ऑर्का व्हेल मासे कोणत्या प्रजातीचे आहेत?
ओर्का व्हेल या माशांना किलर व्हेल असेही म्हणतात. हे समुद्रातील डॉल्फिन कुटुंबातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली मासे आहेत. नावामध्ये व्हेल असले, तरी हा खराखुरा देवमासा नसून प्रत्यक्षात एक महाकाय सागरी डॉल्फिन आहे.
ऑर्का व्हेल मासे सनफिशचे तुकडे कसे करतात?
ऑर्का व्हेल मासे त्यांचे भक्ष्य असलेल्या सील माशांना हवेत उडवतात हे ज्ञात आहे. पण ते केवळ जिवंत भक्ष्याशी खेळत नाहीत. काहींना तर मृत माशांचे तुकडे करण्यातही आनंद मिळतो असे संशोधनात दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी २०२४ आणि २०२५ मध्ये कॅलिफोर्नियाच्या आखातातील ऑर्का व्हेल माशांच्या या कृत्यांची नोंद केली. दोन्ही घटनांमध्ये, एका प्रौढ ऑर्काने एक मृत शार्प-टेल सनफिश स्थिर धरला, तर दुसऱ्याने त्यावर जोराने धडक दिली. या धडकेने त्या सनफिशचे तुकडे झाले. त्यांनी हे कृत्य लहान ऑर्का माशांना सनफिशचे लहान तुकडे देण्यासाठी केले असावे किंवा त्यांना असे करण्यात आनंद मिळत असावा अशी शक्यता शास्त्रज्ञांनी ‘फ्रंटियर्स इन इथॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.
शार्प-टेल सनफिशच्या शिकारीसाठी कल्पक रणनीती
या संशोधनात सहभागी नसलेल्या न्यूझीलंडमधील ऑकलंड संग्रहालयातील सागरी जीवशास्त्रज्ञ मारियान नायगार्ड यांनी ऑर्का व्हेल माशांच्या या वर्तनावर भाष्य करताना, हे वर्तन पाहून थक्क झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा अहवाल प्रसिद्ध होण्याच्या अगोदर समाजमाध्यमांवर ऑर्का व्हेल सनफिशला मारत असल्याचे काही व्हिडिओ पाहिले होते. नायगार्ड यांच्या मते काही मीटरपर्यंत लांब होऊ शकणाऱ्या शार्प-टेल सनफिशची शिकार करण्यासाठी ऑर्का व्हेल माशांनी कल्पक रणनीती शोधून काढली आहे. शिकार कशी करायची आणि विविध प्रकारच्या असंख्य भक्ष्यांना कसे हाताळायचे, हे शोधून काढण्यात ऑर्का व्हेल मासे खूप हुशार असल्याचे त्यांनी नमूद केले. ही शिकार ऑर्का माशांसाठी अनेकदा एक सांघिक खेळ असल्याचे त्यांना वाटते. जसे की ऑर्का व्हेल मासे देवमाशांवर हल्ला करण्यासाठी एकत्र येतात किंवा पेंग्विनना बर्फावरून खाली पाडण्यासाठी सामूहिकरित्या लाटा निर्माण करतात. या संशोधनात सहभागी नसलेल्या सागरी जीवशास्त्रज्ञ फ्रान्सिस्का पॅनकाल्डी यांच्या मते, ऑर्का मासे बहुधा आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यास मदत व्हावी म्हणून सनफिश माशांची अशा प्रकारे कत्तल करतात. त्या नमूद करतात की, शोधनिबंधात वर्णन केलेल्या सनफिशच्या एका मोठ्या हल्ल्यानंतर, ऑर्काचे एक पिल्लू त्या कत्तलीच्या लहान तुकड्यांवर जगू लागले.
संशोधकांना घटनांमध्ये काय दिसले?
कनेक्सिओनेस टेरामार या मेक्सिकन संस्थेतील सागरी जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव छायाचित्रकार तसेच संशोधनाचे सह-लेखक एरिक हिगुएरा यांनी ऑर्का व्हेल माशांचे कृत्य जवळून अनुभवले. त्यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही तुमच्या बोटीच्या अगदी जवळ, अनेक टन वजनाचा एक सर्वोच्च शिकारी मासा अत्यंत वेगाने एका महाकाय माशावर हल्ला करताना पाहता, तेव्हा होणारा प्रचंड ध्वनी आणि त्यामुळे उतींचा होणारा स्फोट हा भारावून टाकणारा असतो. सप्टेंबर २०२५मध्ये एका पर्यटन व्यावसायिकाने चित्रित केलेल्या दुसऱ्या एका घटनेत, एक प्रौढ मादी ऑर्का एक मृत सनफिश मासा धरून उभी होती, तर दुसरी ऑर्का अतिशय वेगाने धडक देऊन त्याचे हजारो तुकडे करत होती. या दोन्ही घटना मेक्सिकोच्या किनाऱ्याजवळील कॅलिफोर्नियाच्या आखातात चित्रित करण्यात आल्या, परंतु यात त्याच ऑर्काचा सहभाग होता की नाही हे अस्पष्ट आहे.
ऑर्का व्हेल मासे दंगा करण्यात पटाईत?
ऑर्का व्हेल मासे त्यांच्या सामाजिक आवडीनिवडी आणि दंगा करणाऱ्या खेळांसाठी ओळखले जातात. १९८०च्या दशकात ऑर्का माशांच्या एका कळपाने मेलेले साल्मन मासे टोपीप्रमाणे डोक्यावर वाहून नेण्यास सुरुवात केली. ही घटना स्पेन आणि पोर्तुगालच्या किनाऱ्याजवळ टिपण्यात आली होती. त्यांचा तो खेळ अलीकडेच पुन्हा सुरू झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संशोधनाचे सह-लेखक एरिक हिगुएरा यांनी सांगितले की, ऑर्का व्हेल मासे एकमेकांवर समुद्री शेवाळ फेकतात, बोटींच्या लाटांवर स्वार होतात आणि गुंतागुंतीचे डावपेचांचे खेळ खेळतात. खेळ हे त्यांच्या समूहाचा आधारस्तंभ आहे. फ्रंटियर्स इन इथॉलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार, माशांच्या वर्तनाचा उद्देश काहीही असो, ते संज्ञानात्मक कौशल्याची एक प्रभावी पातळी दर्शवतात. यामुळे या माशांमध्ये अनेक टप्प्यांचे नियोजन आणि समन्वय असल्याचे दिसून येते.
dharmesh.shinde@expressindia.com
