बॉलिवुडमधील सिनेमांपासून ते अंडरवर्ल्ड शूटआऊट्सपर्यंत खऱ्या आणि रीललाईफ गुन्ह्यांमध्ये ‘सुपारी’ हा शब्द ‘तकिया कलाम’ अर्थात अगदी परवलीचा झाला आहे. कोणत्याही गुन्ह्यासाठी आता ‘सुपारी’ दिल्याचं सर्रासपणे बोललं जातं. पण आपल्या साध्या विड्याच्या पानामध्ये कातरून टाकली जाणारी सुपारी एखाद्याच्या हत्येसाठी ‘दिली’ जाण्यापर्यंत कशी काय पोहोचली? हा प्रश्न अगदी सहज पडू शकतो. मुंबईत ६० आणि ७०च्या दशकात जेव्हा हाजी मस्तान आणि करीम लालाची दहशत इथल्या गल्लीबोळांमधून वाढत वाढत थेट आंतरराष्ट्रीय रॅकेटपर्यंत पोहोचली, तिथेच या ‘सुपारी’ची पाळंमुळं असल्याचं उपलब्ध दस्तऐवज आणि दंतकथांवरून दिसून येत आहे.

भारत सरकारवर पेगॅसस स्पायवेअर खरेदी प्रकरणी आरोप करणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी ‘सुपारी मीडिया’ अशी पदवी देऊन टाकली. त्यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्व आणि गुन्हेगारी रॅकेटच्या संदर्भात ही ‘सुपारी’ वापरली जाऊ लागली आहे.

BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Letter from Amolakchand college professor to district election decision officer regarding ballot paper voting
‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

‘सुपारी’चं मूळ काय?

महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभरात साधारणपणे खायच्या पानासोबत अर्थात विड्याच्या पानासोबत सुपारी खाल्ली जाते. कुणी कतरी सुपारी म्हणतं, तर कुणी खांडाची सुपारी! पण हाच सुपारी शब्द कालांतराने एखाद्याला जीवे मारण्याचं काम देण्यासाठी म्हणून आणि हळूहळू गेल्या काही वर्षांमध्ये एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचं काम देण्यासाठी म्हणून देखील वापरला जाऊ लागला.

‘सुपारी’ हाच शब्द का?

खरंतर सुपारीच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांबाबत अनेक दावे केले जातात. पण ७०च्या दशकात महाराष्ट्र पोलिसात भरती झालेले निवृत्त एसीबी वसंत ढोबळे यांच्यामते याचं मूळ महाराष्ट्रातल्या एका प्रथेमध्ये आढळतं. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात गावातल्या लोकांना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकेच्या ऐवजी पान आणि सुपारी दिली जात असे. कालांतराने कुणाला काही बांधकाम वगैरेचं काम देण्यासाठी देखील सुपारीचा वापर केला जाऊ लागला. याला ‘कामाची सुपारी देणं’ असं म्हटलं जाऊ लागलं.

त्या काळामध्ये, अर्थात ७०च्या दशकात, मुंबईत पोस्टिंगवर असलेले बहुतांश पोलीस हे राज्याच्या ग्रामीण भागातून आले होते. वसंत ढोबळे यांच्यामते, अमुक गुंडानं अमुक व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली वगैरे बोलायला या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आधी सुरुवात केली. याच काळात अंडरवर्ल्डशी पोलिसांचा अनेक चौकशा आणि प्रकरणांमध्ये संबंध आल्यानंतर हा शब्द अंडरवर्ल्डनं परवलीचा करून टाकला!

सुपारी आणि माहिमचे राजे भीम!

याचसंदर्भात ‘डोंगरी टू दुबई’, ‘भायखला टू बँकॉक’ अशी अंडरवर्ल्डवरील नावाजलेली पुस्तकं लिहिणारे हुसेन झैदी यांनी त्यांच्या डोंगरी टू दुबई या पुस्तकात सुपारीची ‘कहाणी’ सांगितली आहे. त्यांच्यामते सुपारी शब्द आणि त्याचा विशिष्ट वापर त्या काळातल्या मुंबईतील माहीम प्रांताचा राजा भीम याच्याकडून प्रचलित झाला. भीम राजा असलेल्या महेमी आदिवासींमध्ये एक पद्धत होती. त्यानुसार जेव्हा कधी मोठं युद्ध किंवा कठीण काम असायचं, तेव्हा भीम राजा माहीमच्या किल्ल्यामध्ये सर्व सरदारांची बैठक बोलवायचा. मध्यभागी सुपारी आणि पानाचा विडा ठेवला जायचा. जो कुणी तो विडा उचलेल, त्याला काम सोपवलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजलखानानं देखील दरबारात असाच विडा उचलल्याचं इतिहासात नमूद आहे!

“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी”

अंडरवर्ल्ड आणि हत्येची सुपारी!

मुंबईत ८० आणि ९०च्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी जगतात अशा सुपारी घेऊन हत्या केल्याच्या अनेक घडना घडू लागल्या होत्या. आपल्या विरोधकाचा खात्मा करण्यासाठी अंडरवर्ल्डला ‘सुपारी’ दिली जायची. जेवढं मोठं काम, तेवढी सुपारीची रक्कम जास्त असा सगळा मामला असायचा! हफ्त्या-हफ्त्याने ही रक्कम अदा केली जायची. बॉलिवुडच्या अनेक सिनेमांमध्ये अंडरवर्ल्ड आणि सुपारीचं हे चित्र असंख्यवेळा दिसून आलं आहे.

हत्येसाठी ‘सुपारी’ देण्याची सुरुवात कधी झाली?

हुसेन झैदी यांच्या पुस्तकात नमूद केल्यानुसार, मुंबईत सुपारी देऊन अर्थात काँट्रॅक्ट किलिंगच्या पहिल्या काही बोटावर मोजता येणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे १९६९ साली गँगस्टर (नंतर हा निवडणुकांमध्ये देखील उतरला!) हाजी मस्तानने दुसरा गँगस्टर युसूफ पटेलला मारण्याची सुपारी दिली होती. ही सुपारी दिली होती दोन पाकिस्तानी गुन्हेगारांना आणि तिची रक्कम होती १० हजार रुपये! हा प्रयत्न फोल ठरला आणि युसूफ पटेलचा जीव बचावला हा भाग वेगळा.

बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण

याच सुरुवातीच्या काँट्रॅक्ट किलिंगपैकी अजून एक थरारक घटना म्हणजे पठाण आमिरजादेची हत्या. दाऊद आणि पठाण या दोन टोळ्यांमध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळात मुंबईत राडे व्हायचे आणि ज्या हत्येनं दाऊदची दहशत निर्माण केली, ती म्हणजे विरोधी गँगच्या पठाण आमिरजादेची सुपारी. १९८३मध्ये दाऊदचा भाऊ शब्बीरची पठाण आमिरजादेनं हत्या केली होती. त्याचा सूड उगवण्यासाठी दाऊदनं आधी बडा राजनला ही सुपारी दिली होती. पण नंतर हे काँट्रॅक्ट डेविड परदेशी नावाच्या गुंडाला देण्यात आलं. डेविडनं मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात ६ सप्टेंबर १९८३ रोजी ५० हजार रुपयांची ‘सुपारी’ घेऊ पठाण आमिरजादेची हत्या केली.

संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरण

याच यादीमध्ये अजून एक कुप्रसिद्ध झालेली सुपारी किलिंग समाविष्ट करता येईल ती म्हणजे त्या काळातील नावाजलेले संगीतकार गुलशन कुमार यांची हत्या. १२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरीतील एका मंदिराजवळ गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमनं दुबईत या हत्येची योजना आखली होती. यासाठी हल्लेखोरांना २५ लाख रुपये देण्यात आले होते.

जेव्हा दाऊदने ऋषी कपूर यांना चहासाठी बोलावलं; डॉनच्या भेटीचा ‘तो’ किस्सा

अंडरवर्ल्डमध्ये सुपारी शब्दाचा वापर सर्रासपणे हत्येसाठी केला जातो. पण गेल्या काही वर्षांमध्ये इतर क्षेत्रात आणि इतर कारणांसाठी देखील सुपारी या शब्दाचा वापर केला जातो. अनेक कलाकार एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घेत असलेल्या मानधनाला देखील ‘सुपारी’ म्हणण्याची प्रथा आहे. तसेच, अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लग्नकार्याच्या आधी ग्रामस्थांना आमंत्रण देण्यासाठी पान-सुपारीचा कार्यक्रम ठेवला जातो. पण हे सगळं असलं, तरी अंडरवर्ल्डमधल्या ‘सुपारी’नं या सुपारीचा पूर्ण अर्थच बदलून टाकला हे निश्चित!