‘ऑपरेशन सफेद सागर’ या १९९९ च्या कारगिल युद्धावर आधारित नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये भारतीय वायुदलाच्या (IAF) एका महत्त्वाच्या मोहिमेचा उल्लेख करण्यात आला आहे. या युद्धात भारतीय वायुदलाच्या क्रमांक १७ ‘गोल्डन अ‍ॅरोज’ स्क्वाड्रनने केलेल्या फोटो रेकनिसन्स (Photo Recce) मिशन्सचा थरार यात दाखवण्यात आला आहे.

या स्क्वाड्रनकडे त्या वेळी मिग-२१ लढाऊ विमाने होती. या विमानांच्या माध्यमातून अनेक फोटो-रेकी मोहिमा करण्यात आल्या. भारतीय वायुदलाच्या इतर लढाऊ स्क्वाड्रननेही अशा मोहिमा केल्या. या मोहिमांमधून नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने नेमका किती भाग व्यापला आहे, त्यांची ठिकाणे कुठे आहेत याची माहिती मिळवण्यात लढाऊ स्क्वाड्रनला मदत झाली.

फोटो रेकनिसन्स मोहीम म्हणजे काय?

फोटो रेकनिसन्स मोहीम म्हणजे एखाद्या भागाची, ठिकाणाची किंवा शत्रूच्या हालचालींची छायाचित्रे आणि दृश्य माहिती मिळवण्यासाठी फायटर विमानाचा वापर करणे. शत्रूवर हल्ला करणे हा या मिशनचा उद्देश नसतो, तर मिळालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुप्तचर माहिती गोळा करणे हा असतो.

हवाई हल्ला (Strike Mission) आणि हवाई संरक्षण मोहिमेपेक्षा (Air Defence Mission) फोटो रेकनिसन्स मिशन पूर्णत: वेगळे असते. हवाई हल्ल्यात ठराविक लक्ष्य नष्ट करण्याचा उद्देश असतो, तर हवाई संरक्षण मोहिमेत शत्रूचे विमान किंवा लक्ष्य शोधून त्याच्यावर कारवाई केली जाते. याउलट, फोटो रेकनन्स मोहिमेवर गेलेले विमान शत्रूच्या ठिकाणांजवळ किंवा गरजेनुसार त्या भागात जाऊन छायाचित्रे घेते आणि त्यानंतर परत येते.

म्हणजेच, फोटो रेकनिसन्स मिशनचे मुख्य काम लढणे नाही, तर शत्रूच्या ठिकाणांची माहिती मिळवणे आहे.

फोटो रेकनिसन्स मिशनचा उपयोग कशासाठी होतो?

शत्रूची ठिकाणे आणि हालचाली समजून घेण्यासाठी फोटो रेकनिसन्स मिशनचा उपयोग केला जातो. शत्रूच्या तळांची ठिकाणे शोधणे, भविष्यातील हवाई हल्ल्यांसाठी लक्ष्य निश्चित करणे, हल्ल्यानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे आणि शत्रूंची लष्करी तैनात आणि त्यांची संरक्षण व्यवस्था यावर लक्ष ठेवणे यासाठी मिशनचा उपयोग केला जातो.

वादग्रस्त भूभाग आणि मार्गांच्याभोवती टेहाळणी करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. विशेषतः संघर्ष सुरू असलेल्या भागात कोणता मार्ग सुरक्षित आहे, लक्ष्य नेमके कुठे आहे आणि युद्धभूमीवरील परिस्थितीत काय बदल झाले आहेत हे समजण्यासाठी ही छायाचित्रे उपयोगी ठरतात. या मोहिमेच्या आधारे एखाद्या हवाई मोहिमेनंतर झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करणेही सोपे होते. याशिवाय, अपघातग्रस्त किंवा कोसळलेल्या विमानाचे अवशेषदेखील फोटो रेकनन्स मिशन राबवून शोधले जातात.

कोणती विमाने आणि स्क्वाड्रन फोटो रेकनिसन्सची भूमिका बजावतात?

भारतीय वायुदलात काही विमानांचा वापर फोटो-रेकीसाठी विशेष स्वरूपात करण्यात आला आहे. यामध्ये पूर्वी कॅनबेरा PR.५७/६७ आणि मिग-२५ आर या विमानांच्या स्क्वाड्रनचा समावेश होता. याशिवाय जॅग्वार, मिग-२१, मिग-२७, मिराज-२००० आणि सध्या सुखोई-३० या विमानांनाही वेगवेगळ्या मोहिमांमध्ये फोटो रेकनिसन्सची जबाबदारी देण्यात आली आहे.

उदाहरणार्थ, ऑपरेशन सेफ्ड सागरमध्ये दाखवलेली क्रमांक १७ ‘गोल्डन अ‍ॅरोज’ स्क्वाड्रन कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या काळात फोटो रेकनिसन्स मिशनवर होती. त्यानंतर या स्क्वाड्रनला बॉम्बहल्ल्याची जबाबदारीही देण्यात आली. त्याचप्रमाणे कारगिल युद्धानंतर झालेल्या ऑपरेशन पराक्रमदरम्यान क्रमांक १४ स्क्वाड्रनने फोटो रेकनिसन्स मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

आज मिग-२१ ची सर्व स्क्वाड्रन टप्प्याटप्प्याने सेवेतून बाहेर पडल्यामुळे, जॅग्वार आणि सुखोई-३० ही विमाने फोटो रेकनन्सची भूमिका बजावत आहेत. मात्र, फोटो-रेकी करणे हे या विमानांचे एकमेव काम नाही; त्यांच्याकडे इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात.

फायटर विमानांच्या फोटो रेकनिन्समध्ये काय बदल झाला?

पूर्वी फोटो रेकनिसन्स मिशनसाठी फिल्म असलेले पारंपरिक कॅमेरे वापरले जात होते. विमानातून घेतलेली छायाचित्रे नंतर हाय रिसोल्युशन छायाचित्रांमध्ये विकसित करून त्यांची तपासणी केली जात असे. या छायाचित्रांच्या आधारे पुढील लष्करी कारवाईचे नियोजन केले जात असे.

कारगिल युद्धाच्या काळात मिग-२१ विमानांमधून ‘विंटेन ७५१’ कॅमेऱ्याचा वापर करून टॅक्टिकल फोटो रेकनन्स मिशन्स राबवण्यात आले. या कॅमेऱ्याची फोकल लेंथ केवळ तीन इंच होती, त्यामुळे त्यातून तुलनेने मोठा भाग एका वेळी छायाचित्रात टिपता येत होता आणि विमानाला कमी उंचीवरूनही छायाचित्रे घेणे शक्य होत होते. त्या वेळी क्रमांक १७ ‘गोल्डन अ‍ॅरोज’ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर असलेले एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ (निवृत्त) यांनी या कॅमेऱ्याचे वर्णन ‘रशियन इंधनाच्या टाकीत बसवलेला ब्रिटिश कॅमेरा’ असे केले होते.

क्रमांक १७ स्क्वाड्रनने प्रामुख्याने टॅक्टिकल फोटो रेकनिसन्स मिशन केले, तर भारतीय वायुदलाच्या इतर स्क्वाड्रनने स्ट्रॅटेजिक फोटो रेकनिसन्स मिशन्सची जबाबदारी पार पाडली.

ऑपरेशन पराक्रममध्ये फोटो रेकनिसन्स कसे केले जात होते?

ऑपरेशन पराक्रमच्या वेळी क्रमांक १४ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर एअर व्हाइस मार्शल सुनील नानोदकर (निवृत्त) यांनी सांगितले की, जॅग्वार विमानांमधून स्ट्रॅटेजिक फोटो-रेकीसाठी अनेक मोहिमा केल्या जात होत्या. अंबाला येथे असलेली क्रमांक १४ स्क्वाड्रन जॅग्वार विमानांनी सज्ज आहे.

नानोदकर यांनी सांगितले की, या मोहिमांमध्ये विमान भारतीय हद्दीतच राहून शत्रूच्या भागाची छायाचित्रे घेत असे. यासाठी लाँग-रेंज ऑब्लिक फोटोग्राफी (LOROP) तंत्राचा वापर केला जात होता. या तंत्रामुळे विमानाला शत्रूच्या हद्दीत सुमारे ७५ किलोमीटरपर्यंत आत असलेल्या मोठ्या लष्करी तैनातीची छायाचित्रे घेता येत होती. त्या काळात LOROP, Vicon pods आणि British Aerospace pod अशा विविध कॅमेऱ्यांचा आणि उपकरणांचा वापर केला जात होता.

फोटो रेकनिसन्स आता कसे बदलले?

नानोदकर यांनी पुढे नमूद केले की, गेल्या काही वर्षांत फोटो-रेकीसाठीची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. पूर्वी छायाचित्रे फिल्मवर टिपली जात होती, मात्र आता तसे केले जात नाही. त्याऐवजी मिळालेली दृश्य माहिती ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून थेट कमांडर्सपर्यंत पोहोचवली जाते, त्यासाठी रेकनन्स लाइट पॉड्स आणि लाइटनिंग टार्गेटिंग पॉड्सचा वापर केला जातो. यामुळे त्या त्या वेळी या छायाचित्रांचे विश्लेषण करून पुढील कारवाईचे नियोजन करता येते.

आज उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनेही जमिनीवरील परिस्थितीची रिअल-टाइम छायाचित्रे मिळू शकतात, त्यामुळे फायटर विमानांमधून फोटो रेकनिसन्स करण्याची गरज कमी झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

“तिन्ही माध्यमांतून जमिनीवरील परिस्थितीची रिअल-टाइम छायाचित्रे मिळू शकतात. मात्र, उपग्रह ठराविक वेळेनंतर त्या भागावरून जातात आणि युद्ध किंवा संघर्षाच्या परिस्थितीत ड्रोनही असुरक्षित ठरू शकतात. अशा वेळी फायटर विमानांना गरजेनुसार कोणत्याही वेळी वेगाने जाऊन छायाचित्रे घेता येतात,” असे नानोदकर यांनी स्पष्ट केले.