One Nation, One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) लागू करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच एनडीए (NDA) २०३४ ऐवजी २०२९ मध्येच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या पर्यायावर विचार करीत असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. एनडीएला बहुमत असलेल्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विसर्जित करून, २०२९ मध्ये लोकसभेसोबत त्यांची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

यासंबंधीच्या चर्चांशी संबंधित सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी ११ ठिकाणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच पुढील दोन वर्षांत विधानसभा निवडणुका होणार आहेत; तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम व ओडिशा या चार राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सध्या एकाच वेळी होतात. या चारही राज्यांत सध्या एनडीएचे वर्चस्व आहे.

दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी संसदेची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. २०३४ मध्ये लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या दृष्टीने संबंधित विधेयकांचा अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. ही समिती विविध राज्यांमध्ये जाऊन सरकार, आमदार, कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करीत आहे. या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आगामी काळातील निवडणूक व्यवस्था कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मग २०२९ मध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होणार का? त्या कशा घेतल्या जाणार? एनडीएने पुढील दोन वर्षांत या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारं कायम ठेवली, तर जानेवारी २०२९ पर्यंत या राज्यांच्या विधानसभा विसर्जित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. त्यासाठी संबंधित राज्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकतात. घटनेच्या कलम 174(2)(b) नुसार राज्यपालांना हा अधिकार आहे. साधारणपणे सरकारच्या सल्ल्यानुसार किंवा सरकारने बहुमत गमावल्यास विधानसभा विसर्जित केली जाते.

एकदा विधानसभा विसर्जित झाली की, पुढचा टप्पा निवडणुकीचा असेल. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० नुसार विधानसभा विसर्जित झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणं निवडणूक आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे २०२९ मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत या राज्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

संसदीय समिती सध्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’शी संबंधित दोन विधेयकांचा विचार करीत आहे. त्यात १२९ वे घटनादुरुस्ती विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०२४ यांचा समावेश आहे. ही विधेयकं मंजूर झाली, तर लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ गरजेनुसार कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील निवडणूक चक्रात लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील. मात्र, या विधेयकांनुसार २०३४ मध्येच अशा पद्धतीच्या निवडणुका घेण्यात येतील.

द इंडियन एक्स्प्रेसने संसदीय समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांना ‘सध्या प्रस्तावित विधेयकांमध्ये २०३४ मध्ये एकत्र निवडणुका घेण्याची तरतूद आहे. मात्र, त्यापूर्वीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येतील का’ असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, याबाबतचा निर्णय एनडीएच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. हा विषय समितीच्या कार्यकक्षेत येत नाही.

दरम्यान, काही भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला आधीच पाठिंबा दर्शविला आहे. संसदेच्या संयुक्त समितीशी चर्चा केल्यानंतर गोवा, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र निवडणुका घेण्याच्या योजनेला स्पष्ट समर्थन दिले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी १ जुलैला संसदीय समितीशी झालेल्या चर्चेत या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या की, देशभरातील निवडणुकांचे वेळापत्रक एकत्र आणण्यासाठी दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ कमी करावा लागेल किंवा बदलावा लागेल. राष्ट्रीय हित लक्षात घेऊन, दिल्ली सरकार त्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. याचा अर्थ दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ एक वर्षाने कमी होऊ शकतो.

मात्र, २०२९ मध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घ्यायचे ठरवले, तर काही राज्यांच्या विधानसभेची मुदत संपण्याआधीच त्या विसर्जित कराव्या लागतील. त्यात गोवा, गुजरात, मणिपूर, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ सुमारे तीन वर्षांनी कमी होऊ शकतो. तर छत्तीसगड, मध्ये प्रदेश, मेघालय, नागालँड, राजस्थान व त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा कार्यकाळात सुमारे चार वर्षांची कपात होऊ शकते. या राज्यांमध्ये अनुक्रमे २०२७ व २०२८ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, विरोधकांचं सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाबमध्ये २०२७ मध्ये, तर हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मिझोराम व तेलंगणात २०२८ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही २०२९ मध्ये लोकसभा निवडणूक होईपर्यंत, त्या विधानसभांचा तीन ते चार वर्षांचा कार्यकाळ बाकी राहणार आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांमधील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच मतदारसंघ पुनर्रचनेच्या (Delimitation) मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये तणाव आहे. २०२९ मध्ये २२ एनडीएशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुका लोकसभेसोबत घेण्याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना विचारण्यात आलं. मात्र, हा केवळ अंदाजावर आधारित प्रश्न असल्याचे सांगत जयराम रमेश यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं.

मात्र, काँग्रेसची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “काँग्रेस ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या विरोधात आहे. ही संकल्पना घटनाविरोधी, लोकशाहीविरोधी आणि सरकारची जबाबदारी नाकारणारी आहे,” असं त्यांनी नमूद केलं. याबाबतची विधेयकं संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आली असून, समितीला हिवाळी अधिवेशनापर्यंत अहवाल सादर करायचा आहे. आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, २०२४ मध्ये काँग्रेस आणि डीएमकेसह काही विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची विधेयकं मांडण्यालाच विरोध केला होता. ही विधेयकं घटनाविरोधी असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्यानंतर मे महिन्यात संसदीय समितीने कर्नाटकचे तत्कालीन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनीही या विधेयकांना विरोध केला होता. आता शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

आतापर्यंत संसदीय संयुक्त समितीनं महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, गोवा व उत्तर प्रदेश या राज्यांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे. आता या चर्चांमधून नेमकं काय समोर येतं आणि २०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.