Pakistan Hindu Temple Demolition News : पाकिस्तानातील पंजाब प्रांतात १०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिरावरून मोठा वादंग निर्माण झाला. लाहोरपासून सुमारे १३० किमी अंतरावर असलेल्या नारोवाल जिल्ह्यातील सिराज गावातील हिंदू मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आल्याचा आरोप तेथील हिंदू समुदायाने केला. मात्र, स्थानिक प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावत मुसळधार पावसामुळे मंदिराची जुनी इमारत कोसळली असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे पडसाद भारतातही उमटले असून केंद्र सरकारने घटनेचा तीव्र निषेध करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यादरम्यान हिंदू मंदिरावरून समोर आलेल्या परस्परविरोधी दाव्यांमुळे परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

मंदिराच्या जागेवरून नेमका वाद काय?

पाकिस्तानात पाडण्यात आलेले ऐतिहासिक हिंदू मंदिर सुमारे १०० ते १२५ वर्षे जुने होते. जवळपास १००० चौरस मीटर जागेवर या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराच्या भूखंडावरून वाद सुरू होता, असा दावा पाकिस्तान मसिहा मिल्लत पार्टीचे अध्यक्ष परवेझ साहोत्रा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या मंदिरालगतची जागा स्थानिक प्रशासनाने एका मदरशाहसाठी भाडेतत्वावर दिली होती. मात्र, अनेक वर्षे भाडे थकल्यामुळे आणि ज्या कारणासाठी जागा देण्यात आली होती त्यासाठी तिचा वापर न झाल्याने हा भाडेकरार रद्द करण्यात आला. त्यानंतर या मालमत्तेच्या काही भागावर कथितरीत्या बेकायदा कब्जा करण्यात आला. याबाबत महसूल विभागाच्या एका अहवालाचा संदर्भ देताना साहोत्रा म्हणाले की, मंदिराच्या खोल्या तसेच मालमत्तेच्या इतर भागांवर कब्जा करणाऱ्या व्यक्तींची नावे या अहवालात नमूद करण्यात आली होती. सियालकोटमधील उपप्रशासकांनी २९ जानेवारी २०२६ रोजी या जागेवरील मदरशाचे हक्क पूर्णपणे रद्द केले होते. तसेच, संबंधित जागेवरील अनधिकृत ताबा हटवून मालमत्ता सील करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, प्रशासनाचा हा आदेश कधीही प्रत्यक्षात अंमलात आणला गेला नाही.

२१ ऑगस्टला नेमके काय घडले?

साहोत्रा यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (TLP) या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंधित काही लोक मंदिर पाडण्यात सहभागी होते. त्यांनी बुलडोझरच्या मदतीने संपूर्ण मंदिर जमीनदोस्त केले. इतक्यावरच न थांबता मंदिराचा कळस आणि धातूचे इतर साहित्य घटनास्थळावरून चोरून नेले. याबाबत ११ एप्रिल रोजी नारोवालच्या पोलीस उपअधीक्षकांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या एका अहवालाचाही साहोत्रा यांनी संदर्भ दिला. या अहवालावरून स्थानिक प्रशासनाला मंदिराच्या सुरक्षेबाबत असलेल्या चिंतेची तसेच मंदिराची तोडफोड किंवा नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती होती, असा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर अल्पसंख्याक संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि मंदिराची तात्काळ पुनर्बांधणी करण्याची मागणी लावून धरली आहे.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

दुसरीकडे- स्थानिक अधिकारी राणा इफ्तिकार यांनी हे मंदिर बुलडोझरने जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. मुसळधार पावसामुळे मंदिराची जुनी आणि जीर्ण झालेली वास्तू कोसळली, असे त्यांनी पीटीआयला सांगितले. प्रशासकीय नोंदींमध्ये या मंदिराचे कोणतेही नाव नसले, तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व असल्याचे इफ्तिखार यांनी मान्य केले. आमच्या नोंदवहीत या मंदिराचे कोणतेही नाव नाही. मात्र, ही वास्तू अत्यंत जुनी म्हणजेच १०० ते १२५ वर्षांपूर्वीची आहे, असे त्यांनी पीटीआयला सांगितले. मंदिरालगतची जमीन एका मदरशासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्याच्या वृत्तालाही इफ्तिखार यांनी दुजोरा दिला. मात्र, ही जमीन आणि मंदिराची जमीन यामध्ये फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराची पुन्हा उभारणी किंवा पुनर्बांधणी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदू संघटनांची नेमकी मागणी काय?

पंजाब प्रांतातील हिंदू समाजाचे नेते रतनलाल यांनी स्थानिक प्रशासन हिंदू मंदिराच्या जागेचे संरक्षण करण्यात आणि कथित अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. मंदिराच्या जागेचे संरक्षण करण्यासाठी आणि कब्जाधारकांना हटवण्यासाठी प्रशासनाने पुरेशी पावले उचलली नाहीत. परिणामी मंदिर पाडले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली, असे त्यांनी पीटीआयला सांगितले. नारोवाल जिल्हा शांतता समिती तसेच पाक धर्म स्थान हिंदू समितीचे सदस्य असलेल्या रतनलाल यांनी मंदिर परिसरातील वातावरणाबाबतही चिंता व्यक्त केली. मंदिराच्या परिसरात अजूनही मदरसा सुरू असल्याने आम्हाला त्या ठिकाणी जाण्याचीही भीती वाटते. त्यामुळे मंदिर पाडण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी आणि मंदिराची पुन्हा उभारणी करावी, अशी मागणी रतनलाल यांनी पाकिस्तान सरकारकडे केली. दुसरीकडे- साहोत्रा यांनीही पंजाब सरकारकडे मंदिराची मूळ स्वरूपात पुनर्बांधणी करण्याची मागणी केली. तसेच हिंदू मंदिरे, शीख गुरुद्वारे आणि ख्रिश्चन चर्च तसेच त्यांच्या आसपासच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

वाद केवळ एका मंदिरापुरताच मर्यादित आहे का?

पंजाब प्रांतातील हिंदू मंदिर पाडण्यात आल्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक वारशाच्या जतनाचा व्यापक प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याबाबत स्थानिक हिंदू प्रतिनिधी आर्य यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील अनेक दशकांचे तणावपूर्ण संबंध, १९८० च्या दशकातील इस्लामीकरणाची धोरणे आणि १९९२ च्या बाबरी मशीद वादानंतर पाकिस्तानातील हिंदू समाजात मोठ्या प्रमाणावर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदू धार्मिक वारशाचे जतन केल्यास पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्यास आणि पर्यटनाला चालना देण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. यादरम्यान पाकिस्तानात एखाद्या हिंदू मंदिराला पाडकाम किंवा विध्वंसाचा सामना करण्याची ही पहिलीच घटना नाही. २०२० मध्ये खैबर पख्तूनख्वामधील करक मंदिर एका जमावाने पाडले होते. २०२३ मध्ये कराचीतील मारी माता मंदिर पाडण्यात आले, तर २०२४ मध्ये व्यावसायिक विकासासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खैबरमधील एका मंदिराची वास्तू पाडण्यात आल्याचे वृत्त होते. आता सिराज गावातील १०० जुन्या मंदिराचाही या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार या घटना थांबवण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.