रसिका मुळ्ये

देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांचे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्याच्या निर्णयाची यंदापासून अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट  – सीयूईटी) पुढील टप्प्यांत वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट), देशभरातील आयआयटी आणि काही केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विद्यापीठांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) यादेखील सीयूईटीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तयार केला आहे. अद्याप प्रस्तावाच्याच पातळीवर हा विषय असला तरी या निमित्ताने राष्ट्रीय शिक्षण धोरणातील ‘एक देश, एक प्रवेश परीक्षा’ तत्त्वाच्या अंमलबजावणीकडे आता वाटचाल सुरू झाल्याचे दिसते आहे. या परीक्षा एकत्र करण्यामागील भूमिका, आव्हाने, अंमलबजावणी यांबाबतचा आढावा.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…

विद्यापीठ अनुदान आयोगाची भूमिका काय?

आतापर्यंत वेगवेगळी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या बहुतांशी पारंपरिक अभ्यासक्रमातील केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेश यंदापासून एकाच सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. केंद्रीय विद्यापीठांबरोबरच देशातील ८९ अभिमत, राज्य, खासगी अशी विद्यापीठेही या परीक्षेत सहभागी झाली आहेत. सध्या वेगवेगळे अभ्यासक्रम आणि विद्यापीठांचे पर्याय समोर ठेवताना विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात. जेईई, नीट आणि यंदापासून मोठय़ा प्रमाणावर सुरू झालेली सीयूईटी या प्रमुख परीक्षा ४८ ते ४९ लाख विद्यार्थी देतात. त्यातील जवळपास १५ ते १६ लाख विद्यार्थी तिन्ही परीक्षा देतात, काही विद्यार्थी दोन परीक्षा देतात. एकापेक्षा अधिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे जवळपास ५० टक्के आहे. प्रत्येक परीक्षेची पद्धत, वेळापत्रक, खर्च यांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. यातील अनेक परीक्षांमधील विषयही सामायिक असतात. या सगळय़ाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आयोगाने तयार केला आहे, असे आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

अभ्यासक्रम काय असेल?

नीट, जेईई आणि सीयूईटी या परीक्षा राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी असणाऱ्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षा होतील. नीटसाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय असतात, तर जेईईसाठी गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे विषय असतात. सीयूईटी तीन भागांत घेण्यात येते. पहिल्या भागात भाषा, दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय आणि तिसऱ्या भागात समान्यज्ञान अशी या परीक्षेची विभागणी केली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या विद्याशाखांचे पर्याय समोर ठेवायचे आहेत त्यानुसार त्यांनी पर्यायी विषयांची निवड करणे अपेक्षित आहे. नीट, जेईई या परीक्षा सीयूईटीमध्ये समाविष्ट केल्यास हीच पद्धत कायम राहील.

जेईई, नीट एकत्रीकरणाची अंमलबजावणी कधी?

सध्या एकाच प्रवेश परीक्षेचा विषय हा प्रस्तावाच्या पातळीवरच आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांतील (२०२३-२४) प्रवेशासाठी नवी परीक्षा लागू होणार नाही. मात्र त्यापुढील वर्षी म्हणजे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांसाठी नीट, जेईई या सीयूईटीमध्ये समाविष्ट होऊ शकतील. ही परीक्षा कशी असावी, त्यात कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. या समितीने दिलेला प्रस्ताव, परीक्षेचा आराखडा त्यावर चर्चा अशी सगळी प्रक्रिया झाल्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा विचार करण्यात येईल.  आम्हाला विद्यार्थ्यांवर कोणताच बदल अचानक लादायचा नाही. नव्या रचनेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा कक्षालाही (एनटीए) तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे, असे एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.

देशव्यापी परीक्षेचे नियोजन सुकर होईल?

यंदा सीयूईटीच्या नियोजनाबाबत अनेक वाद निर्माण झाले. देशभर होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दूरच्या शहरातील परीक्षा केंद्र मिळाले. त्यामुळे जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्ट रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. आयत्या वेळी अनेक संस्थांनी परीक्षा केंद्रासाठी नकार दिल्यामुळे गोंधळ झाला. त्यावर तोडगा म्हणून आता एनटीएने देशभर स्वत: केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण तीनशे केंद्रे सुरू करण्याचे विचाराधीन आहे. ज्या संस्था, महाविद्यालयांच्या आवारात अद्ययावत संगणकीय प्रणाली असलेली ही केंद्रे उभी राहतील त्या संस्थांकरवी परीक्षांचा कालावधी वगळून प्रशिक्षणासाठी या केंद्रांचा वापर करण्याचे नियोजन आहे. एनटीए जर ३०० केंद्रे सुरू करू शकले आणि त्याबरोबर २०० ते ३०० उपकेंद्रे परीक्षांपुरती सुरू करता आली तर दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे चांगले नियोजन होऊ शकते, असे कुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना वर्षांतून दोन किंवा तीन संधी द्याव्यात आणि त्यातील सर्वोत्तम गुण प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत, यासाठीही आयोगाचे नियोजन सुरू आहे.

आव्हाने काय?

परीक्षांची काठिण्यपातळी, प्रत्येक विद्याशाखेनुसार विषयांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे मोजमाप यातून सुवर्णमध्य साधणे हे मोठे आव्हान एकच प्रवेश परीक्षा घेताना एनटीएला पेलावे लागणार आहे. जेईई, नीटच्या तुलनेत सीयूईटीची काठिण्यपातळी कमी असल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे या विद्याशाखांची स्वायत्त मंडळे, अधिकार मंडळे यांची संमतीही आवश्यक आहे. ‘देशपातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा घ्यावी, विद्यार्थ्यांवरील अनेक परीक्षांचा ताण कमी करावा याबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आज ना उद्या एकाच परीक्षेचा विचार करावाच लागेल. वेगवेगळय़ा विद्याशाखा, त्यांची स्वायत्त मंडळे, तज्ज्ञ या सगळय़ांशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय होणार आहे. मात्र, कोणत्याही नव्या पर्यायाचा विचार करताना कोणत्याही अधिकार मंडळाची ताठर भूमिका असू नये, असे मत कुमार यांनी व्यक्त केले.

rasika.mulye@expressindia.com