Online Shopping Add on Charges : ऑनलाइन वस्तू खरेदी करताना किंवा जेवणाची ऑर्डर देताना स्क्रीनवर दिसणारी किंमत आणि प्रत्यक्ष पैसे भरताना आकारली जाणारी रक्कम यात फरक जाणवतो का? सुरुवातीला परवडणारी वाटणारी ऑर्डर शेवटच्या टप्प्यावर प्लॅटफॉर्म शुल्क, कन्व्हिनियन्स शुल्क (सुविधा शुल्क) किंवा इतर शुल्कांमुळे महाग होते. अनेकदा हे अतिरिक्त पैसे कशासाठी आकारले जातात, हे समजण्याआधीच आपण पैसे भरून मोकळे होतो.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट शुल्क (MDR) आकारल्यामुळे देशभरात गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ऑनलाइन खरेदीवर आकारल्या जाणाख्या अतिरिक्त शुल्कामुळेदेखील ग्राहकांच्या खिशाला झळ बसू शकते. फूड आणि किराणा डिलिव्हरीपासून ई-कॉमर्स, मनोरंजन आणि प्रवासाच्या बुकिंगपर्यंत अनेक सेवांमध्ये प्लॅटफॉर्म शुल्क आणि कन्व्हिनियन्स शुल्क आकारले जातात. त्यातच काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात शुल्काची रक्कम दाखवणं किंवा ग्राहकाची स्पष्ट परवानगी नसताना एखाद्या सेवेचं शुल्क बिलमध्ये जोडणं, अशा पद्धतींना ‘डार्क पॅटर्न्स’ म्हटले जाते. ग्राहकाला सुरुवातीला दिसत असलेली किंमत आणि प्रत्यक्षात भरावी लागणारी रक्कम यात मोठा फरक असू शकतो.
ऑनलाइन ऑर्डरवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची सुरुवात अगदी छोट्या रकमेपासून झाली. तीन वर्षांपूर्वी स्विगीने प्रत्येक व्यवहारावर दोन रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्याचा प्रयोग केला होता. मात्र, आता फूड आणि किराणा सामानाची ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर शुल्क आकारण्याची ही पद्धत सामान्य झाली आहे. झोमॅटो आणि ब्लिंकिटसारख्या कंपन्यांनीही ही पद्धत स्वीकारली आहे. एवढंच नाही, तर ॲमेझॉन इंडियाही बहुतांश ऑर्डरवर ग्राहकांकडून पाच रुपये सेवा शुल्क आकारत आहे. म्हणजेच, सुरुवातीला किरकोळ स्वरूपात आकारले जाणारे शुल्क आता ऑनलाइन खरेदीचा नियमित भाग बनले आहेत.
ऑनलाइन व्यवहार आता केवळ सोयीचा पर्याय राहिलेला नाही, तर अनेक सेवांसाठी तोच मुख्य मार्ग बनला आहे. पूर्वी रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी किंवा चित्रपटाचं तिकीट बुक करण्यासाठी प्रत्यक्ष काउंटरवर जावं लागायचं. आता ही कामं काही मिनिटांत मोबाईलवरून होतात. विमानप्रवासाचं तिकीट असो, सिनेमाचं तिकीट किंवा जेवणाच्या ऑर्डरचे बहुतांश व्यवहार ऑनलाइनच होत आहेत. मात्र, डिजिटल व्यवहारांमुळे कंपन्यांचा खर्च कमी होत असतानाही त्याचा ग्राहकांना थेट फायदा मिळताना दिसत नाही. उलट, मूळ किमतीसह इतर वेगवेगळ्या शुल्कांचा बोजा ग्राहकांवर पडत आहे.
सोयीच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क
ऑनलाइन डिलिव्हरी आणि सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क आता कंपन्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनले आहेत. रेल्वेचं ऑनलाइन तिकीट बुक करतानाही ग्राहकांना सुविधा शुल्क भरावं लागतं. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नॉन-एसी वर्गातील ई-तिकिटासाठी १५ रुपये आणि त्यावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जातो, तर एसी वर्गातील तिकीटासाठी ३० रुपये आणि जीएसटी आकारला जातो.
मात्र, भीम किंवा यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे भरणाऱ्या ग्राहकांसाठी हे शुल्क तुलनेने कमी आहे. अशा व्यवहारांमध्ये नॉन-एसी तिकिटासाठी १० रुपये, तर एसी तिकिटासाठी २० रुपये आणि त्यावर जीएसटी आकारला जातो. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला हातभार लावण्यासाठी या सवलती देण्यात येतात, असे आयआरसीटीसीने नमूद केले.
कंपन्यांच्या उत्पन्नांच्या गरजेसाठी शुल्कांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. जून २०२६ च्या तिमाहीत आयआरसीटीसीने सुविधा शुल्कातून २४८ कोटी रुपये कमावले. या काळात कंपनीचं एकूण उत्पन्न १,३६९ कोटी रुपये होतं. म्हणजेच, एकूण उत्पन्नातील १८ टक्क्यांहून अधिक वाटा सुविधा शुल्काचा होता. ई-तिकीट सेवांमधून मिळालेल्या ३६१ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा विचार केला, तर त्यातील ६८ टक्क्यांहून अधिक रक्कम या शुल्कातून मिळते.
स्विगी आणि झोमॅटो या कंपन्या सुविधा शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करत नाहीत. मात्र, उद्योगक्षेत्रातील विश्लेषकांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, या दोन्ही कंपन्यांना अशा शुल्कातून वर्षाला प्रत्येकी सुमारे एक हजार ते १,२०० कोटी रुपये मिळतात. मात्र, या शुल्कांमागे काही विसंगतीही आहेत. सुविधा शुल्क आकारल्याने वस्तूची अंतिम किंमत वाढते. ग्राहकांना अनेकदा खरेदी प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यावरच या किमतीविषयी माहिती मिळते, त्यामुळे सुरुवातीला दिसणारी किंमत आणि प्रत्यक्षात मोजावी लागणारी रक्कम यांत फरक पडतो.
दुसरीकडे, ऑनलाइन व्यवहारामुळे कंपन्यांचा खर्चही वाचतो. ग्राहकांना सेवा देण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची गरज कमी होते, तसेच दुकानं किंवा इतर भौतिक पायाभूत सुविधांवरील खर्चही वाचतो. असे असतानाही ऑनलाइन व्यवहाराच्या सोयीसाठी ग्राहकांकडून स्वतंत्र शुल्क आकारले जातात. डिजिटल व्यवहारांमुळे कंपन्यांचा खर्च वाचत असेल तर त्या बचतीचा फायदा ग्राहकांना मिळण्याऐवजी त्यांच्यावरच अतिरिक्त शुल्काचा भार का पडतो?
तंत्रज्ञान नियामक संस्थेच्या एका माजी प्रमुखांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हटले, “‘सुविधा शुल्क’ ही संकल्पनाच विसंगत आहे. ऑनलाइन सेवा दिल्यामुळे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा फायदा होतो. उदाहरणार्थ, तिकिटांच्या ऑनलाइन विक्रीमुळे प्रत्यक्ष काउंटर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची गरज कमी होते. यामुळे कंपन्यांवरील खर्चाचा भार कमी होतो, तरीही अतिरिक्त शुल्क मात्र ग्राहकांकडून आकारलं जातं, हा विरोधाभास आहे.”
सुरुवातीची किंमत आणि अंतिम बिलातील फरक
सुरुवातीला दिसणारी किंमत आणि पैसे भरताना समोर येणारं अंतिम बिल यांतील फरक आपल्या लक्षातच येत नाही. ऑनलाइन खरेदीवेळी कॅश ऑन डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर ग्राहक व्यवहार विभागाने यापूर्वी हस्तक्षेप केला होता. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या या पद्धतीला ‘डार्क पॅटर्न’ म्हटले जाते. मात्र, अशा शुल्कांबाबत धोरणात्मक पातळीवर स्पष्टता नसल्याचे दिसून येते.
ऑगस्टमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोवर कारवाई केली. कंपनीने ग्राहकांना सुरुवातीला कमी किंमत दाखवून आकर्षित केले आणि नंतर अतिरिक्त हँडलिंग शुल्क (हाताळणी शुल्क) आकारत होते. तसेच, ग्राहकांची परवानगी न घेताच सदस्यत्व योजनेसाठी अतिरिक्त शुल्कही आकारलं जात होतं. प्राधिकरणाने या प्रकाराला ‘बास्केट स्नीकिंग’ म्हटले आणि झेप्टोला सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि अशा ‘डार्क पॅटर्न्स’चा वापर थांबवण्याचे निर्देश दिले.
‘डार्क पॅटर्न्स’च्या माध्यमातून फसवणूक केली जाते. ‘बास्केट स्नीकिंग’मध्ये ग्राहकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय त्यांच्या शॉपिंग कार्टमध्ये एखादी अतिरिक्त वस्तू किंवा सेवा जोडली जाते. व्यवहाराच्या अंतिम टप्प्यात ग्राहकांना आधीच निवडलेले पर्याय, त्यांच्यावर आकारलेले शुल्क किंवा सक्तीच्या सेवा जोडल्या जातात.
ऑनलाइन विमान तिकीट बुक करतानाही सुरुवातीला दिसणारी किंमत आणि पुढील टप्प्यात दाखवलेली एकूण किंमत यात फरक दिसतो. उदाहरणार्थ, ‘यात्रा’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला उपलब्ध विमानांची तिकिटं आणि त्यांचे दर दिसतात. त्यापैकी एखादा पर्याय निवडल्यानंतर पुढच्या पानावर प्रवास भाड्याचा तपशील दिला जातो. यात मूळ भाड्यासोबत इंधन अधिभार, वापरकर्ता विकास शुल्क आणि जीएसटी यांचाही समावेश असतो.
थोडक्यात, कंपन्या सुरुवातीला कमी किंमत दाखवतात आणि खरेदीची प्रक्रिया पुढे सरकताच त्यात अनिवार्य कर, सेवा शुल्क किंवा इतर अतिरिक्त खर्च टप्प्याटप्प्याने जोडतात. या पद्धतीला ‘ड्रिप प्रायसिंग’ म्हणतात, त्यामुळे सुरुवातीला दिसणाऱ्या किमतीपेक्षा अखेरीस ग्राहकाला जास्त पैसे मोजावे लागतात.
