लोकसत्ता टीम
पाकिस्तानजवळच्या समुद्रामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे साठे मूर्तरूपात उतरल्यास पाकिस्तानी अर्थव्यस्थेची भाग्यरेखा बदलू शकतात, असे तेथील माध्यमांनी म्हटले आहे. मात्र त्याच वेळी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला असून, प्रत्यक्ष तेल किंवा नैसर्गिक वायू हाती येण्यासाठी अनेक वर्षे आणि कित्येक अब्ज डॉलरची गुंतवणूक करावी लागेल असे बजावले आहे.
तेलसाठे कुठे आढळले?
यााविषयी स्पष्टता नाही. डॉन न्यूज टीव्हीने एका संरक्षण अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे, की पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये एका ‘मित्रदेशा’च्या मदतीने गेली तीन वर्षे सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान पाकिस्तानी समुद्रामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळून आले. यासंबंधी पाकिस्तान सरकारला आणि भूगर्भविज्ञान तज्ज्ञांना कळवण्यात आले आहे. निव्वळ साठे आढळून भागत नाही, त्यांचे उत्खनन करावे लागते. यासंबंधी कोणत्या देशांची मदत घेता येईल, याविषयी विचारविनिमय सुरू झाल्याचे डॉन न्यूज टीव्हीने संबंधित अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
हेही वाचा >>>Problem of ‘unmanaged’ waste: लांछनास्पद: प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये भारत जगात अव्वल, नवीन अभ्यास काय सांगतो?
किती साठा आढळला?
पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसृत झालेली नाही. पण हा साठा प्रचंड असल्याचे सांगितले जाते. एका दाव्यानुसार, हा जगातील चौथ्या मोठ्या क्रमांकाचा साठा असू शकेल. त्यातून खरोखर तेल आणि नैसर्गिक वायू हाती लागला, तर पाकिस्तानची भाग्यरेखाच बदलून जाईल, असे दावे काही अधिकारी करू लागले आहेत. पाकिस्तानच्या जवळ इराण आणि पस्चिम आशियातील इतर देश तेलसाठ्यांनी समृद्ध आहेत. इराण, कतारच्या समुद्रात नैसर्गिक वायूही मुबलक उपलब्ध आहे.
सर्वाधिक खनिज तेलसाठे कोणत्या देशात?
सध्या व्हेनेझुएलाकडे सर्वाधिक तेलसाठा असल्याचे मानले जाते. हा साठा ३.४ अब्ज बॅरल्स (पिंपे) इतका असू शकतो. अमेरिकेकडे सर्वाधिक हायड्रोकार्बनयुक्त शेल खडकाचे साठे आहेत, ज्यांतून खनिज तेल काढता येऊ शकते. खनिज तेलसाठ्याच्या बाबतीत व्हेनेझुएलानंतर सौदी अरेबिया, इराण, कॅनडा आणि इराक अशी क्रमवारी लागते. नॉर्वेच्या समुद्रातही मोठ्या प्रमाणावर तेलसाठे आढळून आले आहेत.
तेल उत्खनन कधी?
पाकिस्तानच्या तेल व नैसर्गिक वायू नियामक प्राधिकरणाचे माजी सदस्य मोहम्मद आरिफ यांनी यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला आहे. ड्रिलिंग आणि तेल प्राप्तीसाठी कित्येक वर्षे लागू शकतात. शिवाय साठे आढळले याचा अर्थ तितक्या प्रमाणात तेल मिळतेच असे नाही, असे आरिफ बजावतात. उत्खननासाठी जवळपास ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक लागेल. शिवाय चार ते पाच वर्षे केवळ उत्खननालाच लागतील. याशिवाय अशा तेलाची साठवणूक आणि वाहतूक यासाठी स्वतंत्र गुंतवणूक लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>>विश्लेषण: जर्मनीतील फोक्सवागेन कार कंपनीचा कारखाना बंद होणार? आर्थिक मंदीची लक्षणे?
पुन्हा चीनकडे धाव?
सध्या तरी मोठ्या प्रमाणात तेल उत्खननाची क्षमता आणि तांत्रिक सिद्धता अमेरिका, रशिया, चीन आणि काही युरोपिय देश अशा मोजक्याच देशांकडे आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती पाकिस्तानला काही प्रमाणात मदत करू शकतात. परंतु इराण किंवा अमेरिकेकडून मदत मिळण्याची शक्यता नाही. रशियाला स्वतःचेच तेलसाठे उत्खनन करण्यासाठी मनुष्यबळ आणि तांत्रिक सामग्री लागते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पाकिस्तानला चीनकडेच जावे लागेल, हे स्पष्ट आहे. चीनने पाकिस्तानातील अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली असली, तरी त्यावरील परताव्याची चीनला प्रतीक्षा आहे. प्राप्त परिस्थितीत पाकिस्तान परतावा देऊ शकेल अशा स्थितीत नाही. या देशावर कर्जाचा बोजा आहे. जो येत्या काळात वाढत जाणार.
पाकिस्तानची भाग्यरेखा बदलेल?
२०२३मध्ये पाकिस्तानने एकूण १७.५ अब्ज डॉलर मूल्याचे इंधन आयात केले. येत्या सात वर्षांत हा आकडा ३१ अब्ज डॉलरवर जाईल अशी अपेक्षा आहे. कदाचित भविष्यात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांमुळे आयातीवर विसंबून राहण्याची गरज पाकिस्तानला भासणार नाही असे गृहित धरले, तरी जगातील पाचव्या मोठ्या लोकसंख्येची ऊर्जा भूक येत्या काही काळात वाढलेली असेल. याशिवाय तेलाचे आणि वायूचे उत्खनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागेल, ज्याची परतफेड करता करता पाकिस्तानी अर्थव्यवस्था आणखी मेटाकुटीला येईल. हे सगळे गणित पाहता, पाकिस्तानची भाग्यरेखा खरोखर किती बदलेल याविषयी संदेह आहे. तशात येत्या पाचेक वर्षांत जीवाश्म इंधनाकडून स्वच्छ इंधन पर्यायांकडे मार्गक्रमण सुरूच राहील. त्यावेळी तेल आणि वायूसाठ्यांतून किती उत्पन्न मिळेल हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
© The Indian Express (P) Ltd