AI impact on IT jobs Oracle Stargate Project : अमेरिकेतील ओरॅकल या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने जगभरातील आपल्या शाखांमधून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. या नोकरकपातीचा मोठा फटका भारतीयांनाही बसल्याचे दिसून आले. भारतातील सुमारे ११,००० ते १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे ओरॅकलने सांगितले. हे प्रमाण कंपनीच्या भारतीय मनुष्यबळाच्या निम्म्याहून अधिक आहे. ओरॅकलने केलेली नोकरकपात कंपनीच्या जागतिक स्तरावरील पुनर्रचना प्रक्रियेचा एक भाग असल्याचे समोर आले आहे. त्याविषयीचा हा आढावा…

एआयमुळे लाखो नोकऱ्या धोक्यात?

ओरेकलने घेतलेला नोकरकपातीचा निर्णय हा केवळ एकट्या कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या अशीच प्रवृत्ती दिसून येत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांनी नोकरकपातीला सुरुवात केली असून एआय आधारित तंत्रज्ञानावर अधिकच लक्ष्य केंद्रित केले आहे. उद्योगातील अंदाजानुसार, यावर्षी विविध तंत्रज्ञान कंपन्यांनी हजारो नोकऱ्यांची कपात केली आहे. या कंपन्यांचे मुख्य उद्दिष्ट केवळ खर्च कमी करणे नसून, एआय आधारित भविष्यासाठी स्वतःला सज्ज करणे असा आहे. जागतिक कंपन्यांची मोठी तंत्रज्ञान विकास केंद्रे भारतात असल्याने अशा प्रकारच्या पुनर्रचना मोहिमांचा देशातील नोकरदारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

एआमुळे नोकरभरतीची स्वरूप बदलले

भारत हा जागतिक स्तरावर अभियांत्रिकी आणि सेवांचा प्रमुख केंद्र राहिला असला तरीही आता स्वयंचलित तंत्रज्ञानाकडे वाढणाऱ्या ओघामुळे नोकरभरतीचे स्वरूप बदलू लागले आहे. त्यातच नोकरकपातीमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी लागणारी प्रचंड भांडवली गुंतवणूक आणि सॉफ्टवेअर उद्योगाला आजवर बळ देणारे मनुष्यबळ यांच्यातील ताण समोर येत आहे. हा बदल आता जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राच्या पुढील टप्प्याची ओळख ठरत असून, उद्योगाच्या भविष्यातील दिशेला आकार देणारा ठरत आहे. ओरॅकलने भारतात केलेली नोकरकपात ही कंपनीच्या जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या कपातीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत जगभरातील सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : भारतासाठी धोक्याची घंटा? करोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक? आरोग्य तज्ज्ञांचा इशारा काय?

अचानक आले ईमेल आणि नोकरीचा शेवट

भारतात ओरेकलमध्ये काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्याही ३० हजारांच्या आसापास आहे. त्यामुळे या कपातीचा स्थानिक कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे. कंपनीने काही कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सेवा समाप्तीची सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. या ईमेलमध्ये संस्थात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून त्यांची पदे रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकच नोटिसा देण्यात आल्याचेही समोर आले आहे. बाधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या वर्षांनुसार पगाराचे पॅकेज, नोटीस कालावधीचा पगार आणि इतर लाभ दिले जात आहेत. ओरॅकलने अधिकृतरीत्या आकडा जाहीर केला नसला तरीही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात मानली जात आहे. येत्या काही आठवड्यांत कपातीची आणखी एक फेरी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक वरिष्ठ व्यवस्थापक मायकल शेफर्ड यांनी मंगळवारी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली. ओरेकलने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

ओरॅकलने कर्मचाऱ्यांची कपात का केली?

ओरॅकलने आपली पारंपारिक व्यावसायिक रचना बदलून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनी सध्या पारंपरिक सॉफ्टवेअर आणि अंतर्गत कामकाजाचे स्वरुप बदलून एआय आधारित डेटा सेंटर्स उभारण्यासह क्लाउड सेवा विस्तारण्यावर भर देत आहे. ॲमेझॉन आणि अल्फाबेट यांसारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ओरॅकलने आपल्या क्लाउड पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार सुरू केला आहे. यामध्ये नवीन डेटा सेंटर्स उभारणे आणि मोठ्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी व चालवण्यासाठी आवश्यक संगणकीय क्षमता वाढवणे यांचा समावेश आहे. या बदलातील सर्वात महत्त्वाचा भाग स्टारगेट हा एआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात एआय कामाचा भार पेलू शकेल अशी डेटा सेंटर्स विकसित करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपनीकडून काही वर्षांत शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

हेही वाचा : Inflation Alert : रुपया घसरला अन् तेलही महागलं; देशात महागाईचा प्रचंड भडका उडणार? अर्थतज्ज्ञांचा इशारा काय?

कर्मचाऱ्यांना सेवामुक्ती लाभ काय?

भारतातील ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत जवळपास एक वर्ष काम केले आहे, त्यांना प्रत्येकी १५ दिवसांचा पगार देण्याची तयारी ओरॅकलने दर्शवली आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तारखेपर्यंतचा एक महिन्याचा थकीत पगार, शिल्लक असलेल्या रजेचा पूर्ण मोबदला, पात्रतेनुसार ग्रॅच्युइटी आणि एक महिन्याच्या नोटीस कालावधीचा पगारही दिला जाणार आहे. ओरॅकलने कर्मचाऱ्यांना आणखी दोन महिन्यांचा पगार अतिरिक्त मोबदला (टॉप-अप) म्हणून देण्याचेही कबूल केले आहे. मात्र, स्वेच्छेने किंवा परस्पर सहमतीने राजीनामा देणारे कर्मचारीच सेवामुक्तीच्या लाभासाठी पात्र असतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.