Dealing with a sudden Pain Flare-Up during recovery: “दोन आठवडे बरं वाटत होतं, पण अचानक पुन्हा दुखायला लागलं…” दीर्घकाळ पाठदुखी, मानदुखी किंवा गुडघेदुखी असलेल्या रुग्णांना बहुतेकवेळा हा अनुभव येतो. वेदना कमी होत असताना अचानक पुन्हा वाढल्या, की मनात लगेच शंका येते उपचार चुकीचे तर नाहीत? आजार वाढतोय का? आता परत सुरुवातीपासून सगळं करावं लागणार का?
पेन फ्लेअर अप
खरं तर अशा अचानक वाढलेल्या वेदनांना वैद्यकीय भाषेत पेन फ्लेअर अप म्हणतात आणि हे फ्लेअर अप उपचारादरम्यान होऊ शकतात. यात वेदनेचं प्रमाण आणि तीव्रता हे दोन्ही वाढू शकतात. बहुतेकवेळा यामागे विशिष्ट कारण असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन फ्लेअर अपचा अर्थ सुरु असलेले उपचार अयोग्य आहेत किंवा अपूर्ण आहेत असा होत नाही.
पेन फ्लेअर अप म्हणजे नेमकं काय?
पेन फ्लेअर अप म्हणजे वेदनांची तीव्रता काही काळासाठी वाढणं. ही वाढ तात्पुरती असते आणि बहुतेक वेळा काही दिवसांत किंवा आठवड्यात कमी होते. प्रदीर्घ वेदनांमध्ये फ्लेअर-अप्स सामान्य असतात. बहुतेकवेळा उपचार सुरू असताना वेदना वाढली म्हणजे आता शरीरात काहीतरी नवीन इजा झाली आहे, किंवा असलेला आजार अजून वाढला आहे असा गैरसमज रुग्णांना होऊ शकतो.

आपण ‘बरे’ होत असताना वेदना का वाढतात?
ही गोष्ट समजून घेण्यासाठी वेदनेकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. वेदना केवळ शारीरिक घटकांमधून उद्भवते असं नाही, त्यात मेंदू आणि मज्जासंस्थेच्या प्रतिक्रिया देखील असतात.
मेंदू सतर्क होतो तेव्हा…
फिजिओथेरेपीदरम्यान आपण शरीरावर हळूहळू भार वाढवत असतो, हालचाल वाढते, स्नायूंना काम दिलं जातं, हालचालींची भीती हळू हळू कमी केली जाते. अशा वेळी मेंदू थोडा ‘सतर्क’ होतो आणि वेदनांचा सिग्नल वाढवू शकतो. हे धोक्याचं लक्षण नसून, अनेकदा अॅडजस्टमेंटचा भाग असतो.
फ्लेअर-अप्सची कारणं
पेन फ्लेअर अप होण्यामागे अनेक कारणं असू शकतात:
- अति शारीरिक श्रम
- दिनक्रमात अचानक होणारा बदल
- झोप कमी होणं किंवा झोपेच्या वेळा बदलणं
- मानसिक ताण, चिंता किंवा भावनिक थकवा
- जास्त वेळ बसणं किंवा प्रवास
- हवामान बदल
- आजारपण, ताप किंवा थकवा
या गोष्टींचा थेट वेदनेच्या मूळ अवयवाशी संबंध असतो किंवा नसतो, पण वेदनेची तीव्रता ठरवणाऱ्या प्रक्रियेवर या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे वेदना वाढतात.
“दुखतंय म्हणजे काहीतरी बिघडलं” हा गैरसमज
आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय की, वेदना म्हणजे इजा. पण प्रदीर्घ वेदनांच्या बाबतीत हे सरळसोपं समीकरण लागू होत नाही. अनेक वेळा स्कॅन, एक्स-रे किंवा तपासण्या यात कुठलेही बदल दिसत नाहीत पण वेदनांची तीव्रता मात्र वाढते. याचा अर्थ असा की वेदना ही फक्त शारीरिक घटकांवर अवलंबून नसते. वेदना ही शरीर-मेंदू यांच्यातील संवाद आहे. आणि हा संवाद काही वेळा जास्त संवेदनशील होतो.
फ्लेअर-अप्समुळे लोक काय चुका करतात?
वेदना वाढल्या की, अनेक जण दोन टोकांची पावलं उचलतात. पहिलं टोक “काहीच करू नये.” सगळी हालचाल थांबवणं, व्यायाम बंद करणं, पूर्ण विश्रांती घेणं. यामुळे सुरुवातीला थोडा आराम मिळतो, पण शरीराला पुन्हा हालचाल सुरू करताना त्रास होतो. दुसरं टोक “दुखत असूनही सगळं करायचं.” वेदना दुर्लक्षित करून जास्त काम करतच राहणं. यामुळे मज्जासंस्था आणखी संवेदनशील होऊ शकते. योग्य मार्ग हा या दोन्हींच्या मधला असतो तो म्हणजे संतुलित प्रतिसाद.
फ्लेअर-अप्स आल्यावर काय करावं?
फ्लेअर-अप म्हणजे थांबायचं नाही, पण वेग कमी करायचा. हालचाल पूर्ण बंद न करता थोडी सौम्य करायची. शरीराला “मी सुरक्षित आहे” असा संदेश देणं महत्त्वाचं असतं. श्वसनावर लक्ष देणं, हालचालींची गुणवत्ता राखणं, आणि झोप-ताण याकडे लक्ष देणं हे फार उपयुक्त ठरतं. फिजिओथेरेपिस्टशी संवाद ठेवल्यास उपचारात योग्य बदल करता येतात.
रिकव्हरी सरळ रेषेत होत नाही
शारीरिक असो अथवा मानसिक बरं होण्याची प्रक्रिया ही एक सरळ रेषेत पुढे जात नाही. बहुतेक लोक रिकव्हरी म्हणजे रोज थोडं थोडं सुधारत जाणं अशी अपेक्षा करतात. प्रत्यक्षात रिकव्हरी ही वर-खाली जाणारी प्रक्रिया असते. काही दिवस चांगले, काही दिवस कठीण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. फ्लेअर-अप्स म्हणजे आपण मागे जातोय असं नाही; अनेक वेळा ते पुढच्या टप्प्याआधी येणारे “स्पीड ब्रेकर्स” असतात.
फिजिओथेरेपीची भूमिका
फिजिओथेरेपी केवळ वेदना कमी करण्यापुरती मर्यादित नसते. रुग्णाला वेदना कशा काम करतात हे समजावून सांगणं, फ्लेअर-अप्स कसे हाताळायचे याचं शिक्षण देणं, हालचालींची आणि शारीरिक क्रियांची गुणवत्ता सुधारणं, रुग्णाला फ्लेअर अप्स निर्माण करणारे घटक ओळखायला शिकवणं आणि आत्मविश्वास निर्माण करणं या सगळ्याचा समावेश फिजिओथेरेपी मधे होतो. जेव्हा रुग्णाला “वेदना वाढल्या तरी मी सुरक्षित आहे” ही जाणीव होते, तेव्हा रिकव्हरी पटकन आणि अधिक स्थिर रीतीने होते. वेदना अचानक वाढल्या म्हणजे उपचार अयोग्य आहेत, असं नाही. पेन फ्लेअर अप्स हा दीर्घकालीन वेदनांच्या प्रवासातील एक सामान्य टप्पा आहे. योग्य समज, संयम आणि मार्गदर्शन असल्यास हे टप्पे पार करता येतात.
