Odisha Train Accident : ओडिशा राज्यात शुक्रवारी (दि. २ जून) कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे. हा लेख लिहीपर्यंत या अपघातात २३३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची दुःखद बातमी हाती आली, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे कळते. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस १० ते १२ डबे आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे तीन-चार डबे ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ एकमेकांवर धडकले. या अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशामध्ये एकदिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. ओडिशामध्ये झालेला अपघात हा मागच्या दोन दशकातील सर्वात मोठा अपघात आहे. १९९९ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची माहिती रेल्वे मंत्रालयात पोहोचल्याच क्षणी लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले. पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात अनेक मोठ्या अपघातांची नोंद झाली आहे. काही मोठ्या अपघातांवर एक नजर टाकू या. हे वाचा >> Odisha train accident : “कुणाचा हात कापला गेला तर कुणाचा पाय….” कोरोमंडल एक्स्प्रेसच्या प्रवाशाने सांगितली आपबीती २ जून २०२३ : रेल्वे अपघातांमध्ये चालू वर्षात कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताची नोंद झाली आहे. या अपघाताची भीषणता तासागणिक वाढत आहे. आतापर्यंत शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडले असून आणि त्याहून जास्त प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अनेकांचे अवयव जायबंदी झाल्यामुळे त्यांना अपंगत्व येण्याची भीती वर्तविली जात आहे. १३ जानेवारी २०२२ : पश्चिम बंगालच्या अलीपुरदुर येथे बिकानेर - गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे अपघातामुळे रुळावरून घसरले होते. या अपघातामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू आणि ३६ जण जखमी झाले होते. २३ ऑगस्ट २०१७ : उत्तर प्रदेश राज्यात औरया येथे दिल्लीच्या कैफियत एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले होते. या अपघातात ७० प्रवासी जखमी झाले. तर याच महिन्यात १८ ऑगस्ट रोजी मुझफ्फरनगर येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचा अपघात होऊन २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जवळपास ६० प्रवासी गंभीर जखमी झाले होते. २० नोव्हेंबर २०१६ : इंदूर - राजेंद्र नगर एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशच्या पुखरायन येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात १४ डबे रुळावरून बाजूला झाले. ज्यामुळे १५२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर २६० प्रवासी जखमी झाले होते. २६ मे २०१४ : उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर येथे गोरखपूरकडे धावत असलेल्या गोरखधाम एक्स्प्रेसची मालगाडीशी खलिदाबाद स्थानकाजवळ धडक झाली. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ५० लोक गंभीर जखमी झाले. २२ मे २०१२ : आंध्र प्रदेशमध्ये हुबळी-बंगळुरु-हम्पी एक्स्प्रेस एका मालगाडीवर आदळली, ज्यामुळे भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ४३ प्रवाशी गंभीर जखमी झाले. या अपघातात चार डबे रुळावरून घसरले होते, तर एका डब्याला आग लागली होती. २८ मे २०१० : मुंबईकडे निघालेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचा पश्चिम बंगालच्या झरग्राम येथे मालगाडीला टक्कर लागून भीषण अपघात झाला. या अपघातात १४५ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. ९ सप्टेंबर २००२ : बिहारच्या रफीगंज येथे नवी दिल्ली - हावडा राजधानी एक्स्प्रेसला भीषण अपघात होऊन जवळपास १४० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. २ ऑगस्ट १९९९ : ब्रह्मपुत्रा मेल स्थानकावर उभ्या असलेल्या अवध-आसाम एक्स्प्रेसला आदळल्यामुळे मोठा अपघात होऊन २८५ लोकांचा मृत्यू ओढवला होता. तसेच या अपघातात ३०० प्रवासी जखमी झाले होते. ओडिशाच्या अपघाताची दाहकता या अपघाताएवढीच आहे. २६ नोव्हेंबर १९९८ : पंजाबच्या खन्ना येथे जम्मू तावी-सेल्डाह एक्स्प्रेस गोल्डन मेलवर धडकल्यामुळे भीषण अपघात होऊन २१२ प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. २० ऑगस्ट १९९५ : फिराझोबाद येथे पुरुषोत्तम एक्स्प्रेस कालिंदी एक्स्प्रेसवर जाऊन आदळली होती. या अपघातात ३०५ प्रवाशांचा मृत्यू ओढवला होता. ६ जून १९८१ : रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात म्हणून या अपघाताकडे पाहिले जाते. बिहारच्या बागमती नदीवरील पूल ओलांडत असताना रेल्वे नदीत कोसळली. ज्यामुळे ७५० प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. २३ डिसेंबर १९६४ : तामिळनाडूच्या धनुषकोडी येथे १९६४ साली रेल्वेचा एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात रेल्वे आदळली नाही की सिग्नल यंत्रणा खराब झाली नाही. हा अपघात निसर्गाच्या कोपामुळे झाला. रामेश्वरम येथे आलेल्या सागरी वादळामुळे संपूर्ण रेल्वेच वादळाच्या तडाख्यात सापडली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात जवळपास १२६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.