Strategic deep-dive into Operation Sindoor and why conventional military victory is no longer useful in modern conflicts: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण होत असताना, या कारवाईचे महत्त्व केवळ लष्करी यशापुरते मर्यादित नाही. भारताने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ‘आक्रमकता आणि संयम’ यांचा जो मेळ घातला, तो भविष्यातील ‘मल्टी-डोमेन’ युद्धांसाठी एक नवा आदर्श ठरला आहे.
मर्यादित पण प्रभावी
ऑपरेशन सिंदूरला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे तात्कालिक भावनिक आणि राजकीय प्रतिक्रियांपलीकडे जाऊन या कारवाईचे व्यापक सामरिक महत्त्व समजून घेण्याची ही योग्य वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ दहशतवादी चिथावणीला दिलेली यशस्वी प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई नव्हती; तर अण्वस्त्रसज्ज असलेल्या भारतासारख्या देशाने ‘मर्यादित पण प्रभावी’ पद्धतीने केलेला तो अत्याधुनिक शक्तिप्रयोगच होता. विशेष म्हणजे, हे करताना भारताने संघर्षाचे नियंत्रण स्वतःकडे राखले आणि परिस्थिती अनियंत्रित युद्धाच्या दिशेने जाऊ दिली नाही.
संघर्ष व्यवस्थापनाचा नवा नमुना
अपारंपरिक संघर्ष, बहुआयामी युद्धपद्धती आणि आधुनिक सामरिक वास्तव यांचा विचार करता ‘ऑपरेशन सिंदूर’ भविष्यातील संघर्ष व्यवस्थापनाचा एक नवा उत्तम नमुना ठरू शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने अतिशय शिस्तबद्ध आणि नियंत्रित पद्धतीने आपल्या शस्त्रास्त्रांचा वापर केला. भारताकडे व्यापक पारंपरिक युद्ध करण्याची क्षमता होती, तसेच त्यासाठीचे निमित्तही होते. परंतु, त्या सापळ्यात अडकणे भारताने यशश्वीरित्या टाळले. आणि ‘आक्रमकता आणि संयम’ यांचा संतुलित मिलाफ असलेले धोरण अवलंबले. अचूक आणि मर्यादित हल्ला हे त्याचे वैशिष्ट्य होते. आणि अशा प्रकारच्या हल्ल्यासाठी जी राजकीय स्पष्टता लागते, तीही भारताने दाखवली.

लष्करी परिपक्वतेचे दर्शन
भारताने या ऑपरेशन दरम्यान दाखवलेला संयम हा भीतीतून किंवा संकोचातून आलेला नव्हता; तर तो आत्मविश्वासातून आलेला होता, हे महत्त्वाचे. संघर्ष वाढविण्याची भारताची पूर्ण क्षमता आहे, पण संयम राखत किमान तेव्हा तरी तसे करणे टाळले, असे भारताने आपल्या कृतीतून स्पष्ट केले. या संपूर्ण कारवाईचा केंद्रबिंदू भूभाग जिंकणे किंवा विस्तारवाद नव्हता, तर दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्या शक्तींना ठोस प्रत्युत्तर देणे हा होता. भारताने आपली रणनीती अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती, त्यातून लष्करी परिपक्वताच दिसून येते.
पाकिस्तानची कोंडी
पाकिस्तानसाठी ही परिस्थिती मोठी कोंडी निर्माण करणारी ठरली. कारण पाकिस्तानची सामरिक मानसिकता अजूनही टोकांच्या असलेल्या दोन प्रतिसादांभोवतीच फिरते. एकतर पारंपरिक युद्ध वाढवणे किंवा असे काही घडलेच नाही, असे सांगत पूर्णपणे एखादी गोष्ट नाकारण्याचा प्रयत्न करणे. पण ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला अशा ‘ग्रे झोन’मध्ये आणून उभे केले, जिथे या दोन्ही पर्यायांचा उपयोग नव्हता. भारताच्या मर्यादित पण बहुआयामी कारवाईला उत्तर देताना पाकिस्तानची लष्करी प्रतिक्रिया विस्कळीत आणि कमकुवत होती.

गोबेल्सनीति टिकू शकली नाही
ही कमतरता भरून काढण्यासाठी पाकिस्तानने माहिती युद्धाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिरंजित दावे आणि गोबेल्सनीति वास्तवाच्या कसोटीवर टिकू शकली नाही. उलट त्यामुळे पाकिस्तानचीच विश्वासार्हताच कमी झाली. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानकडून वारंवार देण्यात येणाऱ्या अण्वस्त्र वापराच्या धमक्याही प्रभावहीन ठरल्या. अण्वस्त्रांच्या धाकाचा अतिवापर झाल्यास त्याची धार बोथट होते, हेच या कारवाई दरम्यान स्पष्ट झाले.
अण्वस्त्रसज्ज देशांमध्येही मर्यादित युद्ध शक्य?
याउलट भारताने संघर्षाचे नियंत्रण राखण्यात यश मिळवले. कोणतेही उघड युद्धाच्या धमक्या न देता भारताने युद्धसज्जता राखली होती. या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले की अण्वस्त्रसज्ज देशांमध्येही मर्यादित युद्ध शक्य आहे आणि राजकीय इच्छाशक्ती, सक्षम लष्करी क्षमता आणि प्रभावी संवाद यांची सांगड घातल्यास ते परिणामकारकही ठरू शकते. दक्षिण आशियाई सामरिक चर्चांमध्ये दीर्घकाळ चर्चिला गेलेला ‘स्थैर्य-अस्थैर्य विरोधाभास’ (Stability-Instability Paradox) ऑपरेशन सिंदूरमधून प्रत्यक्ष स्वरूपात समोर आला.
एकात्मिक लष्करी कारवाई
या कारवाईच्या अंमलबजावणीची पद्धतही तितकीच महत्त्वाची होती. गेल्या काही वर्षांत भारतीय सशस्त्र दलांनी बहुआयामी युद्धपद्धती आत्मसात करताना आपली पारंपरिक ताकद अबाधित राखली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये दिसलेला तो लष्कराच्या विविध दलांमधील केवळ समन्वय नव्हता; तर खऱ्या अर्थाने एकात्मिक लष्करी कारवाई होती. सायबर क्षमता, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र, गुप्तचर यंत्रणा, टेहळणी यंत्रणा आणि अचूक प्रहार यांची ही एकात्मिक लष्करी कारवाई होती.
अधिक गतिमान, चपळ आणि जलद
पाकिस्तानच्या हल्ल्यांना दिलेले चोख प्रत्युत्तर हे भारतीय लष्कर आता अधिक गतिमान, चपळ आणि जलद प्रतिसाद देणारे आहे, हेच सिद्ध केले. या संपूर्ण प्रक्रियेत नागरी आणि लष्करी यंत्रणांमधील सुसंवादही विशेषत्वाने जाणवला. राजनैतिक पातळीवरील सक्रिय संवादामुळे भारताची कारवाई आंतरराष्ट्रीय समुदायाला संतुलित आणि आवश्यक वाटली. आर्थिक स्थैर्य अबाधित राहिले; बाजारपेठा आणि सामान्य जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही.
भारताच्या उणिवाही समोर आल्या
माहिती आणि कथानक नियंत्रणाच्या बाबतीतही भारताची भूमिका पूर्वीच्या तुलनेत अधिक सुसंगत होती. अर्थात, या कारवाईत काही उणिवाही समोर आल्या. विशेषतः जलद, संस्थात्मक संवादव्यवस्था उभारण्याची गरज आणि विविध यंत्रणांमधील समन्वय हा व्यक्तींवर अवलंबून न राहता एखाद्या व्यवस्थेच्या स्वरूपात विकसित करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली.
काश्मीरमधील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न
ऑपरेशन सिंदूरपूर्वी झालेला पहलगाम हल्ला हा केवळ दहशतवादी हल्ला नव्हता; तर त्यामागे काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न होता. आर्थिक पुनरुज्जीवन, पर्यटनातील वाढ आणि स्थानिक तरुणांचा दहशतवादी होण्याकडे कमी झालेला ओढा या कथानकाला धक्का देणे हा त्यामागचा उद्देश होता. तसेच काश्मीरच्या प्रश्नात पाकिस्तान अजूनही ‘महत्त्वाची शक्ती’ आहे, हेही दाखवण्याचाही प्रयत्न त्यात होता.
आता धोका छुप्या स्वरूपात
मात्र एक वर्षानंतर पाहिले, तर हा उद्देश मोठ्या प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसते. स्थानिक पातळीवरील दहशतवादी भरती अजूनही मर्यादित आहे. काश्मीर खोऱ्यातील आर्थिक गती कायम आहे. गुंतवणूक, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी यांमुळे भारतीय समाजाशी वाढलेला संपर्क स्थैर्य निर्माण करण्यात महत्त्वाचा ठरला आहे. कोविडपूर्व काळातील भीषण दहशतवादाचे दिवस पुन्हा येण्याची शक्यता सध्या तरी कमी वाटते. अर्थात याच भ्रमात राहणे मात्र योग्य ठरणार नाही. कारण धोका छुप्या स्वरूपात समोर येत आहे.
तंत्रज्ञानांमुळे विघातक कारवाया अधिक सोप्या
स्थानिक पातळीवरील दहशतवादी मनुष्यबळ कमी झाले असले, तरी सीमेपलीकडून मनुष्यबळ पाठवण्याची पाकिस्तानची क्षमता कायम आहे. त्यातच नव्या तंत्रज्ञानांमुळे विघातक कारवाया करणे अधिक सोपे आणि स्वस्त झाले आहे. (खास करून ड्रोन हल्ल्यांमुळे- ज्याचा प्रत्यय या ऑपरेशनच्या काळात आला.) दहशतवादी अर्थपुरवठ्याचे मार्गही बदलत आहेत. पारंपरिक मार्गांऐवजी डिजिटल आणि क्रिप्टोआधारित माध्यमांचा वापर वाढतो आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीत या नव्या मार्गांचा वापर करून पुन्हा ‘छुपे नेटवर्क’ उभे केले जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि इतर सुरक्षायंत्रणांसाठी सातत्यपूर्ण टेहळणी, तांत्रिक कौशल्य वाढवणे आणि नव्या पद्धतींशी जुळवून घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.
आता युद्धे पूर्वीसारखी होणार नाहीत
ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे भविष्यातील युद्धे भूतकाळातील युद्धांसारखी असणार नाहीत. ती कमी कालावधीची, अधिक तीव्र आणि अनेक पातळ्यांवर एकाच वेळी लढली जाणारी असतील. युद्ध आणि शांतता यांच्यातील सीमारेषा अधिक धूसर होत जाणार आहेत. भविष्यात शहरे, डिजिटल पायाभूत सुविधा, माहिती व्यवस्था आणि समाजातील मानसिक स्थैर्य ही पारंपरिक रणांगणाइतकीच महत्त्वाची ठरणार आहेत.
आता लष्करी विजय पुरेसा नाही
अशा परिस्थितीत केवळ लष्करी विजय पुरेसा ठरणार नाही. धक्के सहन करण्याची क्षमता, सामान्य जनजीवन सुरळीत ठेवण्याची ताकद आणि माहिती-नियंत्रणाचे कौशल्य हेही तितकेच निर्णायक ठरेल. भारतासाठी आता खरे आव्हान ‘सातत्य’ राखण्याचे आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवा मापदंड निर्माण केला आहे; पण त्यातील धडे संस्थात्मक स्वरूपात रुजवले गेले पाहिजेत. तिन्ही सैन्यदलांतील संयुक्त कार्यपद्धती अधिक मजबूत करावी लागेल. नवे तंत्रज्ञान सातत्याने आत्मसात करावे लागेल. निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि सुसंगत करावी लागेल.
जगाला संदेश देण्याची क्षमता
ऑपरेशन सिंदूरचा खरा धडा हा केवळ त्याने काय साध्य केले यात नाही, तर त्याने भारताच्या सामरिक क्षमतेबद्दल काय उघड केले यात आहे. या कारवाईने दाखवून दिले की, सारे काही नियंत्रणात ठेवून भारत अचूक आणि प्रभावी कारवाई करू शकतो. संघर्षाला अनियंत्रित युद्धाचे स्वरूप न देता भारत फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर जगालाही संदेश देण्याची क्षमता राखतो.
