संरक्षण विभागाच्या तिन्ही दलाचे प्रमुख वारंवार विनंती करुनही आपले अधिकारी-कर्मचारी पाकिस्तानने टाकलेल्या हेरगिरीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी ते घातक ठरत आहे. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला बाधक ठरेल अशी महत्त्वाची माहिती फोडल्याच्या आरोपावरून आंध्र प्रदेशमधील संरक्षण दलाच्या प्रति गुप्तचर (काऊंटर इंटिलिजन्स) या विशेष विभागाने अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई केली. हनी ट्रॅप, हेरगिरीविरोधात संरक्षण दलाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरू केला आहे. त्याचा कसा फायदा होत आहे, याचा हा आढावा.

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानच्या महिला गुप्तचर एजंट भारतीय संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या जाळ्यात ओढत असल्याची बाब आंध्र प्रदेश येथील प्रति गुप्तचर विभागाने उघड केली. विशाखापट्टणम येथील नौदल विभागात कार्यरत असलेल्या १८ जणांवर संशय असून त्यापैकी १३ कर्मचारी नौदलातील आहेत. आर्थिक आमिषे, हनी ट्रॅपचा वापर करून या कर्मचाऱ्यांकडून संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला. भारतातील संरक्षण आस्थापने, मोक्याची ठिकाणे आणि नौदलाची मालमत्ता यांबाबत संवेदनशील किंवा गोपनीय माहिती मिळवण्याच्या उद्देशाने, पाकिस्तानच्या काही महिला गुप्तचर एजंट भारतीय संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. ‘ऑपरेशन फायरवॉल-२०२६’अंतर्गत, काउंटर इंटेलिजन्स विभागाने विशाखापट्टणम नौदल तळावरील कर्मचारी प्रदीप मुखर्जी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी चालक म्हणून काम करणारा अन्नाम साई वरप्रसाद या दोघांना अटक केली. नौदल आणि संरक्षण आस्थापनांशी संबंधित माहिती उघड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

‘ऑपरेशन फायरवॉल-२०२६’ काय आहे?

‘ऑपरेशन फायरवॉल-२०२६’ या सांकेतिक नावाने राबवण्यात आलेल्या मोहिमेचे लक्ष्य देशाविरोधात हेरगिरी करणाऱ्या कथित गटाला (मॉड्युलला) पकडणे हे आहे. या गटात नौदलाच्या १३ कर्मचाऱ्यांसह एकूण १८ संशयितांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, दिल्ली, तामिळनाडू, छत्तीसगड आणि बिहार यांसारख्या दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘काउंटर इंटेलिजन्स’ची (प्रति-गुप्तचर) १२ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी विविध राज्यांची दहशतवादविरोधी पथके, नौदलाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांच्याशी समन्वय साधून ही कामगिरी केली. या मोहिमेदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी सर्व १८ संशयितांच्या कथित सहभागाची पडताळणी केली आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली.

‘हनी ट्रॅप’ काय असतो?

‘हनी ट्रॅप’ म्हणजे एखाद्या व्यक्तीला (विशेषतः लष्करी अधिकारी, राजकीय नेते किंवा सरकारी कर्मचारी) प्रेमाच्या किंवा आकर्षणाच्या जाळ्यात ओढून, त्याच्याकडून देशाची वा महत्त्वाची गोपनीय माहिती मिळवणे किंवा त्यांना ब्लॅकमेल करणे. समाजमाध्यमे (फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप) किंवा प्रत्यक्ष संपर्कातून सुंदर महिला किंवा बनावट प्रोफाइलचा वापर करून लक्ष्य केलेल्या व्यक्तीशी जवळीक साधली जाते. जवळीक वाढल्यानंतर खाजगी संभाषणे, अश्लील फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. त्याद्वारे पैशांची मागणी किंवा गोपनीय लष्करी/ राजकीय माहितीची मागणी केली जाते.

कार्यपद्धती कशी असते?

पाकिस्तानी गुप्तहेर महिला सुरुवातीला फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमातून बनावट समाजमाध्यम प्रोफाइलद्वारे भारतीय संरक्षण दलातील जवानांशी संपर्क साधतात. विश्वास संपादन केल्यावर, या पाक गुप्तहेर महिला व्हॅाट्सअॅप या इन्स्टंट मेसेजिंग ॲपद्वारे संवाद साधनात सुरुवात करतात. मग चॅट्स, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्सद्वारे संपर्क साधला जातो. त्यानंतर जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करता. जहाजे व पाणबुड्यांची सद्यस्थिती, त्यांचे क्रमांक, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर वर्गीकृत माहितीसह संवेदनशील संरक्षण माहिती देण्यास प्रवृत्त करतात.

पाकिस्तानी एजंटने कसे काम केले?

जोशिता पाल नावाच्या एका पाक महिला एजंटने सुरुवातीला फेसबुकद्वारे संपर्क साधला आणि नंतर संवाद व्हॉट्सॲपवर वळवला. तिने स्वतःची ओळख मुंबईतील एका जहाजबांधणी कंपनीची कर्मचारी म्हणून करून दिली. जहाजे व पाणबुड्यांची सद्यस्थिती व संख्या, तसेच त्यांच्या कमांडिंग ऑफिसरचे फोटो आणि तपशील मागितले. याशिवाय, अशी माहिती देण्यासाठी तिने पैशांचे आमिषही दाखवले. त्याचप्रमाणे, ‘अन्वी मेहता’ नावाच्या दुसऱ्या एजंटने स्वतःची ओळख दिल्लीस्थित मानसशास्त्रज्ञ म्हणून करून दिली. व्हॉइस व व्हिडिओ कॉलद्वारे नौदल कर्मचाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तिने नौदलाच्या जहाजांचे आणि संवेदनशील ठिकाणांचे फोटो मागितले आणि व्हिडिओ कॉलदरम्यान नौदल आस्थापना, जहाजे व पाणबुड्यांची संवेदनशील ठिकाणे दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला.

कसे अडकतात?

या पाक महिला गुप्तहेर भारतीय कर्मचाऱ्यांना त्यांचे व्हॉट्सॲप ओटीपी (वन टाईम पासवर्ड) शेअर करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि त्यासाठी क्रिप्टोकरन्सी किंवा इतर मध्यस्थांमार्फत आर्थिक मोबदला देतात. अशा प्रकारे मिळवलेले ओटीपी नंतर पाकिस्तानात व्हॉट्सॲप खाती सक्रिय करण्यासाठी वापरले जातात. या खात्यांचा वापर कथितरीत्या ‘हनी ट्रॅप’साठी आणि संरक्षणाविषयक संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. लक्ष्य बनवलेल्या व्यक्तीला जाळ्यात ओढल्यानंतर, पाकिस्तानातून क्रिप्टोकरन्सी वा इतर मध्यस्थांद्वारे आर्थिक मोबदला दिला जातो. भारतीय मोबाइल नंबर ओटीपी शेअरिंग नेटवर्क हे भारतात भारतीय नावांवर मिळवलेली सिम कार्ड्स पाक एजंटना पुरवते आणि ओटीपी शेअर करते. त्यानंतर या सिम कार्ड्सचा वापर करून भारतीय संरक्षण कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधतात; हे लोक पैसे आणि अश्लील प्रस्तावांच्या बदल्यात संवेदनशील माहिती उघड करण्यास तयार होतात. व्यापाऱ्यांमार्फत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींपर्यंत पैसे पोहोचवले जातात.

उघडकीस आलेली काही प्रकरणे

ऑगस्ट २०२६मध्ये अर्पिता सरकार नावाच्या महिलेला पश्चिम बंगालच्या विशेष कृती दलाने नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती गोळा करण्याचा कट उधळून लावल्याप्रकरणी अटक केली. याच महिन्यात पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅपला बळी पडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडरला दिल्ली पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. हनी ट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने माझगाव गोदीतील एका ३१ वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला शासकीय गुपीत कायद्यांतर्गत अटक केली होती. पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ डॅा. कुरुलकर याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. पाक एजंट झारा दासगुप्ता हिला संवेदनशील माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

भारतीय यंत्रणांसाठी डोकेदुखीच

‘हनी ट्रॅप’च्या प्रकरणात सोशल माध्यमामुळे वाढ झाली आहे, असे संरक्षण दलाने केलेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या हेरगिरीमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठीच संरक्षण दलाने प्रति गुप्तचर ही विशेष यंत्रणा आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी कार्यान्वित केली आहे. परंतु तरीही हनी ट्रॅपला बळी पडणारे अधिकारी-कर्मचारी ही भारतीय यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ही रोखण्यासाठी आता संरक्षण दलाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरू केला आहे. याशिवाय भारतीय लष्कराने संवेदनशील माहितीचे संरक्षण तसेच हनी ट्रॅप सारखी हेरगिरी रोखण्यासाठी एमशील्ड २.० ॲप सुरू केले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेले हे ॲप संशयास्पद हालचाली, संपर्क आणि ॲप्सवर लक्ष ठेवते आणि अधिकाऱ्यांना सतर्क करते.

nishant.sarvankar@expressindia.com