देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी गेल्या काही दिवसात वेगाने वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांनी आपल्या मोर्चा इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीकडे वळवला आहे. मात्र अलीकडच्या काही घटनांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याने लोकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. टू-व्हीलर इव्ही निर्मात्या ओकिनावा ऑटोटेकने काही स्कूटर्स परत मागवल्या आहेत. बॅटरीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या प्रेझ प्रो स्कूटरचे ३,२१५ युनिट्स परत मागवले आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने स्वेच्छेने परत मागवण्याची ही पहिलीच घटना आहे. स्कूटरला लागलेल्या आगीत एक व्यक्ती आणि १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आगीच्या घटनांमध्ये सामील असलेल्या इव्ही बॅचेस स्वेच्छेने परत बोलावण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवरही या गाड्या परत मागवल्या आहेत.

ओकिनावा कंपनीचं म्हणणं काय आहे?

एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, “बॅटरी लूज कनेक्टर किंवा कोणत्याही नुकसानीसाठी तपासल्या जातील आणि संपूर्ण भारतातील कोणत्याही ओकिनावा अधिकृत डीलरशिपवर विनामूल्य दुरुस्त केल्या जातील. इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर ग्राहकांच्या सोयीनुसार दुरुस्ती करणार आहे. यासाठी कंपनी डीलर्ससोबत काम करत आहे. यासाठी वाहन मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल.”

लिथियम-आयन बॅटरीमुळे आग?

ओकिनावा आणि इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड त्यांच्या इव्हीमध्ये लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमधील आगीचे मुख्य कारण ही बॅटरी असल्याचं बोललं जात आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा बॅटरी पॅक गरम झाल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे. याशिवाय वाढत्या तापमानामुळे फटका बसत असल्याचं बोललं जात आहे. अनेक भागात तापमान ४० अंशांपेक्षा जास्त वाढले आहे, अशा परिस्थितीत बॅटरीला आग लागण्याचा धोका वाढला आरोग्य तपासणी केली जाईल आणि गरज पडल्यास त्यांच्या बॅटरी आणि इतर भागांची मोफत दुरुस्ती केली जाईल.

विश्लेषण: गेल्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तिपटीने वाढ, जाणून घ्या कारणं

ओकिनावा कंपनीच्या स्कूटर्सची मागणी

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये राजस्थानच्या भिवडी येथील उत्पादन केंद्रातून स्थापन झालेल्या ओकिनावाने २०२१-२२ मध्ये ४६ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आणि त्यांचा बाजारातील हिस्सा ०.३९ टक्के होता. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटर हिरो आणि ओलाच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने नुकतीच हायस्पीड Okhi-90 ही गाडी लाँच केली आहे. मार्च महिन्यात एकूण ८,२८४ युनिटची विक्री झाली आहे. तर या वर्षाच्या शेवटापर्यंत ५० हजार युनिटची विक्री होईल असा कंपनीला विश्वास आहे.

आगीशी संबंधित घटना का वाढत आहेत?

गेल्या काही आठवड्यांमध्ये, ओकिनावा व्यतिरिक्त ओला इलेक्ट्रिक, प्युअर इव्ही आणि जितेंद्र इव्ही यांनी उत्पादित केलेल्या डझनभर इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागली आहे. कंपन्यांनी संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, रस्ते वाहतूक मंत्रालयानेही घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) युनिट सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (सीएफईईएस) मध्ये एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. या घटनांमागील निर्णायक कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी उद्योग तज्ज्ञांनी सांगितले आहे की, देशातील वाढणारे तापमान आणि उत्पादनातील दोष (हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर) ही आग लागण्याची संभाव्य कारणे असू शकतात.