OpenAI lawsuit Samuel Nelson: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सल्ल्यानुसार चुकीच्या घटकांचं सेवन करून वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सॅम्युएल नेल्सनने आपला जीव गमावला. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मर्सिड येथील महाविद्यालयात मानसशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या सॅमला लेखनाची आवड होती. तो अभ्यासात हुशार होता. वसतिगृहातील सिम्बा नावाच्या मांजरावर त्याचा जीव होता. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याच्याही आयुष्यात अभ्यास, मित्र, आवडीनिवडी आणि भविष्याची स्वप्न बघत तो जगत होता. या सगळ्यात आणखी एका गोष्टीची भर पडली होती ती म्हणजे चॅटजीपीटीची.
२०२३ मध्ये त्याने या एआय साधनाचा वापर सुरू केला. सुरुवातीला संगणकातील तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी, गृहपाठात मदत करणं किंवा मनोरंजन क्षेत्रातील गप्पागोष्टी – असे प्रश्न तो चॅटजीपीटीला विचारात असे. प्रश्न पडला की एआयला विचारायचं, त्यामुळे तात्काळ काही सेकंदातच आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन करणारा एआय विद्यार्थ्यांचा मित्र झाला! तंत्रज्ञानाने विद्यार्थ्याचं काम सोपं करण्याचं जे आश्वासन दिलं होतं, त्याचा सॅमला फायदा होत होता.
मात्र पुढे या गप्पांचं स्वरूप बदलू लागलं. अभ्यासापुरता मर्यादित असलेला हा चॅटबॉट हळूहळू त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग बनला. मजेसाठी नशायुक्त पदार्थांचा वापर, त्यांचे परिणाम आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्न या गोष्टींसंबंधित सॅम एआयशी बोलू लागला. त्याच्या कुटुंबाने दाखल केलेल्या न्यायालयीन याचिकेनुसार, पुढे या संवादाने अत्यंत धोकादायक वळण घेतलं. त्याच्या कुटुंबाने दाखल केलेल्या न्यायालयीन याचिकेनुसार, पुढे या चॅटजीपीटी४ओ बरोबर झालेल्या संवादाने अत्यंत धोकादायक वळण घेतले.
३१ मे २०२५ रोजी सॅमच्या आईला तो आपल्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळला. अल्कोहोल, क्रॅटॉम ही वनस्पतीजन्य नशाकारक सामग्री आणि ‘झॅनॅक्स’ या औषधाच्या मिश्रणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्याहून गंभीर दावा म्हणजे, मृत्यूच्या काही तास आधी या पदार्थांच्या वापराबाबत चॅटजीपीटीने त्याला मार्गदर्शन केले होते.
१२ मे २०२६ रोजी सॅमच्या पालकांनी सॅन फ्रान्सिस्को येथील न्यायालयात दाखल केलेल्या दिवाणी खटल्यामुळे हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले. ओपन एआय, तिच्याशी संबंधित कंपन्या आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत उत्पादनाच्या रचनेपासून ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेपर्यंत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप न्यायालयात सिद्ध झालेले निष्कर्ष नसले, तरी एआयच्या वापराविषयीच्या चर्चेला ते नवे परिमाण देतात.
चॅटबॉटसारखा ‘मित्र’ धोकादायक ठरू शकतो?
एखाद्या व्यक्तीने चुकीचा किंवा धोकादायक प्रश्न विचारला, तर एआयने काय करावं? माहिती द्यावी, स्पष्ट नकार द्यावा की त्या व्यक्तीला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा? एआयच्या सुरक्षिततेसमोरील हा मूलभूत प्रश्न आहे. सॅमच्या कुटुंबाने दाखल केलेल्या याचिकेनुसार, २०२४ च्या सुरुवातीला सॅमने नशायुक्त पदार्थांच्या वापराबद्दल विचारले असता चॅटजीपीटीच्या जुन्या आवृत्तीने त्याला मार्गदर्शन करण्यास नकार दिला होता. त्याऐवजी संभाव्य आरोग्यधोक्यांची जाणीव करून देत वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला होता.
मात्र, पुढे चॅटजीपीटी-४ओ (चॅटGPT-4o) ही आवृत्ती आल्यानंतर चॅटबॉटच्या वर्तनात बदल झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. धोकादायक विषयांवर संवाद थांबवण्याऐवजी तो सुरू ठेवण्याची आणि वापरकर्त्याच्या प्रश्नांना शक्य तितकी समाधानकारक उत्तरं देण्याची प्रवृत्ती अधिक बळावल्याचा दावा करण्यात आला आहे. सॅमच्या कुटुंबाने चॅटजीपीटीच्या रचनेतील काही बाबींकडे विशेष लक्ष वेधलं आहे.
वैयक्तिक माहितीचा वापर की धोक्याची सूचना?
चॅटबॉट वापरकर्त्यांच्या आवडी, पूर्वीचे संवाद आणि काही वैयक्तिक तपशील लक्षात ठेवू शकतो, त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करण्याची गरज राहत नाही. ही सुविधा उपयुक्त असली, तरी तिचा वापर कसा होतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
याचिकेनुसार, सॅमने आपल्या व्यसनाशी संबंधित अडचणींबद्दल ‘एआय’ला सांगितलं. ही माहिती त्याला अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळवण्यासाठी वापरण्याऐवजी, त्याच्या नशेच्या अनुभवाशी संबंधित पुढील प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्यासाठी वापरली गेली, असा आरोप आहे. वापरकर्त्याला समजून घेणारी मेमरी आणि त्याच्या धोकादायक सवयींना अनुकूल होणारी मेमरी यांमध्ये मूलभूत फरक आहे. एआयने हा फरक ओळखणे आवश्यक नाही का, हा प्रश्न या प्रकरणातून पुढे येतो.
सहानुभूतीचा आभास आणि वाढते अवलंबित्व
‘मी तुझ्यासोबत आहे’, ‘तू एकटा नाहीस’ अशा शब्दांत संवाद साधणारा चॅटबॉट वापरकर्त्याला भावनिक आधार देत असल्याचा अनुभव देऊ शकतो. काही प्रसंगी अशा संवादामुळे एखाद्याला आपले विचार मांडणं सोपं जातं. पण, एआयला भावना समजून घेण्याची भाषा वापरता येते, याचा अर्थ त्याला माणसाप्रमाणे परिस्थितीचं भान किंवा जबाबदारीची जाणीव असतेच असं नाही.
सॅमच्या कुटुंबाचा आरोप आहे की, चॅटबॉटशी वाढलेल्या जवळिकीमुळे त्याचा त्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला. अशा परिस्थितीत चॅटबॉटने दिलेला चुकीचा सल्लाही विश्वासार्ह वाटू शकतो. वापरकर्ता त्याला केवळ माहिती देणारे साधन न समजता, स्वतःला समजून घेणारा विश्वासू मित्र मानू लागला तर धोका वाढू शकतो.
धोकादायक कल्पनांना प्रोत्साहन देणारी संमती
एखाद्या व्यक्तीच्या प्रत्येक कल्पनेला होकार देणं म्हणजे तिला मदत करणं नव्हे. मानसशास्त्राच्या भाषेत वापरकर्त्याला खूश करण्यासाठी त्याच्या मताला किंवा इच्छेला अवाजवी संमती देण्याच्या प्रवृत्तीला ‘सायकोफन्सी’ (Sycophancy) म्हणतात.
याचिकेत मांडल्यानुसार, सॅमने डेक्सट्रोमेथॉर्फनयुक्त कफ सिरपचा अतिरिक्त डोस घेण्याबद्दल विचारलं असता चॅटबॉटने त्याच्या योजनेचं कौतुक केल्याचा आरोप आहे. त्याच्या नशेच्या अनुभवाला पूरक संगीताची यादी तयार करणं आणि डोस वाढवण्याच्या विचारालाही सकारात्मक प्रतिसाद देणं, अशा बाबींचा उल्लेख याचिकेत आहे.
हा मुद्दा केवळ एका चॅटबॉटपुरता मर्यादित नाही. वापरकर्त्याला आनंदी ठेवणं, संभाषण सुरू ठेवणं आणि त्याला पुन्हा पुन्हा साधनाकडे आणणं यांना प्राधान्य मिळालं, तर चुकीच्या निर्णयाला विरोध करण्याची एआयची क्षमता कमी पडू शकते. अर्थात, अशा व्यावसायिक उद्दिष्टांमुळेच सॅमच्या बाबतीत हे घडलं, हा याचिकेतील आरोप आहे; त्याची स्वतंत्रपणे न्यायालयीन पडताळणी होणं आवश्यक आहे.
प्रत्येक संभाषणात धोक्याचे गांभीर्य लक्षात आले का?
एआय मॉडेलला मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया करता येते. मात्र, दीर्घ संवादातील प्रत्येक महत्त्वाचा तपशील प्रत्येक उत्तरात योग्य प्रकारे विचारात घेतला जाईलच याची हमी नसते. एखाद्या व्यक्तीने यापूर्वी व्यसन, मानसिक ताण किंवा आरोग्यविषयक गंभीर अडचणी सांगितल्या असतील, तर पुढील प्रश्नाचे उत्तर देताना ती पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. ती दुर्लक्षित झाली, तर वरकरणी साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तरही धोकादायक ठरू शकतं. सॅमच्या प्रकरणात अशाच प्रकारे त्याच्या परिस्थितीचं गांभीर्य पुरेसं लक्षात घेतलं गेलं नाही, असा याचिकेचा दावा आहे.
३१ मे २०२५ : एका प्रश्नाचं जीवघेणं उत्तर?
या प्रकरणातील सर्वांत गंभीर आरोप सॅमच्या मृत्यूच्या दिवशीच्या संवादाशी संबंधित आहेत. याचिकेनुसार, सॅमने त्या दिवशी सुमारे १५ ग्रॅम ‘क्रॅटॉम’चं सेवन केलं होतं. त्यानंतर त्याला तीव्र मळमळ होऊ लागली. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी झॅनॅक्स घेतल्यास चालेल का, असा प्रश्न त्याने ‘चॅटजीपीटी४ओ’ला विचारला. अशा वेळी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संभाव्य औषध-परस्परक्रियेचा आणि श्वसनक्रियेवर होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका ओळखणं. अल्कोहोलसारख्या इतर पदार्थांचाही वापर झाला असेल, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
मात्र, याचिकेतील दाव्यानुसार, चॅटबॉटने झॅनॅक्सचा विशिष्ट डोस सुचवला आणि तो त्या क्षणी योग्य पर्याय असल्याचे सांगितले. पुढे सॅमने दृष्टी अंधुक होणे आणि सतत उचकी लागणे यांसारख्या लक्षणांबद्दल विचारले असतानाही, तातडीची वैद्यकीय मदत घेण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात अपयश आले, असा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.
या संवादांचा संपूर्ण तपशील आणि त्यांचा मृत्यूशी असलेला संबंध न्यायालयीन प्रक्रियेत तपासला जाणे आवश्यक आहे. तरीही, या दाव्यांमधून एक मूलभूत प्रश्न समोर येतो : आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असताना एआयने माहिती देत राहावे की संवादाची दिशा बदलून वापरकर्त्याला तातडीने मदत मिळवून द्यावी?
अशा परिस्थितीत एआयने निदान करण्याचा किंवा औषधांचे डोस ठरवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपत्कालीन वैद्यकीय मदत घेण्यास सांगणे महत्त्वाचे आहे. कारण एआय कितीही प्रगत असले, तरी ते प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणीची जागा घेऊ शकत नाही.
सुरक्षिततेपेक्षा स्पर्धेला प्राधान्य दिले गेले?
सॅमच्या कुटुंबाच्या याचिकेत केवळ चॅटबॉटच्या उत्तरांवर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत; तर ते ज्या प्रक्रियेतून तयार झाले, त्या प्रक्रियेवरही आक्षेप घेण्यात आले आहेत. २०२४ मध्ये चॅटजीपीटी-४ओच्या लाँचिंगपूर्वी सुरक्षिततेच्या चाचण्या घाईघाईने पूर्ण करण्यात आल्या आणि अंतर्गत तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, असा याचिकेतील आरोप आहे. गूगलच्या जेमिनी मॉडेलच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ओपनएआयने उत्पादन लाँच करण्याची घाई केली, असाही दावा करण्यात आला आहे.
ओपनएआयमधील काही वरिष्ठ संशोधकांनी सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर राजीनामे दिल्याच्या घटनांचाही या संदर्भात उल्लेख होतो. कंपनीचे सह-संस्थापक इल्या सुत्सकेव्हर आणि सुपरअलाइनमेंट टीमचे प्रमुख जॅन लीके यांनी २०२४ मध्ये कंपनी सोडली होती. मात्र, त्यांच्या राजीनाम्यांमागील कारणे आणि सॅमच्या प्रकरणातील आरोप यांचा थेट संबंध असल्याचे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. तरीही, एआय उद्योगासमोरचा व्यापक पेच स्पष्ट आहे. नवे मॉडेल लवकर बाजारात आणण्याची स्पर्धा, वापरकर्त्यांच्या अपेक्षा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली काटेकोर चाचणी यांचा समतोल कसा साधायचा?
एखाद्या उत्पादनातील त्रुटीमुळे चुकीचे उत्तर मिळाले, तर ती तांत्रिक समस्या असू शकते. पण आरोग्य, व्यसन किंवा जीविताला धोका असलेल्या प्रसंगी चुकीच्या उत्तराचे परिणाम अधिक गंभीर असतात, त्यामुळे अशा साधनांच्या सुरक्षिततेची तपासणी ही केवळ लाँचिंगपूर्वी पूर्ण करायची औपचारिकता राहू शकत नाही.
एआयच्या चुकीची जबाबदारी कोणाची?
सॅमच्या पालकांनी दाखल केलेला खटला एआय कंपन्यांच्या कायदेशीर जबाबदारीविषयीही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो. एखाद्या चॅटबॉटने चुकीचा सल्ला दिला, तर त्यासाठी जबाबदार कोण? मॉडेल तयार करणारे संशोधक, त्याचे व्यावसायिक व्यवस्थापन करणारी कंपनी, उत्पादन बाजारात आणणारे अधिकारी की वापरकर्ता? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक प्रकरणातील तथ्ये, लागू कायदे आणि उपलब्ध पुराव्यांवर अवलंबून असेल. मात्र, एआयने दिलेल्या उत्तराला ‘मॉडेलची चूक’ म्हणून संबोधून कंपनीची जबाबदारी संपते का, हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा झाला आहे.
सॅमच्या कुटुंबाने उत्पादनातील दोष, निष्काळजीपणा आणि वैद्यकीय सल्ला देण्याच्या मर्यादांशी संबंधित कायदेशीर तरतुदींच्या आधारे दावे केले आहेत. याचिकेत कॅलिफोर्नियातील कायद्यांचाही आधार घेतल्याचे नमूद आहे. या दाव्यांचा अंतिम निकाल काय लागतो, हे न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या खटल्याचे महत्त्व केवळ नुकसानभरपाईपुरते मर्यादित नाही. एआय कंपन्यांनी वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घ्यावी, धोकादायक संवाद कसे ओळखावेत आणि गंभीर परिस्थितीत मानवी मदतीकडे कसे वळवावे, याबाबतही त्यातून महत्त्वाचे मुद्दे पुढे येऊ शकतात.
सॅमच्या पालकांनी दोषी ठरवलेल्या मॉडेल्सशी संबंधित डेटा नष्ट करणे, आर्थिक दंड आकारणे आणि स्वतंत्र सुरक्षा तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित आरोग्यविषयक सेवांचे कामकाज थांबवणे, अशा मागण्या केल्याचे याचिकेत नमूद आहे. या मागण्या म्हणजे न्यायालयाने दिलेले आदेश नव्हेत; त्या कुटुंबाने मागितलेल्या उपाययोजना आहेत.
एआय आपल्याला समजून घेतो की समजून घेतल्याचा भास निर्माण करतो?
एआयला मानवी भाषेत बोलता येते, सहानुभूती व्यक्त करता येते आणि पूर्वीच्या संवादांशी सुसंगत उत्तरे देता येतात, त्यामुळे त्याच्याशी भावनिक जवळीक निर्माण होणे सहज शक्य आहे. परंतु, त्याच्या भाषेतील आपुलकी आणि प्रत्यक्ष परिस्थितीचे सुरक्षित मूल्यमापन करण्याची क्षमता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सॅम नेल्सनच्या कुटुंबाने दाखल केलेल्या खटल्याचा अंतिम निष्कर्ष काहीही असो, या प्रकरणाने विचार करण्यास भाग पाडणारा प्रश्न उपस्थित केला आहे. एआय अधिक मानवी वाटावे, संवाद अधिक सहज व्हावा आणि वापरकर्त्याला अधिक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करताना त्याने धोकादायक प्रसंगी ठामपणे ‘नाही’ म्हणण्याची क्षमता गमावली, तर त्या प्रगतीचा अर्थ काय?
तंत्रज्ञानाची खरी कसोटी केवळ ते किती वेगाने उत्तर देते किंवा किती काळ वापरकर्त्याला गुंतवून ठेवते यात नाही. वापरकर्त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी ते कधी थांबते, चुकीच्या दिशेने जाणाऱ्या संवादाला कधी विरोध करते आणि गरज पडल्यास मानवी मदत घेण्यास कधी सांगते यातही आहे.
