‘ऑपरेशन सफेद सागर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ द कारगील वॉर’ ही वेबमालिका सध्या नेटफ्लिक्स इंडियाच्या ‘टॉप १०’ यादीत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ७ ऑगस्ट रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या सहा भागांच्या वेबमालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या मालिकेत भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धाची संपूर्ण गाथा मांडण्यात आली आहे. १९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले होते. यादरम्यान वेबमालिकेतील काही नाट्यमय आणि थरारक प्रसंग पाहिल्यानंतर ‘प्रत्यक्ष वास्तवातही अगदी तसेच घडले होते का?’ असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
मुशर्रफ यांनी वाजपेयींना खरंच सॅल्यूट केला नव्हता?
‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेबमालिकेत पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याशी संबंधित एक महत्त्वाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. फेब्रुवारी १९९९ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुशर्रफ यांना भारतीय पंतप्रधानांना लष्करी सॅल्यूट करण्यास भाग पाडल्याचे मालिकेत दाखवण्यात आले. मात्र, मुशर्रफ यांनी सॅल्यूट करण्यास टाळाटाळ केली आणि वाजपेयी यांच्याशी थेट हस्तांदोलन केले. त्यांच्या या कृतीला लष्करी आणि राजनैतिक शिष्टाचाराचा भंग मानले गेले. ऐतिहासिक नोंदी पाहिल्यास वेबमालिकेतील हा प्रसंग प्रत्यक्षात घडल्याचे दिसून येते. वाजपेयी यांच्या अटारी-वाघा सीमेवरील स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभावर पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यामागे काश्मीरमधील भारतीय हद्दीत त्यांनी आधीच सुरू केलेली कारवाई हे कारण मानले जाते. मात्र, त्यावेळी पाकिस्तानने अधिकृतपणे या कारवाईचा इन्कार केला होता. भारताच्या हद्दीत घुसलेले सैनिक हे इंडियन मुजाहिदीन या फुटीरतावादी गटाचे सदस्य असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता.
काही वर्षांनी मुशर्रफ यांनाही आला ‘त्यांच्याच कृतीचा’ अनुभव
काही वर्षांनंतर मुशर्रफ यांनाही त्यांच्या कृतीचा अनुभव आला. भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ लागू करून नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून टाकले. त्यानंतर स्वतःकडे पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. २००१ मध्ये वाजपेयी यांनी मुशर्रफ यांना भारतातील आग्रा शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत समारंभात भारताच्या संरक्षण दलांच्या वतीने तत्कालीन एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस उपस्थित होते. त्यावेळी टिपणीस यांनीही मुशर्रफ यांना लष्करी सॅल्यूट न करता केवळ त्यांच्याशी हस्तांदोलन केले. अशा प्रकारे त्यांनी मुशर्रफ यांच्या चुकीच्या वागणुकीची परतफेड केली. २०१३ मध्ये द अमेरिकन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत टिपणीस यांनी मुशर्रफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “मुशर्रफ हे केवळ भारताशीच नाही, तर आपल्याच देशातील सरकार आणि सैन्याशी खोटे बोलले. काही वर्षांपूर्वी कारगिलमध्ये जेव्हा पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी झाली, तेव्हा त्यांनी ती पूर्णपणे नाकारली. इतकेच नाही तर युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यासही त्यांनी नकार दिला. एखाद्या सैनिकासाठी यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही. असा माणूस कोणत्याही थराला जाऊन खोटे बोलू शकतो,” असे टिपणीस म्हणाले होते.
मुशर्रफ यांनी शरीफ यांची खरंच दिशाभूल केली होती का?
‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेबमालिकेत मुशर्रफ यांनी कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची दिशाभूल केल्याचे दाखवण्यात आले. त्यांनी शरीफ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत त्यांच्याकडून भारताच्या हद्दीत पाकिस्तानी सैनिकांच्या घुसखोरीला मंजुरी मिळवून घेतल्याचे मालिकेत दिसून येते. मात्र, मुशर्रफ यांचे खरे हेतू समजल्यानंतर शरीफ यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने त्यांनी युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जाते. त्याबाबत लेखक नसीम झहरा यांच्या २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘From Kargil to the Coup: Events that Shook Pakistan’ या पुस्तकातही मुशर्रफ यांनी कारगिल युद्धादरम्यान सुरू असलेल्या मोठ्या लष्करी कारवाईबाबत शरीफ यांना अंधारात ठेवल्याचे नमूद करण्यात आले आहे. संदर्भानुसार, मुशर्रफ यांनी ही कारवाई थेट पाकिस्तानी लष्कराची घुसखोरी असल्याचे मान्य करण्याऐवजी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनच्या कारवायांना दिलेले प्रोत्साहन आहे, असा आभास निर्माण केला होता. त्यावेळी शरीफ यांना परिस्थितीचे खरे स्वरूप समजेपर्यंत बराच उशीर झाला होता. भारताने पाकिस्तानकडून मांडण्यात आलेल्या या कथनावर विश्वास ठेवण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती.
कारगिल युद्धाबाबत दी इंडियन एक्स्प्रेसच्या लेखात काय नमूद होते?
दरम्यान, २०२१ मधील दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखात याबाबत वेगळा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. ‘कारगिल: द हाइट्स ऑफ ब्रेव्हरी’ (२०१६) या पुस्तकाचे लेखक आझाद सिंग राठोड यांच्या मते, मुशर्रफ यांच्या हेतूंबाबत आणि कारगिलच्या योजनेबाबत आपल्याला पूर्णपणे माहिती नव्हती, असा दावा शरीफ यांनी वारंवार केलेला होता. मात्र, उपलब्ध माहितीवरून असे दिसते की, पाकिस्तानी पंतप्रधानांना या योजनेची काही प्रमाणात कल्पना होती; पण उद्भवणाऱ्या भयानक परिणामांची त्यांना जाणीव नव्हती. त्यामुळे अधिक महत्त्वाचा प्रश्न असा ठरतो की, शरीफ यांनी या योजनेला मंजुरी का दिली? लेखक राठोड यांच्या मते, त्यावेळी नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्याच्या ताकदीबाबत शरीफ यांना चुकीची माहिती दिली गेली असावी. आपल्या सैन्याला कारगिल आणि नंतर सियाचीनवर ताबा मिळवता येईल, असा विश्वास शरीफ यांना वाटत होता. मात्र, कारगिलमधील लष्करी कारवाई पाकिस्तानसाठी १९७१ च्या युद्धानंतरची सर्वात मोठी चूक ठरली होती.
पाकिस्तानने आपल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यास दिला होता नकार
‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. कारगिल युद्धानंतर पाकिस्तानने आपल्या सैनिकांचे मृतदेह परत घेण्यास साफ नकार दिला होता. ‘आमच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी केलीच नाही’ असा त्यांचा दावा होता. मात्र, भारताच्या ताब्यात आलेल्या एका पाकिस्तानी सैनिकाच्या कबुलीजबाबामुळे या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याशिवाय, घुसखोरांकडून मिळालेली पाकिस्तानी लष्कराची ओळखपत्रेही पुरावा म्हणून सादर करण्यात आली. त्यात युद्धात सहभागी झालेले लोक केवळ दहशतवादी किंवा फुटीरतावादी नसून पाकिस्तानी लष्कराचे सैनिक असल्याचे स्पष्ट झाले होते. “पाकिस्तानने शेवटपर्यंत आपल्या देशातील सैनिकांचे मृतदेह स्वीकारलेच नाहीत. त्यानंतर परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या पुस्तकात सुमारे ३५० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले. काही दिवसांनी नवाज शरीफ यांनीही पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली होती,” असे आझाद सिंह राठोड यांनी लेखात नमूद केले होते. पाकिस्तानच्या या कृतीनंतर भारतीय सैन्यदलाने लष्करी प्रोटोकॉलचे पालन करत युद्धात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या मृतदेहांवर इस्लामी धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार केले होते.
पाकिस्तानकडून अखेर ४५३ सैनिकांच्या मृत्यूची अधिकृत कबुली
कारगिल युद्धाच्या बर्याच वर्षांनंतर पाकिस्तानने अधिकृतपणे मान्य केले की, या युद्धादरम्यान त्यांचे ४५३ सैनिक मारले गेले होते. मात्र, भारतातील काही वृत्तमाध्यमांनी यापेक्षा कितीतरी अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. २०१० मध्ये ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखात कारगिल युद्धात चार हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता; पण पाकिस्तानने हा आकडा कधीही अधिकृतपणे मान्य केला नाही. कारगिलमध्ये घुसखोरी करण्यास पाकिस्तानी लष्कराला अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती, या आपल्या भूमिकेवर पाकिस्तान ठाम राहिला. त्यामुळे या युद्धातील पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा नेमका आकडा आजही वादाचा विषय आहे. पाकिस्तानने अधिकृतपणे ४५३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली असली, तरी भारतीय लष्कराने सांगितलेला मृतांचा आकडा त्यापेक्षा अनेक पटीने अधिक आहे.
