-चिन्मय पाटणकर

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना ११ डिसेंबर हा दिवस ‘भारतीय भाषा उत्सव’ म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. महान तमीळ कवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या जयंती दिनी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने या उपक्रमाच्या संकल्पनेचा घेतलेला परामर्श….

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

भारतीय भाषा उत्सव कशासाठी?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रकल्प, उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय भाषांची एकात्मता शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना मातृभाषेसह जवळच्या दुसऱ्या भाषेविषयी आस्था निर्माण होऊ शकेल. अन्य भारतीय भाषा शिकणे, बोलणे हे आनंददायी झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना विविध प्रातांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा, जाती-जमातींच्या भाषा, भारतीय प्रमुख भाषांतील काव्य, साहित्याविषयीची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचे सांस्कृतिक ऐक्य, सांस्कृतिक वारसा, विविधतेची माहिती विद्यार्थ्यांना होऊन ते आयुष्यभर देशभरातील इतर प्रातांतील लोकांशी सहजपणे समरस होऊ शकतील. या अनुषंगाने भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय भाषा समितीने प्रस्तावित केल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

सुब्रह्मण्यम भारती कोण होते?

सुब्रह्मण्यम भारती तमीळ भाषेतील महान कवी, साहित्यिक होते. आधुनिक तमीळ काव्यातील अग्रणी म्हणून त्यांना ‘महाकवी भारती’ म्हटले जाते. आजपर्यंतच्या तमीळ साहित्यिकांमध्ये त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ते त्यांच्या काळातील उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारे सेतू मानले जात असत. त्यांचा जन्म १८८२मध्ये एट्टायपुरम येथे झाला. त्यांच्या अनेक रचना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशभक्ती आणि राष्ट्रवाद जागृत करणाऱ्या होत्या. तसेच त्यांनी स्वदेशमित्रन, भारत अशा काही वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्यांच्या क्रांतिकारक कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करण्याचे आदेश १९०८मध्ये दिले होते. भारती यांच्या साहित्याला धार्मिक, राजकीय, सामाजिक पैलू आहेत. त्यांच्या काव्याचा उपयोग तमीळ चित्रपट, संगीत कार्यक्रमांमध्ये केला जातो. १९२१मध्ये भारती यांचे निधन झाले. भारती यांच्या जयंती दिनी भारतीय भाषा उत्सव साजरा केल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय एकता मजबूत होण्यास मदत होईल, असे यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या संकल्पना पत्रात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय भाषा उत्सवातून अपेक्षित काय आहे?

भारतीय भाषांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यासाठी नागरिकांनी आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणे, अन्य भाषा शिकण्यासाठी प्रेरित होणे, भारतीय भाषांचा अधिकाधिक वापर केल्याने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक लाभांचा प्रचार होणे, भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे हा भारतीय भाषा उत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे. अन्य भारतीय भाषा शिकणे, बोलणे ही फॅशन व्हायला हवी किंवा ते प्रतिष्ठेचे मानले जायला हवे असेही यूजीसीने नमूद केले आहे.

भारतीय भाषा उत्सव साजरा कशा पद्धतीने साजरा केला जाईल?

देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात विविध भाषांतील गाण्यांचे सादरीकरण, वक्तृत्व, लेखन स्पर्धा, भाषिक खेळ, भारतीय भाषांचे महत्त्व विशद करणारे प्रदर्शन, विविध भाषांसंदर्भातील फूड कॉर्नर, बहुभाषी समाजासाठीची ऑनलाइन साधने आणि उपक्रमांची माहिती देणे, भाषिक समुदायांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान होण्यासाठी पोशाखांचे प्रदर्शन, विविध भाषा बोलण्याचा आनंद देणारे दालन आदी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय भाषा उत्सवात कोणाला सहभागी होता येईल? 

भारतीय भाषांविषयीची जागृती विद्यार्थ्यांमध्ये करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठे, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी या उत्सवातील उपक्रम आयोजित करण्यात येतील. त्याबरोबरच या उत्सवामध्ये भाषाविषयक काम करणाऱ्या विविध संस्था, साहित्यिक संस्थाही सहभागी होऊ शकतात. या उत्सवात विद्यार्थ्यांना विविध भाषांचा अनुभव देण्यासाठी इतर जिल्ह्यातील, राज्यांतील व्यक्ती किंवा संस्थांनाही आमंत्रित करता येईल, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.