How ethanol blending in India is accelerating the national water crisis: इथेनॉल व पेट्रोल यांचे मिश्रण असलेल्या इंधनाची निर्मिती करण्याकडे भारताचा कल वाढला आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्याच्या दिशेने देशात पाऊलं उचलली जात आहेत. परंतु, इथेनॉल निर्मिती करताना पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. मका, ऊस आणि तांदूळ यांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. इतर कोणत्याही पिकांपेक्षा मका, ऊस आणि तांदूळ या पिकांना सर्वाधिक पाणी लागते. “इथेनॉल मिश्रीत इंधनाची निर्मिती करताना भारतावरील पाणी संकट आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते. इथेनॉल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने तांदूळ, मका आणि ऊस आहे. या पिकांसाठी शेतीत सर्वात जास्त पाण्याचा वापर करावा लागतो”, असे इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचे अभ्यासक अंजल प्रकाश यांनी म्हटले आहे.
इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय? तांदूळाचा त्यासाठी कसा वापर होतो?
भारताचे कच्च्या तेलासाठी इतर देशांवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग ही संकल्पना अस्तित्वात आली. शेतातील टाकाऊ मालापासून तयार केलेल्या अल्कोहोलला इथेनॉल म्हटले जाते. हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून इंधन तयार केले जाते. यात इथेनॉलचे प्रमाण अधिक असते, तर पेट्रोलचे प्रमाण नगण्य असते.
भारतात इथेनॉल निर्मितीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तांदूळापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होत आहे. २०२४-२५ या वर्षात सरकारने ५२ लाख टन तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी वापरला होता. तर २०२५-२६ या वर्षात ९० लाख टन तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. गरीब कुटुंबांना सरकारकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तांदूळ वाटप केला जातो. गरीब कुटुंबांना वाटप केला जाणारा १० ते २५ टक्के तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी पुरवला जाणार आहे. इथेनॉल ब्लेंडिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा तांदूळ थेट डिस्टिलरिजला दिला जाणार आहे.
इथेनॉल ब्लेंडिंगचा पाण्यावर कसा परिणाम होणार?
तांदूळापासून इथेनॉल निर्मिती करण्याचे प्रमाण वाढले आहे. एक किलो तांदूळ उत्पादन घेण्यासाठी तांदूळाच्या पिकाला ३००० ते ५००० लिटर पाण्याची आवश्यकता असते. साधारणपणे अडीच ते तीन किलो तांदूळापासून एक लिटर इथेनॉल तयार केले जाते. त्यामुळे एक लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी वापरलेल्या तांदूळासाठी दहा हजारांहून अधिक लिटर पाण्याचा वापर केलेला असतो. दिल्लीत २०२४ मध्ये एक जागतिक परिषद पार पडली होती. त्यात फूड सेक्रेटरी संजीव चोपडा यांनी तांदूळापासून एक लिटर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी जवळपास १० हजार ७९० लिटर पाणी लागते. जे तांदूळाचे पिक घेण्यासाठी सिंचनाच्या माध्यमातून दिले जाते, असे संजीव चोपडा म्हणाले होते.
याच प्रमाणे मक्यापासून एक लिटर इथेनॉल निर्मिती केल्यास ४ हजार ६७० लिटर पाणी, तर ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ३ हजार ६३० लिटर पाणी लागते. एक टन (एक हजार किलो) तांदूळापासून फक्त ४७० लिटर इथेनॉलची निर्मिती होते, त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी तांदूळ वापरल्यास पाण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. “इथेनॉल निर्मिती प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर पडते. ते जमिनीला व जमिनीतील पाण्याला दूषित करू शकते”, असे अंजल प्रकाश यांनी म्हटले आहे.
भारतात पूर्वीपासूनच पाण्याची समस्या गंभीर का आहे?
इथेनॉल ब्लेंडिंगला वाढते प्रोत्साहन भविष्यात संकटांना आमंत्रण देऊ शकते. २०३० पर्यंत दिल्ली, बंगळुरू, चेन्नईसह २१ प्रमुख शहरांमध्ये भूजल पातळी शून्य होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाच्या कम्पोझिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स (सीडब्ल्यूएमआय) ने वर्तवला. भारताची एकूण इथेनॉल निर्मिती क्षमता १८२२ कोटी लिटर आहे. त्यातही पाण्याची समस्या गंभीर असलेल्या राज्यांमध्ये इथेनॉल निर्मितीचे प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्राची एकूण इथेनॉल निर्मिती क्षमता ३९६ कोटी लिटर आहे. परंतु, मराठवाडा व विदर्भात पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होतात. उत्तर प्रदेश व कर्नाटकात इथेनॉल निर्मितीचे प्रमाण वाढल्याने भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, इथेनॉल निर्मितीसाठी तांदूळाचा वापर केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाला प्राधान्य दिले जाऊ शकते. परंतु, ऊसापासून एक लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी ३ हजार ६३६ लिटर पाण्याचा वापर होतो.
“ऊस उत्पादन अधिक असलेल्या भागात इथेनॉल निर्मिती प्रकल्पांचे प्रमाण अधिक आहे, कारण ऊस मिळवणे प्रकल्पांना सोपे जाते. वर्षानुवर्षे ऊस उत्पादन घेतले जात असल्याने भूजल पातळीत घट झाल्याचे काही ठिकाणी दिसून आले”, असे ऊर्जा तज्ज्ञ स्वाती शेषाद्री म्हणाल्या. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात भूजलाची पातळी कमी आहे. या राज्यांमध्ये ऊसापासून इथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते, त्यामुळे तिथे पाण्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तसेच पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांनी भूजल पातळी कमी होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या आहेत. हरीत ऊर्जा निर्मितीसाठी पिकांचा उद्योगांमध्ये वापर केला जात आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भारतातील शहरी भागांमध्ये पाणी टंचाईने लाखो नागरिकांवर परिणाम होऊ शकतो.
