भारतामध्ये तोंडाच्या कर्करोगाविरुद्धची पहिली अधिकृत मोहीम १९७५ साली राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायद्याअंतर्गत सिगारेट व धूम्रपानाच्या जाहिरातींवर दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली. २०२३ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अशाच प्रकारच्या तंबाखूविरोधी इशाऱ्यांची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, या सर्व उपाययोजनांनंतरही देशात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. या जीवघेण्या आजारामुळे दर तासाला जवळपास पाच जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तोंडाच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ४८,००० ते ५२,००० नागरिकांना आपले प्राण गमावावे लागत असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. नेमकी काय आहेत यामागची कारणे? त्याविषयीचा हा आढावा…

तोंडाच्या कर्करोगाची प्रमुख कारणे कोणती?

भारतातील पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये दरवर्षी १.२० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अलीकडील अभ्यासातून समोर आले. त्यापाठोपाठ चीन (१.१० टक्के), कॅनडा (०.९४ टक्के) आणि अमेरिकेत (०.५७ टक्के) देखील ही समस्या अधिकच गंभीर होत आहे. या अभ्यासात अर्जेंटिना, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि तुर्की यांसारख्या इतर जी-२० देशांतील आकडेवारीचाही समावेश करण्यात आला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हे संकट अधिक गंभीर होत असून त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बदलती जीवनशैली आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही याची मुख्य कारणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील वैद्यकीय ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. मिनीश जैन यांच्या मते, गुटखा, खैनी आणि पान यांसारख्या ‘धूररहित’ तंबाखूजन्य पदार्थांचा वाढता वापर हे कर्करोगाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. तंबाखूच्या सेवनासोबतच धूम्रपान आणि मद्यपान केल्यास कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. तोंडाची अस्वच्छता, तोंडात सतत होणारी जळजळ किंवा जखम आणि कुपोषण हेदेखील कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक आहेत. अनेकदा कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावला जातो, त्यामुळे आजार बळावल्यानंतर त्याचे निदान होते, ज्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येतात, असे डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.

तरुणांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण का वाढतेय?

तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण असून सुमारे ८० टक्के प्रकरणांसाठी ते जबाबदार आहे. विशेषतः ४० वर्षांवरील पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मात्र, अलीकडच्या काळात महिलांसह तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. केवळ तंबाखूच नव्हे, तर बदलती जीवनशैली आणि लैंगिक वर्तनामुळे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV-16) हा एक नवा मोठा धोका म्हणून समोर आला आहे. हा विषाणू लैंगिक संबंधांतून पसरतो आणि तंबाखूचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींमध्येही मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. दोन दशकांपूर्वी HPV मुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी होते, जे आता वेगाने वाढत आहे. मुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता ५० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकते आणि उपचारांचा खर्चही कमी होतो. विशेष म्हणजे, तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाच्या तुलनेत HPV मुळे होणाऱ्या कर्करोगावर उपचार करणे अधिक सोपे असते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर कडक बंदी घातल्यामुळे अनेकांनी तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात केली आहे. सिगारेटच्या तुलनेत गुटखा स्वस्त असला तरी त्यामुळे कर्करोगाचा धोका कित्येक पटीने वाढतो, असा इशाराही या अहवालातून देण्यात आला आहे.

तंबाखूचे व्यसन का सुटत नाही? तज्ज्ञ काय सांगतात?

तंबाखूचे व्यसन हे तोंडाच्या कर्करोगामागील सर्वात मोठे कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अनेकजण लहान वयातच तंबाखू सेवन सुरू करतात आणि नंतर हे व्यसन सोडणे कठीण होते, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. देशाच्या अनेक भागांत तंबाखू चघळणे ही एक सामान्य बाब मानली जाते. गुटखा आणि तंबाखूचे पदार्थ स्वस्त आणि सर्वत्र सहज मिळतात. कडक नियमांची कमतरता आणि दीर्घकालीन परिणामांची माहिती नसल्यामुळे लोक या व्यसनाच्या आहारी जातात. गुटख्यामध्ये सुपारी, तंबाखू आणि चुना यांचे घातक मिश्रण असते, जे तोंडाच्या आतील नाजूक त्वचेला सतत इजा पोहोचवते. तंबाखूच्या अतिसेवनामुळे तोंडात रासायनिक प्रक्रिया होऊन जखमा तयार होतात, ज्याचे रूपांतर पुढे कर्करोगाच्या गाठींमध्ये होते. तंबाखूसोबत मद्यपान केल्यास हा धोका अनेक पटींनी वाढतो, कारण अल्कोहोलमुळे तोंडातील पेशी कर्करोगजन्य घटकांना वेगाने शोषून घेतात. तंबाखूच्या सेवनामुळे केवळ कर्करोगच नव्हे, तर हिरड्यांचे आजार, तोंडातील दुर्गंधी, दात पडणे आणि जबडा कडक होणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. ई-सिगारेटमुळेही अशाच प्रकारच्या समस्या जाणवू शकतात, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

‘या’ सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

तोंडाचा कर्करोग लवकरच्या टप्प्यात ओळखल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते, मात्र सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित राहतात असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. मिनीश जैन यांच्या मते, दोन ते तीन आठवड्यांनंतरही न भरून येणाऱ्या तोंडातील जखमा हे कर्करोगाचे प्रमुख लक्षण असू शकते. याशिवाय तोंडात लाल किंवा पांढरे डाग दिसणे, गाल किंवा जिभेवर गाठ किंवा जाडपणा जाणवणे, सतत घसा दुखणे, आवाजात बदल होणे, अनपेक्षित रक्तस्त्राव किंवा सुन्नपणा जाणवणे हीदेखील कर्करोगाची लक्षणे असू शकतात. यापैकी कोणतीही समस्या दीर्घकाळ असल्यास त्वरित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. जैन यांनी केले. कर्करोगाचे लवकर निदान आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढते, उपचाराचा खर्च कमी होतो आणि जीवनमान सुधारते. कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात असेही ते म्हणाले.

कर्करोगाला आळा घालण्यासाठी उपाययोजना काय?

डॉ. जैन यांनी नमूद केले की, तोंडाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता आहे. स्थानिक भाषांमध्ये जनजागृती मोहिमा राबवणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूविरोधी कार्यक्रम आयोजित करणे, मोबाईल हेल्थ युनिट्सद्वारे ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये तोंडाच्या कर्करोग तपासणीचा समावेश करणे आणि तंबाखू नियंत्रणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे या उपाययोजना भारतातील वाढत्या तोंडाच्या कर्करोगाच्या समस्येला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. नियमित दंत तपासणी (डेंटल चेक-अप) ही कर्करोगाच्या लवकर निदानासाठी अत्यंत महत्त्वाची मानवी जाते, कारण दंतचिकित्सक तोंडातील असामान्य बदल ओळखून रुग्णांना सतर्क करू शकतात. तंबाखूजन्य पदार्थांवर कायमस्वरूपी बंदी घातल्यास कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते, असेही डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.