scorecardresearch

विश्लेषण : करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली? आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काय लागले?

करोना महासाथीमुळे जगातील अनेक देशांना मोठ्या जीवित तसेच वित्तहानीला तोंड द्यावे लागले.

corona virus
करोना विषाणू (संग्रहित फोटो)

करोना महासाथीमुळे जगातील अनेक देशांना मोठ्या जीवित तसेच वित्तहानीला तोंड द्यावे लागले. करोना महासाथ रोखण्यासाठी जगभरातील अनेक संस्था, शास्त्रज्ञ जीवापाड मेहनत घेत आहेत. तर काही संस्थांकडून करोना विषाणूची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या उर्जा विभागाने याच करोना विषाणूच्या उगमाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. या विषाणूचा उगम आणि चीममधील प्रयोगशाळेतून झाला आहे. प्रयोगशाळेत योग्य ती काळजी नघेतल्यामुळे या विषाणूचा प्रसार झाला, असा दावा अमेरिकेच्या उर्जा विभागाने केले आहे. याच पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी आतापर्यंत कोणते प्रयत्न केले गेले? आतापर्यंत काय निष्कर्ष काढण्यात आले? यावर नजर टाकुया.

हेही वाचा >>> विश्लेषण : वर्षभर साजरा होणार ‘संत सेवालाल महाराज जंयती उत्सव,’ मोदी सरकारच्या निर्णयामागे राजकीय हेतू?

करोना विषाणूचा संसर्ग सस्तन प्राण्यांमार्फत?

आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांनी करोना विषाणूचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आतापर्यंत कोणीही ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. या बाबतीत वेगवेगळ्या देशांतील संस्थांची वेगवेगळी मतं आहेत. काही शास्त्रज्ञांनी करोना विषाणूच्या जैविक रचनेचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या आधारे शास्त्रज्ञांनी करोना विषाणू मानवांमध्ये सस्तन प्राण्यांच्या मार्फत आला असावा, असा दावा केलेला आहे. या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत झुनोटिक स्पिलओव्हर (zoonotic spillover) म्हटले जाते. पण काही शास्त्रज्ञांकडून असा दावा केला जातो की, करोना विषाणूचा प्रसार वुहान येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेतूनच झाला आहे. याआधीही या प्रयोगशाळेत विषाणू अपघाताने बाहेरच्या वातावरणात जाण्याचे अपघात घडलेले आहेत. २०१४ साली बर्ड फ्लू, अँथ्रॅक्स असे विषाणू या लॅबमधून अपघाताने बाहेरच्या वातावरणात आले होते. या अपघातानंतर येथे आणखी कठोर प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करण्यात आली होती. येथील जैवसुरक्षा वाढवण्यात आली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : मनिष सिसोदियांच्या अटकेचा ‘आप’वर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर

करोना विषणूच्या उत्पत्तीबाबत आतापर्यंत काय माहिती उपलब्ध आहे?

करोना विषाणूच्या उत्पत्तीचा मागील अनेक दिवसांपासून शोध घेतला जात आहे. मात्र चीनच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे हा शोध जास्तच कठीण आणि किचकट होऊन बसला आहे. करोना विषाणूची जेव्हा मानवांना लागण होत होती, तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. करोना संसर्गाच्या सुरुवातीला चीनमधील शास्त्रज्ञ वुहान येथील बाजारपेठेत नमुना गोळा घेण्यासाठी गेले होते. मात्र तोपर्यंत येथील सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. या बाजारात एकही जिवंत प्राणी शिल्लक नव्हता. त्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती. चीनकडून करोना विषाणूची अपुरी माहिती देण्यात आली, असा दावा काही शास्त्रज्ञ करतात.

हेही वाचा >>> विश्लेषण: दिल्लीतील मद्य घोटाळा काय आहे? उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक का झाली?

शास्त्रज्ञांनी आतापर्यंत काय शोध घेतला?

करोना विषाणूच्या उगम आणि प्रसाराचे कारण चीनमधील बाजारपेठ असल्याचे म्हटले जाते. चीनमधील वुहानमधील करोनाग्रस्तांचा येथील बाजारपेठेशी संबंध जोडण्याआधीच येथील शास्त्रज्ञांनी त्या करोनाग्रस्तांचा अभ्यास केला होता. काही शास्त्रज्ञांना चीनमधील हुनाना बाजारपेठेतही करोना विषाणू आढळला होता. येथील नोदींचाही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. ज्या भागात जिंवत प्राणी विकले जात आहेत, त्या भागात करोना विषाणू आढळला होता, असे या शास्त्रज्ञांना आढळले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : कर्नाटकचे कन्नड भाषा विधेयक काय आहे? माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना विधेयक कठोर का वाटते?

अमेरिकेच्या उर्जा विभागाच्या नव्या संशोधनात काय दावा करण्यात आला आहे?

अमेरिकेच्या उर्जा विभागाने करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत नवा दावा केला आहे. सार्वजनिक नसलेल्या माहितीवर आधारित हा दावा करण्यात आला आहे. उर्जा विभागाने करोना विषाणूचा प्रसार हा चीमधील प्रयोगशाळेतूनच झाला आहे, असे सांगितले आहे. मात्र हा दावा करताना उर्जा विभागाने संदिग्धताही दर्शवली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्याच एफबीआयने करोना विषाणूचा प्रसार लॅबमधूनच झाल्याचा आम्हाला विश्वास आहे, असे म्हटले आहे. दुसरीकडे नॅशनल इंटेलिजेंस काऊन्सिलसह इतर चार संस्थांनी करोनाचा उगम आणि प्रसार हा नैसर्गिक संक्रमणातून झाला असावा, असे सांगितले आहे. अमेरिकेच्या सीआयएने याबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 14:10 IST