भारतीय रेल्वे मंडळाने कांदा वाहतूक नियमांत सुधारणा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मालगाडीच्या डब्यात कांदा भरण्याची आकारणीय क्षमता कमी केल्यामुळे मालवाहतूक खर्चात थेट बचत होणार आहे. यानिमित्ताने अतिरिक्त आर्थिक भुर्दंडातून सुटका होऊन कांदा व्यापार आणि निर्यात क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही होण्याची अपेक्षा आहे.

निर्णय काय ?

रेल्वे मंडळाने प्रत्येक वाघिणीत कांद्याच्या मालासाठीची किमान आकारणीय क्षमता कमी करण्याचा निर्णय घेतला. कांद्याच्या वाहतुकीसाठी बीसीएन आणि बीसीएनए प्रकारच्या रेल्वे वाघिणी वापरल्या जातात. यामध्ये कांदा भरण्याची आकारणीय क्षमता साधारणतः ६४ टनांवरून ४५ टनांपर्यंत आणली आहे. या सुधारणेमुळे देशभरात रेल्वेद्वारे होणारी कांद्याची वाहतूक स्वस्त होणार आहे. सुधारित सूचना वर्षभरासाठी म्हणजेच २७ ऑक्टोबर २०२७पर्यंत लागू असतील.

मालवाहतूक खर्चात कपात

पूर्वी ६४ टन क्षमता असताना व्यापाऱ्याला ६४ टन किंवा त्याहून अधिक कांद्याच्या वजनानुसार भाडे भरून वाघीण नोंदणी करावी लागत असे. मात्र, कांदा हा नाशवंत माल असल्यामुळे प्रवासादरम्यान तो खराब होऊ नये, यासाठी वाघिणीत हवेची पुरेशी खेळती जागा ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे व्यापारी पूर्ण क्षमतेचे भाडे भरूनही एका वाघिणीत जास्तीत जास्त ४५ टनच कांदा भरत असत. रेल्वे मंडळाने आता आकारणीय वजनाची मर्यादा औपचारिकपणे ४५ टनांपर्यंत कमी केली. म्हणजेच माल पाठवणाऱ्यांना किमान ४५ टन किंवा प्रत्यक्ष भरलेल्या मालाचे वजन यापैकी जे अधिक असेल, त्यानुसारच भाडे द्यावे लागेल. याआधी १५ ते २० टनांच्या अतिरिक्त वजनाचे पैसे मोजावे लागत होते. त्यातून आता व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या रेल्वे वाहतूक भाड्यात सुमारे २९ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

रेल्वेचा प्रयत्न काय ?

या सुधारणांमुळे प्रत्यक्षात भरलेल्या मालाचे वजन आणि आकारले जाणारे वजन यांतील तफावत दूर होणार आहे. शेतीमालावरील वाहतुकीचा आर्थिक भार कमी होऊन रेल्वे मालवाहतूक अधिक किफायतशीर होईल, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. अपेडाने व्यापारी आणि निर्यातदारांना कमी केलेल्या अनुमत वहनक्षमतेची माहिती देऊन या सवलतीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, अशी विनंती रेल्वेने केली. पूर्वीच्या निकषांनुसार व्यापाऱ्यांना केवळ ४५ टन माल भरूनही न वापरलेल्या अतिरिक्त क्षमतेचे भाडे भरावे लागत होते. अतिरिक्त आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी त्यांना रस्ते वाहतूक अधिक स्वस्त वाटत होती. रस्ते वाहतुकीत प्रत्यक्ष वाहून नेलेल्या मालाच्या वजनानुसारच पैसे द्यावे लागतात. त्यामुळे रस्ते वाहतुकदारांकडे वळलेली कांदा वाहतूक पुन्हा रेल्वेकडे आकर्षित करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न आहे. वर्षभरासाठी ही सवलत योजना राबवून त्याला मिळणारा प्रतिसाद तपासला जाणार आहे.

स्पर्धात्मकता वाढणार

कांदा हा नाशवंत कृषिमाल असल्याने त्याची जलद आणि कमी खर्चात बाजारपेठेपर्यंत वाहतूक होणे आवश्यक आहे. कांदा उत्पादनानंतर पॅकिंग, साठवणूक, वाहतूक आणि निर्यात प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. विशेषतः लांब पल्ल्याच्या बाजारपेठांपर्यंत कांदा पाठवताना वाहतूक खर्चाचा मोठा आर्थिक भार व्यापारी आणि निर्यातदारांना सहन करावा लागतो. या परिस्थितीत रेल्वे वाहतूक भाड्यात कपात होणे ही व्यापार आणि निर्यात क्षेत्रासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. महाराष्ट्रातून देशातील विविध राज्यांमध्ये तसेच बंदरांच्या माध्यमातून परदेशात कांदा पाठवणाऱ्या निर्यातदारांना या निर्णयाचा लाभ होईल. भारतीय कांद्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रासाठी महत्त्व काय ?

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधून देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठांमध्ये कांद्याची वाहतूक केली जाते. राज्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी बाजारभाव, निर्यात धोरणातील अनिश्चितता, साठवणुकीच्या अडचणी आणि वाढता वाहतूक खर्च या समस्यांना तोंड देत आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने स्वागत केले. या निर्णयामुळे होणारी आर्थिक बचत केवळ व्यापारी आणि निर्यातदारांपुरती मर्यादित राहू नये. त्याचा प्रत्यक्ष फायदा कांदा उत्पादकांना मिळणाऱ्या खरेदी दरातही दिसला पाहिजे, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मांडली. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांना रेल्वे वाहतुकीशी जोडून कांद्यासाठी विशेष मालवाहतूक सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

aniket.sathe@expressindia.com