Pahalgam Terror Attack Security Strategy: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटकांचा तर एका स्थानिक घोडा पुरवणाऱ्या नागरिकाचा मृत्यू झाला होता. झाडांमागे लपलेल्या तीन दहशतवाद्यांनी अचानक समोर येऊन पर्यटकांवर गोळीबार केला होता. पर्यटकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली होती.
पहलगाम हल्ल्याच्या १२ महिन्यांनंतर आता काश्मीरकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पाऊले पडत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी गुप्तचर यंत्रणांच्या अहवालावरून लष्करी मोहीम हाती घेणे सुरू केले आहे. उंच डोंगराळ भाग, स्थानिक पातळीवरील संपर्क व्यवस्था तसेच ठराविक हेतूने हाती घेतलेल्या मोहीमांकडे सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शहरी भागासह दुर्गम भागातही सुरक्षा यंत्रणा काश्मीरमध्ये सक्रिय झाली आहे. सुरक्षा यंत्रणांमध्ये अंतर्गत सहकार्य वाढवले जात आहे.
दुर्गम भागातील ७५ हून अधिक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची लागली होती रिघ
काश्मीरमध्ये परिस्थिती आता ‘सामान्य’ झाली आहे, या मान्यतेला पहलगाम हल्ल्याने तडा गेला. शहरी भागातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली होती. काश्मीरमध्ये पर्यटन वाढले होते. त्यामुळे अनेक दुर्गम, डोंगराळ भागातील सौंदर्याने नटलेली जवळपास ७५ नैसर्गिक पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. पीर पंजाल रांगांमधील सिंथान टॉप, बुटा पाथ्री यांचा त्यात समावेश होता. पर्यटकांचा ओढा वाढल्याने ही दुर्गम भागातील पर्यटन स्थळे पर्यटकांचे आकर्षण ठरत होती. सुरक्षा अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ही स्थळे अत्यंत सुंदर असली तरी ती धोकादायक आहेत. या स्थळांना दहशतवाद्यांच्या वास्तव्याचा इतिहास आहे. दहशतवाद्यांचे तिथे वास्तव्य असते. ते अद्याप पूर्णत: कमी झालेले नाही.
आतापर्यंत दहशतवादी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर थेट गोळीबार किंवा शहरी भागात हल्ले करत होते. पर्यटकांवर अशा पद्धतीने हल्ला होईल, याचा अंदाज भारतीय सैन्याला नव्हता. दरम्यान, काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होत असल्याने, पर्यटकांची रिघ लागल्याने खूप वेगाने दुर्गम भागातील अनेक पर्यटन स्थळे खुली करण्यात आली होती. त्यामुळे तिथे सुरक्षा पुरवण्याबाबत विचार करायला वेळ मिळाला नाही. हल्ल्यानंतर अशी तब्बल ५० पर्यटन स्थळे तात्काळ बंद करण्यात आली होती. जम्मू – काश्मीर पोलीसचे माजी महासंचालक म्हणाले, “परिस्थिती जशी सामान्य होत आहे, तशी सुरक्षा व्यवस्थेची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे.”

रस्त्यांपासून ते डोंगरांच्या टोकापर्यंत सुरक्षा दल तैनात ?
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या तैनातीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. उंच डोंगराळ भागात भारतीय सैन्याने ४३ तात्पुरते कार्यरत तळ (टेम्पोररी ऑपरेटिंग बेसेस) उभारले आहेत. ३ हजार फूट ते ९ हजार फूट उंचीवर सीआरपीएफ आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना तैनात केले आहे. डोंगराळ भागातील घनदाट जंगलांमध्ये दडून बसणाऱ्या व संधी मिळताच हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी जवानांना अशा दुर्गम भागात तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानमधून घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी लपण्यासाठी घनदाट जंगलांचा आधार घेतात.
तंत्रज्ञान आणि “ह्युमन फायरवॉल”
सैन्याच्या तैनातीबरोबरच जम्मू – काश्मीरमध्ये तंत्रज्ञान व स्थानिक नागरिकांचा सुरक्षेसाठी आधार घेण्यात आला आहे. पर्यटनाशी संबंधित सर्व नागरिकांचा आधार लिंक्ड डेटाबेस तयार करण्यात आला असून त्यांना क्यू आर कोड बहाल करण्यात आले आहेत. पर्यटकांनी ते क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्यांना संबंधित व्यक्तीबाबत सविस्तर माहिती मिळते. पर्यटनाशी संबंधित अर्थव्यवस्थेत सहभागी पोनीवाले, टुरिस्ट गाईड्स, फोटोग्राफर्स आणि विक्रेते व इतर संबंधितांना क्यूआर कोड देण्यात आले आहेत. याचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे पर्यटन स्थळांवर व्यक्तींची तात्काळ तपासणी करता येईल, दुसरे म्हणजे ओजीडब्लू (ओव्हर ग्राउंड वर्कर) चा बिमोड करणे. ओजीडब्ल्यू हे स्थानिक नागरिकांमध्ये किंवा पर्यटन स्थळांवर हेरगिरी करून माहिती दहशतवाद्यांना पुरवण्याचे काम करतात. यात अनेकदा काश्मीरमधील स्थानिक नागरिकांचा सहभाग असतो. या नवीन प्रणालीला “ह्युमन फायरवॉल” मानले जात आहे. भारतीय सैन्य दलाकडून देखरेखीसाठी ड्रोन्सचा वापर देखील केला जात आहे. दुर्गम भागात, ट्रेकिंगच्या मार्गांवर ड्रोनने लक्ष ठेवले जात आहे.

लष्करी मोहिमांचे बदललेले स्वरूप
गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सुरक्षा दल मोहिम हाती घेत असल्याचे प्रमाण पहलगाम हल्ल्यानंतर वाढले आहे. गुप्तचर यंत्रणा भक्कम करण्यात आली आहे. जुलै २०२५ मध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यात सहभागी तिन्ही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांना गुप्तचर यंत्रणांची माहिती व ड्रोनचा वापर करून शोधण्यात आले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा दलांनी आता ‘इंटेल – फर्स्ट’ (गुप्तचर माहिती प्रथम) ही रणनीती स्वीकारली आहे. गुप्तचर माहिती आल्यानंतर त्या प्रमाणे लष्करी मोहिम हाती घेतल्या जातात. यामुळे दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना खीळ बसली आहे. अशाच एका मोहिमेत काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलाने लष्कर – ए – तय्यबाशी संबंधित सैफुल्ला ग्रुपचा खात्मा केला.
“दहशतवाद्याने एकदा घुसखोरी केली की तो काहीतरी करण्यासाठी उतावळा होतो. पाकिस्तान जोपर्यंत त्याला पाठिंबा देतो तोपर्यंत तो काहीतरी दहशतवादी कृत्ये करत राहतो. सध्या पाकिस्तान त्याच्या पश्चिमेकडील तालिबानशी झुंझतोय. ही एक चांगली गोष्ट आहे”, असे सुरक्षा व्यवस्था ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
