूक वाढली, इन्सुलिनचं काम अधिकच घटलं, रक्तातली साखर वाढली, दुष्टचक्र वाढत गेलं. शरीरभर विद्रोह धुमसायला लागला. 

लिव्हरमध्येही चरबी भरली

लिव्हरमध्येही चरबी भरली. लिव्हरच्या कामकाजात बिघाड झाला. त्यातच खवळलेल्या प्रतिकारशक्तीचे हल्ले चालू राहिले. त्यांनी झालेल्या जखमा भरून काढायला चरबीच्या पेशींच्या तंतुपेशी झाल्या. अख्खी लिव्हर वणांनी भरून दगडासारखी घट्ट झाली. आयुष्यात कधीही दारूला स्पर्श केलेला नसतानाही दारूमुळे होतो तसा सिऱ्होसिस(Cirrhosis) झाला. सततच्या लढाईझगड्यामुळे लिव्हरच्या पेशींची डोकी फिरली. त्या आतंकवादी झाल्या. लिव्हरचा कॅन्सर झाला. 

तंतूपेशींचा कर्करोग

शरीरातल्या इतर पेशींना, त्या घडत असतानाच, ‘तू लिव्हरची पेशी हो!’, ‘तू हाडाचं काम कर!’ , ‘तू इन्सुलिन बनव!’ असे सक्त आदेश मिळतात. त्या आजन्म त्या एकाच कामाचं व्रत आचरतात. चरबी साठवणाऱ्या पेशींच्या बाबतीत ते नियम तेवढे कडक नसतात. त्यांना गरजेला स्नायूपेशी, तंतुपेशी असे वेगवेगळे अवतार घ्यायची मुभा असते. अमर्याद खाण्यामुळे जेव्हा चरबी मातली आणि शरीरभर बेबंदशाही माजली, प्रतिकारशक्ती चवताळली आणि शरीरात सतत, अनेक ठिकाणी लढाई सुरू राहिली तेव्हा त्या लढाईत वेगवेगळ्या रूपांत अवतरणाऱ्या मेदपेशींना कसलाही धरबंध राहिला नाही. त्यांच्या पेशापालटाला ऊत आला. त्यामुळे डीएनएचा गोंधळ उडाला. पेशी त्यांच्या अंतर्गत कायद्यांनाही जुमानेनात. त्या गोंधळातून चरबीच्याच नव्हे तर स्नायूंच्या, तंतुपेशींच्याही कॅन्सरचा(कर्करोगाचा) धोका निर्माण झाला. 

ही सारी वाताहात कशामुळे झाली? 

चरबीच्याच तृप्तनिरोप्याने दिलेला, ‘आता खाणं पुरे,’ हा संदेश धुडकावून, जिभेच्या हव्यासापायी अती खाल्ल्यामुळे! कमी खाणं, नियमितपणे अधिक व्यायाम करणं हे आपल्याच हातात असतं की! 

‘जिवा, त्वांचि रे मेदसंचित केलें 
तयासारखें भोगणें प्राप्त झालें,’ 
अशी आत्ताआत्तापर्यंत समजूत होती. 

या गृहितकामुळे प्रत्येक लठ्ठ माणसाला सगळे त्रास तर होतेच. शिवाय शरीराच्या ओझ्यासोबत मनात प्रचंड अपराधीपणाचा भार वहावा लागत होता. पण विज्ञान त्याच्या मदतीला धावून आलं. लठ्ठपणा हा केवळ मनोनिग्रहाच्या अभावाचा परिणाम, अनावर मोहाची, पापाची फलश्रुती नव्हे. डीएनएची पुरातन संस्कृती आणि आमूलाग्र बदललेलं सध्याचं जग यांच्या परिणामामुळे झालेला, लठ्ठपणा हा एक आजार आहे. म्हणून तर तो साथीसारखा फैलावतो आहे. त्याच्यातून सावरायचं असलं तर नव्या विज्ञानाची मदत घेऊन त्याच्यावर उपचार करायलाच हवेत हे आता तज्ज्ञांना मान्य झालं आहे.  
ते उपचार कसे करायचे ते पुढे पाहू.