Pahalgam Terror Attack intelligence failure critical security gaps: जम्मू- काश्मीरमधील ‘नॉर्मलसी’च्या दाव्यांना छेद देत दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरण मीडोमध्ये जो थरार घडवला, त्यामागे केवळ योगायोग नव्हता… त्यामुळे ती घटना हे ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ आणि सुरक्षा धोरणातील त्रुटींचे जिवंत उदाहरण ठरले.
‘नॉर्मलसी’चा पोकळ दावा
जम्मू-काश्मीर २०२४-२५ या दोन वर्षांत पूर्वपदावर आल्याचा (‘नॉर्मलसी’ परतल्याचा) दावा केंद्र सरकारतर्फे वारंवार अधिकृतरित्या करण्यात आला होता. विशेषतः पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पर्यटन विक्रमी पातळीवर पोहोचल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले. पण याच परिसरात उंचावर वसलेल्या, निसर्गरम्य आणि असुरक्षित अशा बैसरण मीडो या ठिकाणी सुरक्षा कवच भेदत वर्षभरापूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला.
व्यवस्थेचे अपयश
हा हल्ला ही फक्त एक दहशतवादी घटना नव्हती; तर ते एक व्यवस्थेचे अपयश होते, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. इंटेलिजन्स म्हणजेच हल्ल्याची गुप्तवार्ता मिळालेली होती, इशारेही देण्यात आले होते, तर मग अशा परिस्थितीत सुरक्षा कवच कसे भेदले गेले, हा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारण्यात आला.

१. ‘नॉर्मलसी’चा सापळा?
‘नॉर्मलसी’ ही केवळ राजकीय किंवा प्रशासकीय संकल्पना नसते; तर ती सुरक्षा यंत्रणांच्या मानसिकतेवरही परिणाम करते. २०२४ मध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर आली असून आता शातंता परत आली आहे, असा दावा केंद्र सरकारतर्फे सातत्याने करण्यात आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसाठीही एक ‘कम्फर्ट झोन’ तयार झाला आणि यंत्रणा थोड्या ढिल्या पडल्या, असे सुरक्षा तज्ज्ञांना वाटते.
Forest-Fringe-Infiltration
याच काळात इंटेलिजन्स ब्युरोकडून जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान काही ‘लो-इंटेन्सिटी पण हाय-इम्पॅक्ट’ हल्ल्यांच्या शक्यतेचे इनपुट्स आले होते. विशेषतः ‘forest-fringe infiltration’ हा शब्दप्रयोग गुप्तवार्ता यंत्रणांनी वारंवार केला होता. मात्र, या इनपुट्सकडे ‘रूटीन अलर्ट’ म्हणून पाहिले गेले. परिणामी, धोका ‘केवळ कागदावर’ राहिला आणि प्रत्यक्षात त्याचे परिणाम भोगण्याची वेळ देशावर आली.
२. ‘फॉरेस्ट-फ्रिंज’- दहशतवाद्यांचा कॉरिडॉर
बैसरणचा भूगोल समजून घेतला तर तिथले सुरक्षेचे आव्हान सहज लक्षात येते. एका बाजूला उघडे माळरान, तर दुसऱ्या बाजूला दाट जंगल आणि उंचसखल डोंगराळ प्रदेश असा हा प्रदेश आहे. जम्मू आणि काश्मीर पोलीस मधील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी या हल्ल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये असे म्हटले होते की, हा परिसर “semi-secured zone” म्हणून ओळखला जातो. म्हणजेच पूर्णपणे संरक्षित नाही आणि असुरक्षितही नाही.
‘ट्रेकिंग रूट्स’ वापरले
याच ‘ग्रे झोन’चा फायदा घेत दहशतवादी जंगलाच्या आडून इथपर्यंत पोहोचले. त्यांनी पारंपरिक रस्ते टाळले, आणि स्थानिक गाईड्सच्या माहितीचा वापर करत ‘ट्रेकिंग रूट्स’ वापरले, ही बाब तपासात उघडकीस आली. ही पद्धत नवीन नाही, पण यावेळी तिचा अचूक वापर त्यांनी केला; कारण सुरक्षा यंत्रणांनी ‘हायवे थ्रेट’वर त्यांचे लक्ष केंद्रित केले होते आणि ‘हायकिंग ट्रेल्स’ दुर्लक्षित राहिले. नेमकी त्याच ठिकाणाहून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली.
३. ‘सॉफ्ट टार्गेट’कडे दुर्लक्ष्य
बैसरण हे एक ‘सॉफ्ट टार्गेट’ होते. कारण तिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, मात्र कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था तिथे तैनात नव्हती. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये या परिसरात पर्यटकांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढली होती. तरीही, सुरक्षा व्यवस्था ही केवळ तात्पुरतीच राहिली; म्हणजे पर्यटक वाढले की, सुरक्षा वाढविण्याइतपतच. सुरक्षेच्या मुद्द्याकडे कलेले हे अक्षम्य असे दुर्लक्ष होते.
अधिक पर्यटक संख्या + कमी सुरक्षा व्यवस्था = मोठा धोका
हेच समीकरण दहशतवाद्यांनी नेमके हेरले.
४. ‘२० मिनिटांचा’ विलंब जीवघेणा ठरला
हल्ल्यानंतरच्या पहिल्या २० मिनिटांचा कालावधी निर्णायक असतो, असे सामरिकशास्त्रात सांगितले जाते.
स्थानिक साक्षीदारांच्या मते, पहिल्या गोळीबारानंतर जवळपास १५-२० मिनिटे कोणताही प्रभावी प्रतिकार वा प्रतिसाद सुरक्षा दलांकडून करण्यात आला नाही.
प्रतिकाराच्या विलंबाची दिलेली कारणे:
- जवळच्या सुरक्षा चौक्यांचे अंतर अधिक होते
- कम्युनिकेशन लॅग (मोबाइल नेटवर्कची समस्या)
- क्विक रिअॅक्शन टीम (QRT) उशिरा पोहोचली
याच पहिल्या २० मिनिटांत सर्वाधिक हानी झाली.
५. ‘इंटेलिजन्स ते अॅक्शन’ खंडित साखळी
इंटेलिजन्स इनपुट्स आणि ग्राउंड अॅक्शन यांच्यातील भली मोठी दरी ही या घटनेची मध्यवर्ती समस्या होती.
इनपुट्स होते पण त्यामध्ये नेमकेपणाचा अभाव होता. गुप्तवार्ता ढोबळ होती. उदाहरणार्थ:
- Forest infiltration likely- पण कोणत्या मार्गावरून?
- Tourist targets vulnerable- पण कोणते हॉटस्पॉट्स?
या दोन्ही गुप्तवार्तांमध्ये नेमक्या माहितीचा अभाव होता. या गुप्तचर माहितीवर कार्यवाही झाली असती, तर कदाचित परिणाम वेगळा असता.
‘नॉर्मलसी’ पलीकडचे वास्तव
पहलगाम आणि बैसरणमधील हल्ला हा एक ‘ब्लॅक स्वान’ इव्हेंट नव्हता, तर तो ‘गुप्तचर यंत्रणांमधील त्रुटींचा पुरावाच होता. ब्लॅक स्वान इवहेंट म्हणजे अतिशय दुर्मीळ,कल्पनेपलीकडची आणि अनाकलनी घटना, ज्याचा खूप मोठा परिणाम पाहायला मिळतो. पहलगामचा हल्ला हा सुरक्षेमधील त्रुटीचा बसलेला फटका होता.
पहलगामच्या हल्ल्याचे तीन धडे:
- नॉर्मलसी हा सुरक्षा धोरणाचा आधार असू शकत नाही
- भूगोल आणि स्थानिक पॅटर्न्स समजून घेणे अत्यावश्यक आहे
- इंटेलिजन्स ते अॅक्शन या साखळीतील प्रत्येक दुवा मजबूत असायला हवा
आज, ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवायांचा संदर्भ दिला जातो, तेव्हा या पार्श्वभूमीतील चुका समजून घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.
