बहुक्षेत्रीय क्षमता सिद्ध

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हवाई दलाने पाकिस्तानमध्ये खोलवर मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, हे केवळ लष्करी कारवाईचे यश नव्हते, तर तो एक सामरिक संदेश होता. गुप्तचर यंत्रणांचे यश, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संरक्षण दलांमधील उत्तम समन्वय त्या वेळी दिसला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराबरोबर झालेल्या विविध मुद्द्यांवरील चर्चेनंतर संरक्षण साहित्याच्या कमतरतेवर तोडगा काढण्यावर भर दिला गेला. त्यासाठी स्थानिक तसेच जागतिक पातळीवर पर्याय शोधण्यात आले. साहित्याच्या खरेदीला तातडीने मंजुरी देण्यात आली. मानवरहित यंत्रणा, लॉइटर म्यूनिशन्स, हवाई संरक्षण, इलेक्ट्रॉनिक युद्धपद्धतीमधील क्षमता वाढविण्यात आल्या. या क्षेत्रांत स्वदेशी उद्योगांना चालना देण्यात आली. या क्षेत्रांतील नऊ जलदगती विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देण्यात आली.

नौदलाची तयारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमानवाहू नौकांसह आघाडीच्या नौका, पाणबुड्या अरबी समुद्राच्या उत्तरेकडे तैनात करण्यात आल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सागरी क्षेत्रात शत्रूला कुठलीही आगळीक करू देण्यात आली नाही. नौदलाच्या या आक्रमक स्वरुपातील उपस्थितीमुळे पाकिस्तानला १० मे २०२५ रोजी भारताकडे तातडीने शस्त्रसंधीची याचना करावी लागली. पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय नौदलाचे विशेष दल आणि अचूक मारा करणार्‍या शस्त्रांचाही समावेश होता. सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यात तटरक्षक दलाचाही मोठा वाटा होता.

हवाई दलाची भूमिका

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये हवाई दलाने मोठी भूमिका बजावली. पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई दलाने ६-७ मेच्या रात्री अचूक हल्ले केले. नूर खान, रहिम यार खान या हवाई तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानकडून ड्रोन आणि मानवरहित शस्त्रांचे हल्ले सुरू झाल्यानंतर भारताची हवाई हद्द सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही हवाई दलाने पार पाडली. स्वदेशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्रासह पेचोरा आणि इतर शस्त्रांसह हवाई सुरक्षेचे कवच प्रदान केले गेले. एकात्मिक हवाई कमांड आणि कंट्रोल यंत्रणा प्रस्थापित केली गेली. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमधील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करायला सुरुवात केल्यानंतर हवाई दलाच्या या एकात्मिक यंत्रणेने हे हल्ले निकामी केले. हवाई दलाच्या एस-४००, शौर्य या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानची विविध विमाने पाडली. पाकिस्तानवर हवाई वर्चस्व प्रस्थापित करता आले. पाकिस्तानच्या हवाई दलाला निष्प्रभ केले. पाकिस्तानने ८ ते १० मे दरम्यान लष्करी आस्थापनांसह भारताच्या नागरी भागांना, प्रार्थनास्थळांना, शाळांना, वैद्यकीय संस्थांना लक्ष्य करायला सुरुवात केली. भारताचे प्रत्युत्तर संयमी तसेच पाकिस्तानला जरब बसविणारे होते. भारत कुठल्याही प्रकारचे आक्रमण सहन करणार नसल्याचा स्पष्ट संदेश यातून दिला गेला. भारताच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची भाषा सुरू केली.

भारताने टिपलेली लक्ष्ये

पाकिस्तानचे सहा रडार, जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या दोन यंत्रणा भारताने नष्ट केल्या. १० मे रोजी लढाऊ विमाने ज्या ठिकाणी ठेवतात, ते चार हँगर्स, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (एईडब्लूअँडसी), मानवरहित विमाने लक्ष्य केली गेली. जकोबाबाद येथील अनेक एफ-१६ विमाने, एक एईडब्लूअँडसी विमान नष्ट करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलातील अनेक सैनिकांचा मृत्यूही झाल्याचे वृत्त आहे. सरगोधा आणि रहिम यार खान येथील धावपट्टींना लक्ष्य करून त्यांचे नुकसान करण्यात आले. जकोबाबाद येथील कूलिंग प्लांट आणि रहिम यार खान येथील टर्मिनलना लक्ष्य करण्यात आले. चकलाला आणि मुरिद येथील कमांड आणि कंट्रोल केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले.

हवाई सुरक्षा व्यवस्थेचे यशस्वी संचालन

हवाई दलाच्या एकात्मिक कमांड आणि कंट्रोल यंत्रणेद्वारे (आयएसीसीएस) हवाई संरक्षणात समन्वय ठेवला गेला. लष्करी आणि नागरी टेहळणी सेन्सर्स ‘आयएसीसीएस’ला जोडण्यात आले. हवाई सुरक्षेच्या स्थितीचा एकत्रित आढावा संबंधित अधिकार्‍यांसमोर उभा राहण्यात त्यामुळे यश आले. भारताच्या एस-४०० यंत्रणेने पाकिस्तानचे विशेष मोहिमेवर असणारे लढाऊ विमान पाडले. भारताने ३१४ किलोमीटर अंतरावरून मारा करून हे विमान पाडले. शत्रूच्या आगळिकीला दूर अंतरावरून पायबंद घालता येतो, हे भारताने यातून दाखवून दिले. या हवाई मोहिमांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट देऊन सर्व योद्ध्यांचे अभिनंदन केले. भारताच्या हवाई दलाच्या जवानांचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी २१९ राष्ट्रपतींची शौर्य पदके देऊन सन्मान करण्यात आला.