विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, 'बिसलरी' कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला? | packaged water business bisleri international history sell tata consumer products deal ramesh chauhan | Loksatta

X

विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?

कित्येक दशकांचा इतिहास असलेल्या या कंपनीला विकण्यात येत आहे.

विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?
बिसलरी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिसलरी’ ‘पॅकेज वॉटर कंपनी’ची माहिती नसलेली व्यक्ती अपवादानेच सापडेल. पिण्याचे पाणी विकणारा हा ब्रँड संपूर्ण भारतात ओळखला जातो. मात्र कित्येक दशकांचा इतिहास असलेल्या या कंपनीला आता विकण्यात येत आहे. सध्या या कंपनीची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. कायम नफ्यात राहिलेल्या या कंपनीला विकण्याचा निर्णय का घेतला जातोय? या कंपनीचा इतिहास काय आहे? या कंपनीची उलाढाल किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

६ ते ७ हजार कोटी रुपयांना कंपनी विकणार

बिसलरी या ‘पॅकेज वॉटर कंपनी’चे मालक रमेश चौहान आहेत. चार लाख रुपयांना विकत घेतलेल्या या कंपनीला सध्या ६ ते ७ हजार कोटी रुपयांना विकण्यात येत आहे. साधारण ५० वर्षांपूर्वी चौहान यांच्याकडे या कंपनीची मालकी आली. मात्र हीच कंपनी आता टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडला विकली जातेय.

हेही वाचा >>> विश्लेषण : काय आहे सिल्व्हर लाईन रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प, केरळमध्ये का होतोय विरोध?

बिसलरी विकण्याचा निर्णय का घेण्यात आला?

रमेश चैहान हे ८२ वर्षांचे आहेत. पाणी विकण्याच्या व्यवसायात त्यांची बिसलरी ही कंपनी अग्रस्थानी आहे. खालावत जात असलेली प्रकृती आणि या कंपनीला सांभाळण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. रमेश चौहन यांना जयंती नावाची मुलगी आहे. जयंती यांनी बिसलरी इंटरनॅशनल या कंपनीचा कारभार वयाच्या २४ वर्षांपासून सांभाळण्यास सुरूवात केली. त्यांनी प्रोडक्ट डेव्हलपमेंट तसेच फॅशन स्टायलिंगचे शिक्षण घेतलेले आहे. मात्र जयंती यांनीदेखील वडील रमेश चौहान यांचा हा व्यवसाय सांभाळण्यास नकरा दिला आहे.

मुलगी जयंतीचा कंपनी सांभाळण्यास नकार

जयंती यांनी याआधी कंपनीचे दिल्लीमधील ऑफिस सांभाळलेले आहे. या काळात त्यांनी कंपनीच्या कारभारात काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. त्यांनी एचआर, विक्री, जाहिरात अशा विभागांची पुनर्रचना केली. तसेच त्यांनी कंपनीची वाढ व्हावी म्हणून या काळात विश्वासू आणि मजबूत टीम उभी केली होती. २०११ साली त्यांनी मुंबईचे कार्यालय सांभाळण्यास सुरुवाते केली होती. सध्या त्या बिसलरी या कंपनीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. मात्र त्यांनी आगामी काळात या कंपनीचा कारभार पाहण्यास नकार दिला आहे. याच कारणामुळे रमेश चौहान यांनी ही कंपनीला विकायला काढली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारतात लवकरच होणार ‘टिल्टिंग रेल्वे’चं आगमन, काय आहेत खास वैशिष्ट्ये?

कंपनी खरेदी करण्यासाठी टाटा समूह उत्सुक

बिसलरी कंपनीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी ही कंपनी विकण्याचा निर्णय वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. ते या कंपनीला टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडला विकणार आहेत. बिसलरी कंपनीची ते वाढ करतील. तसेच या कंपनीची ते काळजी घेतील असे मला वाटते म्हणूनच मी ही कंपनी त्यांना विकतोय, असे रमेश चौहान यांनी सांगितले आहे. चौहान ही कंपनी पूर्णपणे विकणार आहेत. म्हणजेच त्यांची या कंपनीत कोणतीही भागिदारी नसणार आहे. त्यापेक्षा यानंतर पर्यावरण आणि इतर सामाजिक कार्यामध्ये मी काम करणार आहे, असे चौहान यांनी सांगितले आहे.

बिसलरी कंपनीचा इतिहास काय आहे?

बिसलरी ही कंपनी मूळची भारतातील आहे, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र या कंपनीची सुरुवात इटलीमध्ये झाली होती. उद्योजक फेलिस बिसलरी यांनी या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांनी अगोदर मद्याला उपाय म्हणून बिसलरी हे पेय बाजारात आणले होते. हे पेय सिंचोना (Cinchona), काही औषधी वनस्पती आणि काही प्रमाणात श्रार यांचे मिश्रण होते. फेलिस यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर डॉ. रोस्सी यांनी १९२१ साली ही कंपनी विकत घेतली.

हेही वाचा >>> विश्लेषण : मतदानाचे वय १८वरून १६ वर्षे का केलं जातंय? जाणून घ्या न्यूझीलंड सरकारसमोरील अडचणी?

१९६५ साली कंपनी भारतात आली

पुढे १९६५ साली खऱ्या अर्थाने या कंपनीचा भारताकडे प्रवास सुरू झाला. डॉ. रोस्सी आणि त्यांचे मित्र खुशरू सनटूक यांनी १९६५ साली बिसलरी कंपनीचा महाराष्ट्रातील ठाणे येथे भारतातील पहिला प्लँट सुरू केला. अगोदर या कंपनीने ‘बिसलरी मिनरल वॉटर’ आणि ‘बिसलरी सोडा’ विकण्यास सुरुवात केली. ही उत्पादनं फक्त पंचातारांकित तसेच महागड्या रेस्टॉरंट्समध्ये श्रीमंत व्यक्तींसाठी उपलब्ध होती.

अगोदर पाणी विकण्याचा कोणताही विचार नव्हता

१९६९ साली पार्ले ब्रदर्सच्या रमेश चौहान आणि प्रकाश चौहान यांनी या कंपनीला चार लाख रुपयांना विकत घेतले होते. कंपनी खरेदी केल्यानंतर पाणी विकण्याचा व्यवसाय कसा वृद्धींगत होत गेला याबाबत रमश चौहान यांनी सविस्तर सांगितलेले आहे. “६० आणि ७० च्या दशकात सोडा या पेयास चांगली मागणी होती. तेव्हा ‘बिसलरी सोडा’ हे पेय प्रसिद्ध होते. याच कारणामुळे मी या कंपनीला खरेदी केले होते. मात्र तेव्हा पाणी विकण्याचा आमचा कोणताही विचार नव्हता,” असे रमेश चौहान यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण: ११ दोषींच्या सुटकेविरोधात बिल्किस बानोंनी का दाखल केली पुनर्विचार याचिका? यासाठी नियम काय? जाणून घ्या…

कंपनीत ४०० टक्क्यांनी वाढ

रमेश चौहान यांनी १९९३ साली सॉफ्ट ड्रिंकच उत्पादन बंद करून बंद बॉटलमध्ये पिण्याचे पाणी विकण्याच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. १९९५ साली त्यांनी ५०० मिली पाण्याची बॉटल पाच रुपयांना विकण्यास सुरुवात केली. चौहान यांच्या या कल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या काळात कंपनीमध्ये ४०० टक्के वाढ झाली. तसेच त्यांनी या क्षेत्रातील ४० टक्के बाजार काबीज केला.

लोकांची बदलती मागणी लक्षात घेता चौहान यांनी ११ वर्षानंतर बिसलरी या ब्रँडमध्ये अनेक बदल केले. बिसलरीच्या बॉटलचा रंग हिरवा करण्यात आला. चौहान यांच्या या निर्णयाचाही कंपनीला फायदा झाला. सध्या बिसलरी कंपनीने याक्षेत्रातील ३२ ते ३५ टक्के बाजार काबीज केलेला आहे. मात्र आता या कंपनीला विकण्यात येत आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:48 IST
Next Story
विश्लेषण: ११ दोषींच्या सुटकेविरोधात बिल्किस बानोंनी का दाखल केली पुनर्विचार याचिका? यासाठी नियम काय? जाणून घ्या…