-भक्ती बिसुरे
करोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घालून कोट्यवधी नागरिकांना संसर्ग केला आणि अगणित नागरिकांचे प्राणही घेतले. त्याच्या उगमाला दोन वर्षे होऊन गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटना या संपूर्ण महासाथीच्या काळात तिच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिली आहे. काही काळापूर्वीपर्यंत करोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून बाहेर आल्याची शक्यता ठामपणे फेटाळून लावणाऱ्या संघटनेने आता आपल्याच जुन्या भूमिकेवर घूमजाव केले आहे. करोना विषाणूची उत्पत्ती ही खरोखरीच चिनी प्रयोगशाळांमधून झाली का याची ठोस चौकशी होण्याची गरज जागतिक आरोग्य संघटना आता व्यक्त करत आहे.

सद्यःस्थिती काय?

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य विभागाने (युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने) महासाथीचे प्राथमिक विश्लेषण केल्यानंतर अनेक समीक्षक आणि शास्त्रज्ञ करोना विषाणूचे उत्पत्तीस्थान हे वुहानमधील प्रयोगशाळेतच असल्याची शक्यता झटकून टाकणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीनही आता बचावात्मक पवित्र्यात आहे. करोना विषाणू हा वटवाघळांद्वारे इतर प्राण्यांकडे आणि नंतर माणसांकडे आला असण्याची शक्यता बहुतांश शास्त्रज्ञ वर्तवत असताना डब्ल्यूएचओ मात्र अगदी अलीकडेपर्यंत तशी शक्यता फेटाळून लावत होती. आता मात्र, साथीची सुरुवात कशी झाली या कोड्याचा उलगडा करणाऱ्या माहितीचे काही तुकडे उपलब्ध नाहीत किंवा गहाळ आहेत. हे तुकडे शोधून ते जोडून घेतल्यास साथरोग आणि विषाणूच्या उगमस्थानाबद्दल बरीच माहिती मिळणे शक्य असेल असे ही संघटना म्हणते. आपल्या अहवालाच्या तळटीपेत चीन, ब्राझील आणि रशिया या तीन देशांचे तज्ज्ञ करोना विषाणूचे उत्पत्तीस्थळ प्रयगोशाळा हे आहे का, याबाबत सखोल संशोधनाच्या गरजेविषयी सहमत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

घूमजाव कशामुळे?

करोना विषाणूचे उत्पत्तीस्थान या विषयावर दीर्घकाळ संशोधन करणारे जीन-क्लॉड मॅनुगेरा आणि २७ इतर सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार गटाने नुकतेच केलेले विधान याला कारणीभूत ठरल्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांना करोना विषाणूचे उत्पत्तीस्थान प्रयोगशाळा हे आहे आणि तेथूनच तो बाहेर आला आहे या सिद्धांताची तपासणी करण्याची कल्पना नकोशी वाटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशी तपासणी करण्यासाठी मोकळ्या मनाने आपण तयारी दर्शवणे आवश्यक आहे, असे सूचक वक्तव्य या शास्त्रज्ञ गटाकडून करण्यात आले आहे.

डब्ल्यूएचओ अडचणीत येणार?

करोना विषाणूच्या उत्पत्तीस्थानाबाबत शोध घेणारे संशोधन झाले असता ते जागतिक आरोग्य संघटनेच्या अंगाशी येणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे चीनमध्ये साथरोगाला सुरुवात झाली असता त्याबाबत विविध स्तरांवरून चिंता व्यक्त केली जात असताना जागतिक आरोग्य संघटना मात्र चीनला सतत पाठीशी घालत असल्याचे त्याकाळात दिसून आले होते. त्याचीच परिणती म्हणजे एका विषाणूचे जगभर हाहाकार माजवणाऱ्या, उद्योगधंद्यांचे नुकसान करणाऱ्या आणि आर्थिक संकटाच्या खाईत लोटणाऱ्या महासाथीत रूपांतर झाल्याचे संपूर्ण जगाने अनुभवले. त्याचे चटकेही सोसले. त्यामुळेच विषाणूची उत्पत्ती वुहानमधील प्रयोगशाळेतून झाली असे खरोखरच समोर आले असता ते जागतिक आरोग्य संघटनेच्या अंगाशी येण्याची तसेच संघटनेची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चीनची संदिग्ध भूमिका कायम?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी फेब्रुवारी महिन्यात चीनशी संपर्क साधून वुहान शहरातील सुरुवातीच्या टप्प्यातील करोना रुग्णांबाबत (मानवामध्ये संसर्ग आढळलेल्या घटना) माहिती पुरवण्याची मागणी केली. मात्र, चीनने त्याला प्रतिसाद दिला किंवा नाही हे स्पष्ट नाही. प्रयोगशाळेतून झालेल्या अपघाती गळतीमुळे विषाणूचा उद्रेक झाल्याच्या सिद्धांताला पुष्टी देणारा कोणताही अभ्यास संघटनेला सादर करण्यात आलेला नाही, किंवा विषाणूचा उदय नेमका कसा झाला याबाबतचे संशोधनही चीनने प्रकाशात येऊ दिलेले नाही. त्यामुळे त्याबाबत ज्ञात माहिती मर्यादित आहे. संघटनेचे सल्लागार जॉन मेट्झेल यांच्या मते विषाणूच्या उत्पत्तीबाबत सखोल संशोधन करण्याचे संघटनेचे आवाहन स्वागतार्ह आहे, मात्र चीन अद्यापही कोणतीही माहिती देण्यात सहकार्य करताना दिसत नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

चीनचे सहकार्य का आवश्यक?

जॉन मेट्झेल यांच्या मते करोना महासाथ कशी सुरू झाली हे समजून घेण्यासाठी चीनचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. साथीचे उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी अनेक मार्गांनी संशोधन होण्याची गरज आहे. मार्च २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने चीनला भेट देऊन प्रसिद्ध केलेल्या अहवालात करोना विषाणूचा प्रयोगशाळेशी संबंध दर्शवणारा पुरावा नाही. मात्र, त्या भेटीचे स्वरूप पहाता त्या अहवालावर संपूर्ण विसंबणे योग्य नाही. भविष्यातील संभाव्य साथरोगांविरोधात लढा देण्यासाठी सक्षम धोरण ठरवण्यासाठी चीनने याबाबत सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे आता जागतिक वर्तुळात बोलले जात आहे.