राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध पत्रकाद्वारे राज्यातील १०२ व्यक्ती पाकिस्तानी हस्तक शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय समाज माध्यमाद्वारे तरुणांना भडकावून त्यांना दहशतवादी कारवाया, अमली पदार्थांच्या तस्करीसाठी प्रवृत्त करणाऱ्या भट्टीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली होती. पालकांनी या दृष्टीने सतर्क राहावे, असेही आवाहन केले होते. पुण्यातील ६६ जणांची या दिशेने चौकशीही सुरू करण्यात आली आहे. एक गुंड ते पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटिलिजन्स’चा (आयएसआय) हस्तक, लॉरेन्स बिष्णोई टोळीशी वैर आदी घटनांचा संबंध काय, याचा हा आढावा.

शहजाद भट्टी कोण?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मूळचा असलेला शहजाद भट्टी हा समाज माध्यमांवर व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक आणि सामाजिक विषयावरील वक्ता म्हणून वावरत होता. मात्र उपलब्ध अनधिकृत माहितीनुसार, पाकिस्तानात त्याच्यावर २०१३ पासून चोरी आणि दरोड्याचे अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. २०१५ नंतर बलात्कारासारखे गंभीर गुन्हेही त्यांच्यावर दाखल झाले. त्याच काळात तो दुबईला पळून गेला. दुबईत तो दुग्धव्यवसाय करू लागला.

दुबईत असताना त्याचा संबंध बलुचिस्तानात पाळेमुळे असलेल्या फारूक खोकार टोळीशी आला. या टोळीचा तो एक प्रमुख बनला. ३३३ या नावे तो वावरू लागला. धार्मिक विषय तसेच भारत-पाकिस्तान संबंधावर तो वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित करू लागला. या मार्गातून त्याने तरुणांना भडकावण्यास सुरुवात केली. यातूनच तेहरिक-ए- तालिबान हिंदुस्तान (टीटीएच) या गटामागे असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळू लागली आणि त्याचे महत्त्व वाढले. त्याआधी तो छुप्या पद्धतीने भारतात दहशतवादी कारवाया, अमली पदार्थ तस्करीसाठी तरुणांची भरती करण्यात सक्रिय झाला होता.

भारताशी भट्टीचा काय संबंध?

फेब्रुवारी २०२६ मध्ये गुरदासपूर येथे दोन पंजाब पोलिसांना ठार करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असताना तपास यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांना ‘तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्तान’ या आतापर्यंत संपूर्णपणे अपरिचित गटाचे नाव पुढे आले. हा गट स्थापन करण्यामागे भट्टी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही संघटना पाकिस्तानात सक्रिय आहे. मात्र या संघटनेने भारतात गट स्थापन केला आहे किंवा नाही, याची खातरजमा तपास यंत्रणांना करता आली नाही. मात्र याचा वापर करून भट्टी सक्रिय झाला. त्यातच भट्टीने दोन पोलिसांच्या हत्येची ध्वनिचित्रफित प्रसारित केल्यामुळे तो तपास यंत्रणांच्या रडारवर आला.

२४ मे २०२६ रोजी पंजाबमधील आणखी एका पोलिसाची हत्या झाली. या प्रकरणात ज्याला अटक करण्यात आली, त्याचा ‘तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्तान’ या गटाशी म्हणजे भट्टीशी संबंध असल्याचे प्रस्थापित झाले. त्यानंतर या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भट्टीशी संबंधित अनेक तरुणांना ताब्यात घेतले. भट्टीचे हस्तक अबीद जुट्ट आणि अजमल गुज्जर या दोघांशी या तरुणांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांना पाकिस्तानातील ‘आयएसआय’शी संबंधित हस्तकाकडून आर्थिक पाठबळ पुरविण्यात आल्याची बाब तपासात उघड झाली. हा हस्तक म्हणजे भट्टी असल्याची तपास यंत्रणांची खात्री पटली. त्यानंतर देशभरात भट्टीशी संपर्कात असलेल्या तरुणांची धरपकड सुरु करण्यात आली.

कार्यपद्धती कशी?

आतापर्यंत पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी छुपा संबंध असलेले हस्तक भारतात थेट दहशतवादी कारवाया घडवून आणत होते. आता मात्र भट्टीने भारतीय तरुणांची माथी भडकावून त्यांच्यामार्फत दहशतवादी कारवाया घडविण्याचा मोठा कट आखला होता. (मागे स्टुडन्टस् इस्लामिक मुव्हमेंट ॲाफ इंडिया अर्थात सिमीचा पाकिस्तानी हस्तकांनी बॅाम्बस्फोट घडविण्यासाठी वापर केला होता) त्यासाठी त्याने पद्धतशीरपणे काही भारतीय तरुणांना हाताशी धरले. उत्तर प्रदेशमधील धौलाणा येथील अझीम राणा आणि मेरठमधील आझाद राजपूत यांना तपास यंत्रणेने मार्च २०२६ मध्ये अटक केली तेव्हा हे दोघेही समाज माध्यम आणि एनक्रिप्टेड (सुरक्षित/गुप्त) संवाद माध्यमांद्वारे पाकिस्तानातील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असे निष्पन्न झाले.

धार्मिक स्थळे, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणांशी संबंधित छायाचित्रे, ध्वनिचित्रफित आणि विशिष्ट ठिकाणांची माहिती गोळा करून ती पाठवत होते. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी या आरोपींनी पाकिस्तानातील सूत्रधारांना अनेक ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रे पाठवली होती. त्यामध्ये दिल्लीतील सनातन धर्म मंदिर, ग्रेटर नोएडातील रावण मंदिर, रमेश नगर मेट्रो रेल्वे स्थानक आणि इतर अनेक सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होता. सदर माहिती गोळा करून पुढे पाठवण्यासाठी आरोपींना भरमसाट आर्थिक मोबदला मिळाला होता. याच तपासात पाकिस्तानातील कथित सूत्रधार शहजाद भट्टी असल्याचे स्पष्ट झाले.

लॉरेन्स बिश्नोईचा संबंध काय..

मुंबईत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या बिश्नोई टोळीतील प्रमुख सूत्रधार झीशान अख्तर हा भारताबाहेर पळून गेल्यावर त्याला भट्टीने मदत केली होती, अशी माहिती या प्रकरणी तपासात उघड झाली. २०२५ मध्ये अख्तर यानेच ध्वनिचित्रफित प्रसारित करून भट्टीचे जाहीरपणे आभार मानले. इतकेच नव्हे तर ‘मोठा भाऊ’ असा उल्लेख केला. भट्टी याचा याआधी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याच्याशी सलोख्याचा संबंध होता. मात्र पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यात बिनसले. बिश्नोई टोळीने परदेशात वास्तव्याला असलेल्या भट्टी याला संपविण्याचे ठरवले. पण त्यात त्याला यश आले नाही. परंतु भट्टी याच्यावर जेथे हल्ले झाले, त्या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली. पोर्तुगाल, ब्राझील येथे भट्टीवर जीवघेणे हल्ले झाले. मात्र त्यातून तो बचावला.

डिजिटल भरती मॉडेल…

मे २०२६ मध्ये, राजस्थान दहशतवादविरोधी पथकाने भट्टीशी संबंधित २० जिल्ह्यांतील ६० ठिकाणी छापे टाकले. ‘पे-पर-टास्क’ (प्रत्येक कामासाठी मोबदला) या पद्धतीवर हे मोड्युल किंवा गुप्त साखळी कार्यरत होती. समाज माध्यम, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्स व एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणांना सामील करून घेतले जात होते. या तरुणांना सुरुवातीला रेल्वे स्थानके, सरकारी इमारती, लष्करी छावणीचे परिसर आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांची छायाचित्रे काढणे आदी कमी जोखमीची कामे दिली जात असत. त्यानंतर याच तरुणांना मोक्याच्या ठिकाणांची टेहळणी, गुप्त माहिती गोळा करणे आणि प्रचारात्मक कारवायांची जबाबदारी दिली जात होती.

या कारवाईमुळे संपूर्ण भारतातील सुमारे ९०० तरुण या मोड्युलमध्ये असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत संवेदनशील ठिकाणे, वाहतूक पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या इतर ठिकाणांची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती असलेले मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. समाज माध्यमांवरील प्रभाव, आर्थिक प्रलोभने आणि गुप्त माहिती गोळा करण्याच्या कारवाया यांचा मेळ घालणाऱ्या वाढत्या डिजिटल भरती मॉडेलचे उदाहरण म्हणून तपास यंत्रणांनी या पद्धतीचे वर्णन केले आहे.

दहशतवादाचा नवा अवतार?

भट्टी हा भारतात दहशतवादाचा नवा अवतार आणू पाहत होता, अशी आता तपास यंत्रणांची ठाम धारणा झाली आहे. फेब्रुवारी ते जून २०२६ या काळात केलेल्या कारवाईतून धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. पारंपरिक संघटित गुन्हेगारी किंवा स्वतंत्र दहशतवादी गटांच्या पलीकडे दहशतवादाचे नवे जाळे विस्तारलेले होते. संघटित गुन्हेगारी, हेरगिरी, प्रचार, भरती आणि दहशतवादाला मदत करणे या बाबींचा सरमिसळ करून दहशतवादाचे नवे मोड्युल देशात तयार केले जात होते. शहजाद भट्टी नेटवर्क, तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान आणि भारतीय यंत्रणांनी उघडकीस आणलेले विविध गट हे पारंपरिक रचनेवर अवलंबून न राहता, डिजिटल प्लॅटफॉर्म, गुन्हेगारी पायाभूत सुविधा आणि स्थानिक भरती केलेल्या व्यक्तींचा वापर करून आपले ईप्सित साध्य करण्याचा हा प्रयत्न होता. तूर्तास तो हाणून पाडल्याचा तपास यंत्रणांना दावा आहे.

nishant.sarvankar@expressindia.com