नामांकित कलाकारांच्या मोठमोठ्या चित्रपटांचे यशापयश, चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या तीन दिवसांत रंगणारा हिट-फ्लॉपचा खेळ आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी करावे लागणाने नाना प्रयत्न ही समीकरणे जमवण्याची धडपड करावी लागत नाही म्हणून ओटीटी (ओव्हर द टॉप) या नव्या प्लॅटफॉर्म्सच्या येण्याने चित्रपट उद्योग सुखावला होता. मात्र, सध्या ओटीटीवरही हिट आणि फ्लॉप वेबमालिका आणि वेबपट असे ध्रुवीकरण पाहायला मिळते आहे. ऑरमॅक्सच्या पाहणी अहवालानुसार गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या टॉप ५० मूळ कलाकृतींपैकी केवळ तीन कलाकृतींना अडीच कोटी प्रेक्षकसंख्येचा आकडा पार करता आला आहे. तर अर्ध्याहून अधिक वेबमालिका वा चित्रपटांना केवळ दीड कोटी किंवा त्याहून कमी प्रेक्षकसंख्येवर समाधान मानावे लागले आहे.
ओटीटीची अवस्था चित्रपटगृहांसारखीच?
ओटीटीची परिस्थितीही सध्या चित्रपटगृहांच्या व्यवसायासारखीच झाली आहे, असे मत सध्या मनोरंजन उद्योगातील ट्रेड विश्लेषक आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. चित्रपटगृहांप्रमाणेच ओटीटीवरही सध्या मोजक्याच हिट चित्रपट आणि वेबमालिकांना मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग उपलब्ध होतो आहे. त्यामुळे काही नावाजलेल्या वेबमालिका किंवा चर्चेतले थेट ओटीटीवर प्रदर्शित होणारे चित्रपट सोडले तर अनेक वेबमालिका कधी आल्या… कधी निघून गेल्या… अशी अवस्था आहे.
संख्यावाढीचा फटका?
मुळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातही झी ५, सोनी लिव्ह अशा काही प्लॅटफॉर्म्सनी हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील आशयावर लक्ष केंद्रित केले आहे. तर नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम आणि जिओ हॉटस्टारसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सनी आंतरराष्ट्रीय वेबमालिका, चित्रपटांबरोबरच हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषेतील आशय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुळातच प्रेक्षक इतक्या साऱ्या प्लॅटफॉर्म्समध्ये विखुरला गेला आहे. दर आठवड्याला नव्याने येणाऱ्या वेबमालिका, चित्रपट, माहितीपटांची प्रचंड संख्या, त्यातल्या काही निवडक संख्येतील वेबमालिकांच्या प्रसिद्धी आणि मार्केटिंगवर केला जाणारा खर्च आणि कित्येक वेबमालिकांना मौखिक प्रसिद्धी मिळवण्यातही आलेले अपयश यामुळे ओटीटीवर एकीकडे प्रचंड हिट होणारा आशय आणि अजिबातच पाहिला न जाणारा आशय अशा पद्धतीचे वाढते ध्रुवीकरण मनोरंजन व्यवसायातील धुरीणांसाठीही चिंतेचा विषय ठरतो आहे.
ऑरमॅक्सचा अहवाल काय सांगतो?
ऑरमॅक्सच्या अहवालानुसार २०२५ मध्ये ‘स्पेशल ऑप्स सीझन २’, ‘क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर’ आणि ‘एक बदनाम आश्रम’ या तीनच वेबमालिकांना अडीच कोटींहून अधिक प्रेक्षकसंख्या लाभली, तर जवळपास ३० मोठ्या वेबमालिकांची प्रेक्षकसंख्या १ ते दीड कोटी दरम्यान होती. ओटीटीवर प्रत्येक वेबमालिकेला बऱ्यापैकी प्रेक्षक असतील, अशी सुरुवातीची अटकळ होती. चित्रपटांप्रमाणे रुपेरी पडद्यावरचे नामांकित कलाकारच हवेत, मसाला मनोरंजनच हवे, अशी गणिते ओटीटीवरच्या आशयाला लागू नव्हती. त्यामुळे आशयातले प्रयोग करण्याची संधी जशी या माध्यमामुळे उपलब्ध झाली, तसेच बऱ्याच नव्या कलाकारांनाही संधी मिळाली. वलयांकित चेहरे आणि ठरावीक साच्यातील मनोरंजन हे समीकरण अजूनही ओटीटीला लागू झाले नसले, तरी सध्या उपलब्ध असलेले प्लॅटफॉर्म्स आणि त्यावरचा कंटेंट हा पसाराच इतका वाढला आहे की त्या तुलनेत प्रेक्षकांकडे असणारा वेळ मर्यादित आहे. त्यामुळे साहजिकच त्यातल्या त्यात खूप पाहिला गेलेला, गाजावाजा झालेला, समाज माध्यमांवर चर्चेत असलेला असाच आशय ओटीटीवर प्राधान्याने पाहिला जातो. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत जसे आधीच्या चित्रपटांचे रिमेक किंवा सिक्वल यशस्वी ठरले, तीच पद्धत ओटीटीवरही रुढ होताना दिसते आहे.
तीन हिट शोही सिक्वलच!
ऑरमॅक्सच्या अहवालानुसार सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेले पहिले तिन्ही शो हे सिक्वल आहेत. ‘फॅमिली मॅन‘, ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’ अशा अनेक गाजलेल्या वेबमालिकांच्या तिसऱ्या, चौथ्या सीझनलाही प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. त्या-त्या वेबमालिकेचे कथानक, त्यातल्या काही प्रमुख व्यक्तिरेखांसह अन्य आवडलेल्या व्यक्तिरेखा यामुळे अनेकदा सिक्वल शोजबद्दल प्रेक्षक अधिक उत्सुक असतात. त्याचाही परिणाम नव्या वेबमालिकांवर दिसू लागला आहे. ओटीटीवर फ्लॉप आणि हिटची स्वतःची स्वतंत्र समीकरणे दृढ होताना दिसत आहेत.
मराठीत काय परिस्थिती?
ओटीटीवर प्रादेशिक आशयाची मागणी अधिक आहे, त्यामुळे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनीही दाक्षिणात्य भाषेतील शोज उपलब्ध करून दिले आहेत. झी ५ सारख्या ओटीटीने मराठीत मूळ शोजच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्यांनी ‘अंधारमाया’, ‘देवखेळ’, ‘बाईपण’ असे शो आणले. आपल्या मातीतल्या गोष्टी, आवडते कलाकार यामुळे प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षकवर्ग तुलनेने अधिक आहे, असे ट्रेड विश्लेषक स्पष्ट करतात. मराठीतील अनेक चित्रपटांना चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र ओटीटीवर ते बहुसंख्य प्रेक्षकांनी पाहिले आहेत. असे असले तरी प्रादेशिक आशयाच्या बाबतीतही प्रत्येक वेबमालिकेला, चित्रपटाला प्रेक्षक मिळतोच असे नाही, हे निरीक्षण चित्रपट व्यावसायिकांनी नोंदवले आहे. हिंदीच्या तुलनेत सध्या प्रादेशिक आशयाला बऱ्यापैकी प्रेक्षक असण्याचे एकमेव कारण म्हणजे प्रादेशिक प्रेक्षक हा भाषिक बाबतीत फार विखुरलेला नसतो, पण याचा अर्थ प्रेक्षक ओटीटीवरचा सगळा आशय हमखास पाहतात असा होत नाही, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे ध्रुवीकरण कारणीभूत?
ओटीटी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्लॅटफॉर्म्समध्येही मोठी तफावत पाहायला मिळते आहे. मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या एका आर्थिक नोंदीनुसार, सध्याच्या अग्रणी ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वार्षिक उत्पन्नातही मोठी तफावत पाहायला मिळते आहे. गेल्या वर्षी एकूण ओटीटी उत्पन्नापैकी युट्यूब खालोखाल सर्वाधिक २३.३ टक्के वाटा हा जिओ हॉटस्टारचा आहे. नेटफ्लिक्स ७.६ टक्के, अमेझॉन प्राईम ३.२ टक्के आणि झी ५, सोनी लिव्ह अनुक्रमे २.९ आणि २.७ टक्के उत्पन्नातील वाटा आहे. जिओच्या डिस्ने हॉटस्टारबरोबरच्या विलीनीकरणामुळे साहजिकच त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरील चित्रपट, वेबमालिका असा मोठा आशय आहे. त्याचा परिणाम अर्थातच प्रेक्षकांच्या संख्येवरही झाला आहे. ओटीटी मार्केटची सद्य:स्थिती पाहता अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी आपापल्या आशयाच्या प्रसिद्धीसाठी नानाविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. यात प्रादेशिक कलाकारांची मदत घेण्यापासून ते प्रत्येक ग्राहकाला त्याच्या आवडी-निवडीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक भाषेतील वेबमालिका, चित्रपटांची माहिती समाजमाध्यमे किंवा ईमेल्सच्या माध्यमातून करून देणे असे विभिन्न उपाय योजले जात आहेत. मात्र, कितीही उपाययोजना केल्या तरी सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनाही चित्रपटगृहांप्रमाणेच हिट आणि फ्लॉपचे गणित सांभाळावे लागते आहे हे नाकारता येण्यासारखे नाही.
