Understand old age body balance science to eliminate elderly falling fear effectively. ७० किंवा ८० वर्षांचे झाल्यावर अनेकदा हाडांची घनता चांगली असूनही केवळ तोल जाण्याच्या भीतीने ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास ढासळतो. चालताना, वळताना किंवा जिना उतरताना शरीराचा तोल सांभाळणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपले डोळे, कान आणि स्नायू एकत्र काम करत असतात.

समस्या हाडांमध्ये नसते

“डॉक्टर, मला चालताना फारसा त्रास होत नाही. पण आता जिना उतरताना भीती वाटते. कधी पाय घसरला तर?” ७२ वर्षांच्या एका आजींनी फिजिओथेरेपीच्या तपासणीदरम्यान हा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे त्यांना फारशा वेदना नव्हत्या, हाडांची घनताही समाधानकारक होती आणि कोणताही मोठा आजार नव्हता. तरीसुद्धा त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता. बाहेर चालणं, गर्दीत जाणं किंवा जिना उतरणं याबद्दल त्या साशंक होत्या. अशी परिस्थिती अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येते. काही वेळा समस्या हाडांमध्ये नसते, तर शरीराचा तोल सांभाळण्याच्या क्षमतेमध्ये किंवा त्या क्षमतेबद्दलच्या आत्मविश्वासामध्ये असते. म्हणूनच पडण्याची भीती हा आज वृद्धत्वाशी संबंधित एक महत्त्वाचा आरोग्यविषयक मुद्दा मानला जातो.

संतुलन म्हणजे नेमकं काय?

आपण चालतो, वळतो, बसतो, उभे राहतो किंवा एखादी वस्तू उचलतो, तेव्हा शरीर सतत तोल सांभाळत असतं. हे इतकं सहज घडतं की त्याची आपल्याला जाणीवही होत नाही.
पण संतुलन ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यासाठी शरीरातील तीन महत्त्वाच्या प्रणाली एकत्र काम करतात:

  • डोळे (Vision)
  • कानातील संतुलन यंत्रणा (Vestibular System)
  • स्नायू व सांध्यांमधून मिळणारी माहिती (Proprioception)

या तिन्ही स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर मेंदू एकत्रितपणे प्रक्रिया करतो आणि शरीराला योग्य प्रतिसाद देण्यास मदत करतो. त्यामुळेच आपण अंधारात चालताना, उंचसखल रस्त्यावर चालताना किंवा अचानक धक्का लागल्यावरही अनेकदा स्वतःला सावरू शकतो.

Old age body balance science and exercises for elderly | Seniors understanding elderly falling fear factors | वृद्धत्वातील शारीरिक संतुलन आणि फिजिओथेरेपी व्यायाम | ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याची भीती दूर करण्याचे उपाय
वृद्धत्वातील शारीरिक संतुलन सुधारण्यासाठी फिजिओथेरेपी ठरते अत्यंत प्रभावी (Image- Gemini)

वय वाढलं की, संतुलन का बदलतं?

वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासोबत शरीरात काही बदल होतात.
उदाहरणार्थ:

  • स्नायूंची ताकद कमी होऊ शकते
  • प्रतिक्रिया देण्याचा वेग कमी होऊ शकतो
  • दृष्टीत बदल होऊ शकतात
  • सांध्यांची हालचाल कमी होऊ शकते
  • पायांमधील संवेदनक्षमता कमी होऊ शकते

हे बदल संतुलनावर परिणाम करू शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती पडणारच. खरं तर अनेक जण ७० किंवा ८० वर्षांनंतरही आत्मविश्वासाने चालतात, प्रवास करतात आणि सक्रिय जीवन जगतात.

पडण्याची भीती कशी तयार होते?

काही लोकांना एकदा पडण्याचा अनुभव आलेला असतो. काहींनी इतरांना पडताना पाहिलेलं असतं. काही वेळा घरच्यांकडून सतत “जपून चाला”, “आता वय झालंय” अशा सूचना मिळत राहतात.
हळूहळू व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होऊ लागते.
मग ती व्यक्ती…

  • कमी चालते
  • बाहेर जाणं टाळते
  • जिने वापरणं कमी करते
  • शारीरिक हालचाल कमी करते

सुरुवातीला हे सुरक्षित वाटतं. पण काही महिन्यांनंतर याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

भीतीचं दुष्टचक्र

जेव्हा आपण हालचाल कमी करतो, तेव्हा शरीराची क्षमता कमी होऊ लागते.

  • स्नायू कमकुवत होतात
  • सहनशक्ती कमी होते
  • संतुलनाचा सराव कमी होतो
  • आत्मविश्वास घटतो

मग चालताना आणखी असुरक्षित वाटू लागतं. आणि एक चक्र सुरू फिरू लागतं.
भीती → कमी हालचाल → कमी ताकद → कमी संतुलन → अधिक भीती
हे चक्र जितकं वाढतं, तितका पडण्याचा धोका वाढू शकतो.

संतुलन फक्त पायांवर अवलंबून नसतं

अनेकांना वाटतं की, संतुलन म्हणजे फक्त पायांचे स्नायू मजबूत असणं.
प्रत्यक्षात संतुलनामध्ये खालील घटकांचाही सहभाग असतो:

  • पायांची ताकद
  • कंबरेचे स्नायू
  • कोअर स्नायूंमधील शक्ती
  • प्रतिक्रिया देण्याचा वेग
  • लक्ष आणि एकाग्रता
  • आत्मविश्वास
    म्हणूनच काही वेळा व्यक्तीची ताकद चांगली असली तरी तिला अस्थिर वाटू शकतं.

मेंदू आणि संतुलन

संतुलन हा केवळ शारीरिक विषय नाही. त्यामध्ये मेंदूचीही महत्त्वाची भूमिका असते.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पूर्वी पडण्याचा अनुभव आला असेल, तर मेंदू काही परिस्थितींना ‘धोकादायक’ म्हणून लक्षात ठेवू शकतो.
मग त्यामुळे…

  • जिना दिसला की भीती वाटते
  • गर्दीत चालताना अस्वस्थता वाटते
  • वेगाने चालणं टाळलं जातं
    या भीतीमुळे शरीर अधिक ताठर होतं आणि चालण्याची पद्धत बदलते. परिणामी संतुलन आणखी बिघडू शकतं.

फिजिओथेरेपीमध्ये काय केलं जातं?

फिजिओथेरेपीमध्ये संतुलनाचं मूल्यमापन अत्यंत महत्त्वाचं असतं.
यामध्ये तपासलं जातं:

  • व्यक्ती कशी चालते?
  • दिशा बदलताना तोल जातो का?
  • एका पायावर उभं राहता येतं का?
  • खुर्चीतून उठताना अडचण येते का?
  • जिने चढणं-उतरणं सुरक्षित आहे का?
    या माहितीच्या आधारे संतुलन सुधारण्यासाठी वैयक्तिक कार्यक्रम तयार केला जातो.

संतुलन सुधारता येतं का?

होय, आणि ही सर्वात आशादायक गोष्ट आहे.
जसं स्नायूंची ताकद वाढवता येते, तसंच संतुलनही सुधारता येतं.
योग्य प्रशिक्षणामुळे:

  • प्रतिक्रिया देण्याचा वेग सुधारतो
  • चालण्याचा आत्मविश्वास वाढतो
  • पडण्याचा धोका कमी होतो
  • दैनंदिन कामं अधिक सहज होतात

विशेष म्हणजे संतुलन प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक उपकरणांची गरज नसते. अनेक वेळा साध्या आणि सुरक्षित हालचालींमधूनही चांगले परिणाम मिळू शकतात.

सक्रिय राहणं का आवश्यक आहे?

पडण्याची भीती वाटत असेल, तर हालचाल कमी करण्याऐवजी योग्य मार्गदर्शनाखाली सक्रिय राहणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
नियमित चालणं, घरातील कामं करणं, शरीराला विविध हालचालींची सवय ठेवणं आणि संतुलनावर काम करणं यामुळे शरीराची क्षमता टिकून राहते.
वृद्धत्वामध्ये स्वावलंबन टिकवण्यासाठी संतुलन ही तितकीच महत्त्वाची क्षमता आहे, जितकी ताकद किंवा सहनशक्ती.

कमी झालेल्या हालचालींचा परिणाम

पडण्याची भीती ही केवळ हाडांच्या कमकुवतपणामुळे निर्माण होत नाही. अनेक वेळा ती संतुलनातील बदल, आत्मविश्वासातील घट आणि कमी झालेल्या हालचालींचा परिणाम असते.
लक्षात ठेवा:

  • वय वाढणं म्हणजे पडणं अटळ नाही.
  • संतुलन ही सुधारता येणारी क्षमता आहे.
  • भीतीमुळे हालचाल कमी करणं समस्या वाढवू शकतं.
  • सक्रिय राहणं आणि संतुलनावर काम करणं हे निरोगी वृद्धत्वाचं महत्त्वाचं सूत्र आहे.
    अशा प्रकारे संतुलनाचं विज्ञान समजून घेतल्यास आपण केवळ पडण्याची भीती कमी करू शकत नाही, तर अधिक सक्रिय, स्वतंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगू शकतो.