US Navy SEALs vs Iran Revolutionary Guards Trump Post : इराणने पाडलेल्या लढाऊ विमानातील बेपत्ता वैमानिकाला शोधून, त्याची सुटका करण्यात अमेरिकेला रविवारी यश आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमधून त्याबाबतची माहिती दिली. बेपत्ता वैमानिकाचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने आपली सर्वांत घातक मानली जाणारी ‘सील टीम ६’ ही लष्कराची विशेष तुकडी इराणमध्ये पाठवली होती. या तुकडीने २०११ मध्ये पाकिस्तानमध्ये घुसून अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार केले होते. इराणच्या अत्यंत असुरक्षित भागात शिरकाव करून आपल्या सहकाऱ्याला वाचवण्याचे कठीण आव्हान या तुकडीने अत्यंत यशस्वीरीत्या पेलले. त्याविषयीचा हा आढावा….
अमेरिकेची सील टीम नेमकी काय आहे?
इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन वैमानिकाच्या सुटकेसाठी ‘सील टीम ६’ मैदानात उतरल्याने त्याची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. अमेरिकन लष्करातील या विशेष तुकडीचे अधिकृत नाव ‘नेव्हल स्पेशल वॉरफेअर डेव्हलपमेंट ग्रुप’ असल्याचे सांगितले जात आहे. या तुकडीत अमेरिकन लष्करातील अत्यंत निवडक जवानांचा समावेश असतो. ‘जॉईंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड’द्वारे चालवले जाणारे हे पथक जगातील सर्वांत धोकादायक आणि अतिशय गुप्त मोहिमा फत्ते करण्यासाठी ओळखले जाते. दहशतवादविरोधी मोहिमा आणि शत्रूच्या तावडीतून ओलिसांची सुटका यांसारखी क्लिष्ट कामे या पथकाकडून केली जातात. इराणमधील ‘ऑपरेशन ईगल क्लॉ’ ही अमेरिकेची मोहीम अपयशी ठरल्यानंतर १९८० मध्ये या पथकाची स्थापना करण्यात आल्याचे अमेरिकन सैन्यदलाच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद केलेले आहे.
अमेरिकेच्या सील टीमचा इतिहास काय?
अमेरिकेच्या ‘सील टीम ६’ या विशेष दलाची पाळेमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील नौदलाच्या विविध पथकांमध्ये आढळतो. सुरुवातीला ‘फ्रॉगमेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दलातून १९६२ मध्ये ‘सील टीम १’ व ‘सील टीम २’ या पथकांची स्थापना झाली होती. मात्र, ‘सील टीम ६’ या पथकाच्या निर्मितीमागे इराणमधील एका मोठ्या अपयशाचा इतिहास दडलेला आहे. नोव्हेंबर १९८० मध्ये कमांडर रिचर्ड मार्किन्को यांच्या नेतृत्वाखाली अधिकृतपणे ‘सील टीम ६’ पथकाची स्थापना झाली. विशेष म्हणजे त्यावेळी अमेरिकन नौदलात फक्त दोनच विशेष पथके होती. मात्र, तत्कालीन सोविएत युनियनला गोंधळात टाकण्यासाठी मार्किन्को यांनी या तुकडीला ६ हा क्रमांक दिला होता. योगायोग असा की, ज्या इराणमध्ये आज हे पथक वैमानिकाला वाचवण्यासाठी उतरले, त्याच इराणमधील एका अपयशी मोहिमेमुळे या पथकाची स्थापना झाली होती.
आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर जगभरात खळबळ; भारताने कशासाठी तयार राहावे? तज्ज्ञांचे मत काय?
सील टीमची स्थापना नेमकी कशी झाली?
१९८० मध्ये इराणने ५२ अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी ‘ऑपरेशन ईगल क्लॉ’ या लष्करी मोहिमेला हिरवा कंदील दिला. या मोहिमेदरम्यान अमेरिकन सैन्यदलातील एक हेलिकॉप्टर ‘C-130’ या मालवाहू विमानाला धडकले. या भीषण दुर्घटनेत अमेरिकेच्या नौदलातील आठ सैनिकांचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेनंतर इराणने अमेरिकेसोबतच्या वाटाघाटीच्या चर्चाही थांबवल्या. या दुर्घटनेचा मोठा फटका जिमी कार्टर यांना बसला आणि त्यांची दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली. अखेर रोनाल्ड रेगन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इराणकडून ओलिसांची सुटका करण्यात आली. कमांडर रिचर्ड मार्किन्को यांच्या शिस्तहीन कार्यपद्धतीमुळे १९८७ मध्ये ‘सील टीम ६’ काही दिवसांसाठी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतरच्या काही वर्षांतच हे विशेष पथक पुन्हा लष्करात कार्यरत करण्यात आले.
सील टीममध्ये जवानांची निवड कशी केली जाते?
जगातील सर्वांत घातक समजल्या जाणाऱ्या ‘सील टीम ६’मध्ये प्रवेश मिळवणे ही साधी बाब नाही. अमेरिकन नौदलाच्या सील दलात एकूण आठ ते नऊ हजार जवान असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी काही मोजक्याच जवानांची ‘सील टीम ६’ या विशेष पथकासाठी निवड केली जाते. या पथकात सहभागी होणारे जवान साधारणतः ३० वर्षांच्या आसपासच्या वयोगटातील असतात. हे दल विविध विभागांमध्ये विभागलेले असून, प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली असते. या दलात सामील होण्यासाठी जवानाला अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. ‘सील टीम ६’ हे पथक अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ किंवा लष्कराची दुसरी एलिट युनिट ‘डेल्टा फोर्स’ यांच्यासोबत मिळून अत्यंत गुप्त आणि संयुक्त मोहिमा राबवते.
२०११ मध्ये केले ओसामा बिन लादेनला नष्ट
वेगवान कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन नौदलाच्या या विशेष पथकाने २ मे २०११ रोजी पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे घुसून ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी ओसामा बिन लादेनला मृत्यु सदनी पाठवले होते. विशेष बाब म्हणजे त्यांनी केलेल्या कारवाईचा पाकिस्तानी सैनिकांना थांगपत्ताही लागला नव्हता. या मोहिमेत जवळपास दोन डझन सील जवान आणि दोन ‘स्टेल्थ’ हेलिकॉप्टर्स सहभागी झाली होती. या कारवाईदरम्यान अमेरिकेचा एकही जवान जखमी झाला नाही. या घटनेवर आधारित ‘झिरो डार्क थर्टी’ हा हॉलीवूड चित्रपटही मोठा गाजला होता. २००९ मध्ये सोमालीतील दहशतवाद्यांनी हिंदी महासागरात ‘मर्स्क अलाबामा’ या जहाजाचे अपहरण केले होते. त्यावेळी ‘सील टीम ६’ने अचूक लक्ष्य साधत दहशतवाद्यांना ठार केले आणि जहाजासह त्यावरील कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली होती. २००२ अफगाणिस्तानमध्ये या दलाने शत्रूंशी दोन हात करून ओलिसांची सुखरूप सुटका केली होती. या विशेष तुकडीतील काही सदस्यांवर युद्धगुन्ह्यांचे आरोपही झाले आहेत.
हेही वाचा : भारताची किती जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली? नेमकी काय आहे सद्यस्थिती?
सील टीमने वैमानिकाला कसे बाहेर काढले?
इराणमध्ये कोसळलेल्या लढाऊ विमानातील वैमानिकाला ‘सील टीम ६’ने अत्यंत धाडसी मोहीम राबवीत सुरक्षितपणे बाहेर काढले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सपासून स्वत:ला वाचवण्यासाठी हा वैमानिक डोंगराळ आणि दुर्गम भागात लपून बसला होता. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी उपग्रहाद्वारे आणि त्या अधिकाऱ्याकडे असलेल्या बॅटलफिल्ड सिग्नलद्वारे त्याचे अचूक ठिकाण शोधून काढले. इराणची रडार यंत्रणा भेदण्यासाठी सील टीमने अत्याधुनिक ‘स्टेल्थ’ हेलिकॉप्टर्सचा वापर केला. ही हेलिकॉप्टर्स आवाज कमी करतात आणि रडारवर दिसत नाहीत. रात्रीच्या गडद अंधारात ही टीम इराणच्या हद्दीत शिरली. हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साह्याने ‘सील’ जवान खाली उतरले. इराणच्या सैन्याला संशय येऊ नये म्हणून ही मोहीम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. सील जवानांनी आपल्या वैमानिकाला शोधून त्याला सुरक्षितपणे हेलिकॉप्टरमध्ये घेतले. इराणच्या सैन्याला काही समजण्यापूर्वीच ‘सील टीम ६’ या वैमानिकाला घेऊन सुरक्षित तळावर पोहोचली. या मोहिमेत एकही गोळी न झाडता किंवा कोणतीही जीवितहानी न होता, अमेरिकेने आपल्या जवानाला शत्रूच्या जबड्यातून बाहेर काढले.
