– डॉ. प्रसाद श. कुलकर्णी
देशाच्या इतिहासात ‘ऑपरेशन सिंदूर’ हा दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. अस्पर्श युद्धपद्धती, ड्रोन युद्ध आणि हवाई संरक्षण यंत्रणेचा त्यात कस लागला. संरक्षण मंत्रालयाच्या २०२५-२६ वार्षिक अहवालात याबाबत अधिक माहिती देण्यात आली. त्याचा घेतलेला हा आढावा…
बहुक्षेत्रीय क्षमता सिद्ध
भारताच्या इतिहासात ‘ऑपरेशन सिंदूर’ने बहुक्षेत्रीय क्षमता सिद्ध केली. हवाई दलाने पाकिस्तानमध्ये खोलवर मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ते केवळ लष्करी कारवाईचे यश नव्हते, तर सामरिक संदेश होता. सामरिक दूरदृष्टी होती आणि संरक्षण दलांनी अभूतपूर्व दाखविलेला संयम होता. गुप्तचर यंत्रणांचे यश, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संरक्षण दलांमधील उत्तम समन्वय त्या वेळी दिसला.
आवश्यक खरेदीला मंजुरी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. संरक्षण साहित्याच्या कमतरतेवर तोडगा काढण्यावर भर दिला गेला. स्थानिक आणि जागतिक पातळीवर त्यासाठी पर्याय शोधण्यात आले. साहित्याच्या खरेदीला तातडीने मंजुरी देण्यात आली. मानवरहित यंत्रणा, लॉइटर म्यूनिशन्स, हवाई संरक्षण, इलेक्ट्रॉनिक युद्धपद्धतीमधील क्षमता वाढविण्यात आल्या. या क्षेत्रांत स्वदेशी उद्योगांना चालना देण्यात आली. या क्षेत्रांतील नऊ जलदगती विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देण्यात आली.
नौदलाची तयारी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमानवाहू नौकांसह आघाडीच्या नौका, पाणबुड्या अरबी समुद्राच्या उत्तरेकडे तैनात करण्यात आल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सागरी क्षेत्रात शत्रूला कुठलीही आगळीक करू देण्यात आली नाही. नौदलाच्या समुद्रातील या आक्रमक स्वरुपातील उपस्थितीमुळे पाकिस्तानला १० मे २०२५ रोजी भारताकडे तातडीने शस्त्रसंधीची याचना करावी लागली. पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय नौदलाचे विशेष दल आणि अचूक मारा करणाऱ्या शस्त्रांचाही समावेश होता.
तटरक्षक दल
भारताच्या नौदलाबरोबरच तटरक्षक दलानेही पश्चिम किनाऱ्यावर टेहळणी मोठ्या प्रमाणावर वाढवली. सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यात तटरक्षक दलाचाही मोठा वाटा होता. सर क्रीक भागात तटरक्षक दलासह विविध सुरक्षा यंत्रणांनी या भागात मोठ्या प्रमाणावर गस्त घातली.
हवाई दलाची भूमिका
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये हवाई दलाने मोठी भूमिका बजावली. पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई दलाने ६-७ मेच्या रात्री अचूक हल्ले केले. नूर खान, रहिम यार खान हवाई तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानकडून ड्रोन आणि मानवरहित शस्त्रांचे हल्ले सुरू झाल्यानंतर भारताची हवाई हद्द सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही हवाई दलाने पार पाडली. स्वदेशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्रासह पेचोरा आणि इतर शस्त्रांसह हवाई सुरक्षेचे कवच प्रदान केले गेले. एकात्मिक हवाई कमांड आणि कंट्रोल यंत्रणा प्रस्थापित केली गेली. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमधील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करायला सुरुवात केल्यानंतर हवाई दलाच्या या एकात्मिक यंत्रणेने हे हल्ले निकामी केले.
पाकिस्तानची विमाने गारद
हवाई दलाच्या एस-४००, शौर्य या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानची विविध विमाने पाडली. पाकिस्तानवर हवाई वर्चस्व प्रस्थापित करता आले. पाकिस्तानच्या हवाई दलाला निष्प्रभ केले. पाकिस्तानने ८ ते १० मे दरम्यान लष्करी आस्थापनांसह भारताच्या नागरी भागांना, प्रार्थनास्थळांना, शाळांना, वैद्यकीय संस्थांना लक्ष्य करायला सुरुवात केली. भारताचे प्रत्युत्तर संयमी पणे पाकिस्तानला जरब बसविणारे होते. भारताच्या हवाई दलाच्या हल्ल्यात पाकिस्तानचे हवाई संरक्षण रडार, कमांड आणि कंट्रोल केंद्रे; चकलाला, रहिमयार खान, सुक्कूर, मुरिद, सरगोधा, जकोबाबाद, भोलारी यांसह विविध ठिकाणी असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या पायाभूत सुविधा निकामी करण्यात आल्या. भारत कुठल्याही प्रकारचे आक्रमण सहन करणार नसल्याचा स्पष्ट संदेश यातून दिला गेला. भारताच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची भाषा बोलण्यास सुरुवात केली.
भारताने कुठली लक्ष्ये टिपली?
पाकिस्तानची सहा रडार, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या दोन यंत्रणा भारताने नष्ट केल्या. १० मे रोजी लढाऊ विमाने ज्या ठिकाणी ठेवतात, ते चार हँगर्स, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (एईडब्लूअँडसी), मानवरहित विमाने लक्ष्य केली गेली. जकोबाबाद येथील अनेक एफ-१६ विमाने, एक एईडब्लूअँडसी विमान नष्ट करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलातील अनेक सैनिकांचा मृत्यूही झाल्याचे वृत्त आहे. सरगोधा आणि रहिम यार खान येथील धावपट्टींना लक्ष्य करून त्यांचे नुकसान करण्यात आले. जकोबाबाद येथील कूलिंग प्लांट आणि रहिम यार खान येथील टर्मिनलना लक्ष्य करण्यात आले. चकलाला आणि मुरिद येथील कमांड आणि कंट्रोल केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली. चकलाला येथे पाकिस्तानची हवाई संरक्षण कमांड होती.
हवाई सुरक्षा व्यवस्थेचे यशस्वी संचालन
देशाच्या हवाई सुरक्षेची जबाबदारी हवाई दलाने या काळात उत्तम पार पाडली. हवाई दलाच्या एकात्मिक कमांड आणि कंट्रोल यंत्रणेद्वारे (आयएसीसीएस) हवाई संरक्षणात समन्वय ठेवला गेला. चार दिवसांच्या या काळात या यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली. लष्करी आणि नागरी टेहळणी सेन्सर्स ‘आयएसीसीएस’ला जोडण्यात आले. हवाई सुरक्षेच्या स्थितीचा एकत्रित आढावा संबंधित अधिकाऱ्यांसमोर उभा राहिण्यात त्यामुळे यश आले. भारताच्या या कारवाईदरम्यान पाकिस्तानने जाणीवपूर्वक नागरी हवाई सेवा सुरू ठेवली होती. अधिकाधिक अडथळ्यांचा सामना भारताला करावा लागेल, हे त्यांचे उद्दिष्ट होते. पण, भारताने नागरी हानी होऊ न देता पाकिस्तानचा कावा निष्प्रभ केला.
एस-४०० यंत्रणेचे यश
भारताच्या एस-४०० यंत्रणेने पाकिस्तानचे विशेष मोहिमेवर असणारे लढाऊ विमान पाडले. भारताने ३१४ किलोमीटर अंतरावरून मारा करून हे विमान पाडले. दूर अंतरावरून शत्रू करीत असलेल्या आगळिकीला पायबंद घालता येतो, हे भारताने यातून दाखवून दिले. पाकिस्तानला जमिनीवरून अथवा हवेतून कुठलीही हालचाल करता येणार नाही, हे यातून सिद्ध झाले. या हवाई मोहिमांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट देऊन सर्व योद्ध्यांचे अभिनंदन केले. भारताच्या हवाई दलाच्या जवानांचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी २१९ राष्ट्रपतींची शौर्य पदके देऊन सन्मान करण्यात आला.
एनसीसीचे योगदान
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान ७२ हजारांहून अधिक राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विद्यार्थ्यांनी नागरी संरक्षणाच्या कामासह वेगवेगळी कर्तव्ये बजावली.
अचूक माहितीचे प्रसारण
जनसंपर्क कार्यालयाने तिन्ही संरक्षण दलांशी समन्वय ठेवून अचूक माहितीचे प्रसारण केले. तसेच, विविध माध्यमांतून येणाऱ्या चुकीच्या माहितीची ‘फॅक्ट चेक’द्वारे शहानिशा केली.
prasad.kulkarni@expressindia.com
